भुजबळांची दुसरी इनिंग्ज! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला असला, तरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते राजकारणात पुन्हा सक्रिय होतील काय आणि त्यांची दुसरी इनिंग्ज कशी असेल, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.  

तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला असला, तरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते राजकारणात पुन्हा सक्रिय होतील काय आणि त्यांची दुसरी इनिंग्ज कशी असेल, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.  

म हाराष्ट्रातील एक बडे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मिळाला आहे; पण त्यामुळे कोणताही प्रश्‍न निकाली निघण्याऐवजी राज्याच्या राजकीय रंगमंचावर नव्या प्रश्‍नांची मोठी मालिकाच उभी ठाकली आहे. या मालिकेचा कळसाध्याय नेमका काय असेल, ते ठरवणे हे केवळ भुजबळ यांच्याच हातात आहे आणि जामीन मिळून चार दिवस उलटून गेले असले, तरीही प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ यांचे वास्तव्य के. ई. एम. रुग्णालयातच आहे. त्यामुळे अवघ्या चार वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ‘ओबीसी’ राजकारणाचे एक केंद्रबिंदू असलेले भुजबळ हे आता नेमके कोणते पाऊल उचलणार, याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे. अर्थात, भुजबळ यांनी आपल्या पुढील राजकारणाबाबत अद्याप कोणतेही सूतोवाच केलेले नाही, यास त्यांना जामीन मिळण्यास लागलेला जवळपास दोन वर्षांचा कालावधीच कारणीभूत आहे. या काळात भुजबळांना विविध आजारांनी घेरले आणि त्याचवेळी प्रदीर्घ काळ गजाआड राहावे लागल्याने झालेली त्यांची ससेहोलपटच कारणीभूत आहे.

कारणे काहीही असली, तरीही भुजबळांना जामीन मिळण्यास जो काही कालावधी लागला, तो बघता त्यांच्यावर अन्याय झाला, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना जामीन मिळाल्यास जो काही जल्लोष त्यांच्या समर्थकांनी केला, तोही तितकाच असमर्थनीय आहे; कारण त्यांच्या विरोधात दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले आहे आणि तो खटला प्रलंबित आहे. त्यामुळेच बहुधा जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया एकंदरीत सावध अशीच होती. भुजबळ हे शिवसेनेत असतानाच महाराष्ट्राचे बडे नेते बनले होते आणि अत्यंत आक्रमक अशा मूळ स्वभावामुळे, डिवचले गेल्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही अंगावर घेण्यास मागेपुढे बघितले नव्हते. त्यामुळेच यापुढे भुजबळ नेमके कोणते पाऊल उचलणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. मात्र, हा झाला केवळ मर्यादित असा राजकीय विचार आणि तो सारेच करत आहेत. मात्र, त्याचवेळी राजकीय नेता असला तरी त्यास कुटुंब आणि नात्यागोत्याचा परिवार असतो, याचा साऱ्यांनाच विसर पडला आहे. त्यामुळेच जामीन मिळाल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘मला माझ्या कुटुंबीयांना भेटू द्या...’ अशीच होती. त्यावरून या विजनवासामुळे, तसेच प्रकृतिअस्वास्थ्यामुळे भुजबळ किती भावविवश झाले आहेत, तेच दिसून आले आहे.

भुजबळ यांना जामीन मिळाला, त्या आधीच्या आठवड्यातच भारतीय जनता पक्षाचा ‘ओबीसी’ चेहरा असलेले आणि गेली दोन वर्षे राजकीय विजनवासात गेलेले एकनाथ खडसे यांना ‘एसीबी’ने ‘क्‍लीन चिट’ दिली. त्यामुळे आता राज्यातील ‘ओबीसीं’च्या राजकारणाला वेग येईल, अशा चर्चेने वेग घेतला. अर्थात, भुजबळ आणि खडसे यांना मिळालेल्या दिलाशात मूलभूत फरक आहे. खडसे यांना अद्याप न्यायालयाने दोषमुक्‍त करावयाचे असले तरी, ‘एसीबी’च्या ‘क्‍लीन चिट’नंतर तो निव्वळ उपचार असल्याचे दिसते. भुजबळ यांच्यावर मात्र खटल्याची टांगती तलवार आहेच. शिवाय, त्यांचे पुतणे समीर हे अद्याप गजाआड आहेत. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या गुंत्यात अडकलेले भुजबळ पुन्हा किती आक्रमक होतील, हा प्रश्‍नच आहे.
 शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन व्हाया काँग्रेस ‘राष्ट्रवादी’मध्ये १८-१९ वर्षांपूर्वी प्रवेश करणारे भुजबळ आणि आताचे प्रकृतिअस्वास्थ्य, तसेच दोन वर्षांचा कारावास यामुळे काहीसे खचलेले भुजबळ यांच्यात मोठा फरक असू शकतो. शिवाय, याच काळात तेलगी प्रकरणही होऊन गेले आणि त्यामुळेच त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर आता भुजबळ हे तातडीने राजकारणात पूर्वीइतक्‍याच आक्रमकतेने सहभागी होतील काय, असा प्रश्‍न त्यांच्या समर्थकांच्याही मनात असणार. त्यामुळेच आता खडसे असोत की भुजबळ, त्यांच्यामुळे राज्याचे राजकीय नेपथ्य आरपार बदलून जाऊ शकेल, याबाबत ठामपणे काही सांगता येणे कठीण आहे. मात्र, भुजबळ हे लढवय्या आहेत आणि ‘अरे’ला लगोलग ‘कारे’ने जवाब देण्याची त्यांची मूळ प्रकृती आहे. त्यामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत मात्र तोपावेतो सावरलेले भुजबळ आपल्या या दुसऱ्या इनिंग्जमध्ये पूर्ण ताकदीने उतरतील, याबाबत कोणाच्याच मनात संदेह नसणार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial chhagan bhujbal second innings