‘राष्ट्रवादी’तील खांदेपालट (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे.

निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या त्यांच्या एकमेव बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून, आता प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. हे स्थित्यंतर अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे, हे उघड आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची संयुक्त फळी उभारण्याच्या प्रयत्नांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असला तरी या प्रक्रियेत पक्षाची स्वतंत्र ओळख व स्थान यांविषयीदेखील ते जागरूक आहेत, हे त्यांनी ‘जागावाटपात रडीचा डाव नको’ असे काँग्रेसला सुनावून स्पष्ट केले. महाराष्ट्रात चार वर्षांपूर्वी सत्तांतर झाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट होते आणि आरोपांच्या सावटाखालीच चार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा; तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मैदानात उतरावे लागले होते. त्याचा फटकाही या पक्षाला बसला होता. मात्र, आरोपांचे वादळ भिरभिरत असतानाही, गेल्या काही महिन्यांत राज्यभरात चालवलेल्या ‘हल्लाबोल’ आंदोलनामुळे पक्षात पुन्हा एकवार जान आली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा खांदेपालट झाला आहे. ‘सिव्हिल इंजिनिअर’ असलेल्या जयंतरावांवर आता या निवडणुकीच्या हंगामात पक्षबांधणी करण्याची आणि त्याचबरोबर वारसाहक्‍काने पिताश्री राजारामबापूंकडून आलेल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर काँग्रेसबरोबर यशस्वी आघाडी करण्याची जबाबदारी आली आहे. जयंत पाटील हे उत्कृष्ट प्रशासक तर आहेतच; शिवाय प्रदीर्घकाळ राज्याचे अर्थमंत्रिपद सांभाळल्याने या महाराष्ट्र देशाची खतावणीही त्यांना मुखोद्‌गत आहे. विधानसभेत गेली चार वर्षे विरोधी बाकांवर असताना केलेल्या भाषणांतून त्यांची ही जाण दिसली. मात्र, केवळ एवढ्याच कारणांनी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले गेलेले नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना; तसेच भाजप या दोन्ही पक्षांनी १५ वर्षांच्या आघाडी सरकारच्या काळात `राष्ट्रवादी’च्या अनेक बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याची मोहीम चालवलेली असतानाही जयंतरावांच्या अंगावर एकही शिंतोडा त्यांना उडवता आलेला नाही. त्यांची प्रतिमा ही ‘मिस्टर क्‍लीन’ अशी आहे. गेल्या निवडणुकांत पश्‍चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात झालेल्या पानिपतानंतर त्याच भागात आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर विस्कटलेली घडी पुनश्‍च एकवार नव्याने बसवण्याचा इरादा स्पष्ट आहे. मात्र, त्यामुळे आता जयंतरावांवर पक्षाची घडी बसवतानाच, हा  पक्ष अधिकाधिक सर्वसमावेशक कसा करता येईल, हे पाहावे लागणार आहे. विविध जातसमूह, राज्याचे विविध भाग यांचा व्यापक विचार करून त्यांना संघटनाबांधणी करावी लागेल.  

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून प्रदीर्घ काळ छगन भुजबळ हा राष्ट्रवादीचा ‘ओबीसी’ चेहरा होता. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर भुजबळ यांना आरोप सिद्ध होण्याआधीच गजाआड जावे लागले आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना विधान परिषदेतील विरोधी नेतेपद बहाल करून ‘राष्ट्रवादी’ने नवा चेहेरा दिला. धनंजय मुंडे यांनीही विरोधी पक्षनेतेपद गाजवले. त्यामुळे ते आणि ‘हल्लाबोल’ आंदोलनात राज्य दणाणून सोडणारे अजित पवार यांच्याही नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी होती. मात्र, पक्षाने जयंतरावांच्या बाजून कौल दिला. त्यास त्यांचे अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व; तसेच शहरी चेहरा कारणीभूत आहे, असे दिसते.  राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने शहरी नेतृत्व उभे राहिले आहे. त्यांच्यासमोर  उभे राहताना, नेमक्‍या कोणाच्या हाती सूत्रे दिल्याने प्रभाव पडू शकेल, हा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला दिसतो. जयंत पाटील हे उच्चविद्याविभूषित आहेत आणि राजकारण त्यांच्या अंगाअंगांत मुरलेले आहे. शिवाय, ते समंजस नेतृत्व आहे. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या चर्चेसाठीही तेच उपयुक्‍त ठरू शकतील, असा आडाखा शरद पवार यांनी बांधला असावा. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मैदानात ताकद देतानाच, खलबतखान्यांमध्येही आपली हार होणार नाही, हेही जयंतरावांना बघावे लागणार आहे. अर्थात, जयंतरावांपुढील आव्हान सोपे नाही. कोणतीही गोष्ट उतावीळपणे न करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना यातून तारून नेईल, असे म्हणता येऊ शकते. अर्थात, निव्वळ पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा एवढाच आधार असलेले नेतृत्व ‘मैदानी जंग’मध्ये यशस्वी होत नाही, हेही त्यांना ठाऊक असेलच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial changes in ncp congress