खडाखडीची नीतिकथा (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते.

आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते.

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली असून, आता पुढच्या आठवड्यात पक्षाध्यक्ष अमित शहा हे पाटण्यात जाऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेणार आहेत. खरे तर अडीच वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने बिहार जिंकून नितीशकुमार यांनी भाजपला थेट विरोधी बाकांवर बसविले होते. मात्र, त्यानंतर वर्षभरापूर्वी अचानक त्यांनी एका रात्रीत सत्तेची समीकरणे आरपार बदलून टाकली आणि लालूप्रसादांना घरचा रस्ता दाखवत पुनःश्‍च भाजपबरोबरच पाट लावून आपले मुख्यमंत्रिपद कायम राखले. आता गुजरात आणि कर्नाटक या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेले फटके पाहून नितीशकुमार यांना वास्तवाचे भान आले असून, त्यांनी आपले ‘सेक्‍युलर कार्ड’ पुन्हा पोतडीतून बाहेर काढले असून, जागावाटपाचा मुद्दा पुढे करून खणाखणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील ‘मोदी लाटे’त नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाची पुरती धूळधाण होऊन त्यांच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या होत्या; तर भाजपने बिहारमधून घसघशीत २२ खासदार लोकसभेत नेले होते. मात्र, त्या निकालांच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी जागावाटप करून चालणार नाही; कठीण काळातही ‘जेडीयू’ची मते १७ टक्‍क्‍यांच्या खाली गेलेली नाहीत, हे गृहीत धरून जागावाटप व्हायला हवे, असा पवित्रा नितीशकुमार यांनी नवी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत घेतला आहे. त्यांचा हा पवित्रा अर्थातच भाजपबरोबरच्या धरसोडीच्या भूमिकेमुळे रसातळाला गेलेल्या विश्‍वासार्हतेनंतर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्हाला आमच्या पक्षाच्या भवितव्याची पर्वा नाही, तर जनतेच्या भविष्याची आणि विकासाची आहे, असे प्रवचनही त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत दिले. मात्र, त्यांचे हे ‘शब्द’ बापुडे केवळ वारा आहेत! नितीशकुमार यांना काही तत्त्वांची वा मूल्यांची चाड असती, तर त्यांनी कोलांटउडी मारली नसती. खरे तर लालूप्रसादांबरोबर नव्याने केलेला दोस्ताना ते टिकवून धरते, तर कदाचित भाजपविरोधी संयुक्‍त आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचा मानही त्यांना मिळू शकला असता. मात्र, राष्ट्रीय जनता दलाशी दगाफटका करून नव्याने भाजपशी संसार मांडल्यामुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेला धक्का बसला. अर्थात, त्याचीही जाणीव त्यांना आहेच! त्यामुळेच एकीकडे ‘जो हमे नुकसान पहुचायेगा, उसका ही अंत में नुकसान होगा...’ असे जाज्ज्वल्य उद्‌गार काढतानाच, त्यांनी सावधगिरीचा पवित्रा घेऊन भाजपबरोबरचा हा याराना योग्य दिशेनेच जाईल, असेही सूचित करून ठेवले आहे.

अर्थात, लालूप्रसाद गजाआड गेल्यानंतरही त्यांच्या राष्ट्रीय जनता दला (राजद)ने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयामुळे भाजपलाही आता तेलुगू देसम, तसेच शिवसेना यांच्यापाठोपाठ नितीशकुमार यांच्याशी मोठा पंगा घेता येणे कठीण आहे! त्यामुळे कार्यकारिणी बैठकीतील नितीशकुमार यांची दर्पोक्‍ती ही केवळ जागावाटपात झुकते माप पदरात पडावे म्हणूनच आहे, याची जाणीव त्यांना आहेच. शिवाय, देशातील राजकीय वर्तमानाचे भान जसे त्यांना आले आहे, तसेच त्याची जाणीव मोदी-शहा जोडगोळीलाही झाली आहे आणि त्यामुळेच शहा यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आपल्या मित्रांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अर्थात, त्यास भाजपने चार वर्षांपूर्वी लोकसभेत मिळवलेले पूर्ण बहुमत कारणीभूत होते. स्वत:च्या ताकदीवर बहुमत मिळाले आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा रथ जमिनीवरून चार अंगुळे वरून चालू लागला आणि एक एक मित्रपक्ष दुरावत गेला. त्यामुळेच गेल्या महिन्यात शहा यांना मुंबईला येऊन ‘मातोश्री’चा दरवाजा खटखटवणे भाग पडले. मात्र, आतमध्ये गेल्यावर फाफडा आणि ढोकळा यांच्या पलीकडे त्यांच्या हातास काही लागले नाही. आता पाटण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन, शहा यांनी नितीशकुमार यांची गळाभेट घेतल्यावर खास बिहारी ‘लिट्टी-चोखा’ची मेजवानी झडेल, यात शंका नाही! मात्र, स्वत:च्याच ‘कर्तृत्वा’ने आपली विश्‍वासार्हता, तसेच लोकप्रियताही गमावणारे नितीशकुमार यांना चंद्राबाबू नायडू वा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे ठाम राहता येणे, कठीणच आहे. अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर समाधान मानून घेणे त्यांच्या नशिबी आहे. मात्र, तेव्हाही ते त्याला राष्ट्रवाद आणि बिहारची अस्मिता वगैरेंची झालर लावून, पुन्हा प्रवचन झोडतीलच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial bihar loksabha election and nitishkumar