सवाल! 

ढिंग टांग! 
सोमवार, 22 एप्रिल 2019

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
वेळ : दमणुकीची. 
प्रसंग : करमणुकीचा. 
पात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य. 

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. 
वेळ : दमणुकीची. 
प्रसंग : करमणुकीचा. 
पात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य. 

विक्रमादित्य : (दार ढकलत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन? 
उधोजीसाहेब : (झोपण्याच्या तयारीत) नोप! गुड नाइट!! 
विक्रमादित्य : (खुशाल आत येत) हल्ली आपली भेटच नीट होत नाही!! 
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) उद्या भेटू, उद्या! दूध पिऊन झोप आता!! 
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) हल्ली माझा "आदित्य संवाद' कार्यक्रम जोरात सुरू आहे! तुम्हाला कळलं की नाही? 
उधोजीसाहेब : (अजीजीने) मी दमलोय रे खूप! 
विक्रमादित्य : (साफ दुर्लक्ष करत) मी एवढा क्‍लासिक टॉक देतो की पब्लिक एकदम खूश होऊन क्‍लॅप करतं! आमचा एक कार्यकर्ता म्हणाला, की साहेब, आपण पुढच्या वेळेपासून तिकिट लावूया!!'' 
उधोजीसाहेब : (हबकून) तिकीट? अरे, पोलिटिकल भाषणं ती! ते काय मोटिव्हेशनल भाषण आहे का? हल्ली आपल्याकडे पैसे देऊन प्रेरणा घेऊन येणारे लोक आहेत म्हणा!! पण तू हल्ली भाषणं छान करतोस, असं कानावर आलंय माझ्या!! 
विक्रमादित्य : (कौतुकाने लाजत) आय नो! मला खूप जणांनी कॉम्प्लिमेंट्‌स दिल्या! 
उधोजीसाहेब : (पोक्‍तपणाने) कुणी कौतुक केलं म्हणून हुरळून जायचं नाही, आणि कुणी नावं ठेवली म्हणून खट्‌टू व्हायचं नाही! आपलं लक्ष्य गाठायचंच!! कळलं? 
विक्रमादित्य : (मूळ विषयावर येत) आपलं ह्यावेळी 150 प्लस टार्गेट नक्‍की आहे ना? 
उधोजीसाहेब : (हतबल सुरात) आधी हे इलेक्‍शन तर धड पार पडू दे!! मग बघू!! 
विक्रमादित्य : (निरागसपणाने) मला सांगा बॅब्स... ह्या इलेक्‍शनमध्ये आपली पार वाट लागणार आहे का बॅब्स? 
उधोजीसाहेब : (दातओठ खात) खामोश! कोण म्हणतं असं? 
विक्रमादित्य : (खुलासा करत) एका मोठ्या माणसानं सांगितलं! 
उधोजीसाहेब : (खवळून) आत्ताच्या आत्ता हजर कर त्या माणसाला! कडेलोट करीन, कडेलोट!! 
विक्रमादित्य : (हाताची घडी घालत) तो माणूस सॉल्लिड आहे बॅब्स! मी उत्तम भाषण करतो, असं त्यानंच मला सांगितलं! चांगलं भाषण कसं करावं, ह्याच्या मस्त टिप्ससुद्धा दिल्या!! परवा भाषण करायला गेलो होतो ना, तेव्हा मी त्याला विचारलं की ""कुठल्या विषयावर बोलू?'" तर म्हणाला की ""काहीही बोल! नाहीतरी सगळा बॅंड वाजणारच आहे!!'' 
उधोजीसाहेब : (डोळ्यात खून चढत) आमचा बॅंड वाजवणाऱ्याचं पिपाटणं करून जत्रेत धाडू! आमची वाट लावायला निघालेल्याला देशोधडीला लावू! आम्हाला फु...फु...फ...फ्फ्फ...फिक...फफक... 
विक्रमादित्य : (गंभीर मुद्रेने) त्यानं वक्‍तृत्वाचा असा लेसन दिला की, "काय वाट्‌टेल ते होवो, मी मनातलं बोलणार म्हंजे बोलणार' अशा खाक्‍याने ठणकावून बोलायचं!! असं केलंस तर तुझा "आदित्य संवाद' सुपरहिट होईल! 
उधोजीसाहेब : (तलवार शोधत) कुठाय माझी तलवार!! हा कोण मनुष्य आहे, जो महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहे? असा बदसल्ला देऊन घात करणारी ही खंडोजी खोपड्याची अवलाद कुठली? 
विक्रमादित्य : (सबुरीने घेत) बॅब्स, पण तो मोठा माणूस आपल्याला कुठे काही बोलतोय? त्याचा विरोध फक्‍त मोदी अंकल आणि शहा अंकलना आहे!! 
उधोजीसाहेब : (संशयानं) कोण हा मोठा माणूस? नाव सांग, नाव!! 
विक्रमादित्य : (दुप्पट निरागसतेनं) ते म्हणाले, माझं नाव सांगू नकोस! बॅब्स उगीच टेन्शन घेतील!! 
उधोजीसाहेब : (पांघरुण फेकून देत उसळून) नाऽऽव सांऽऽग!! 
विक्रमादित्य : (एक डेडली पॉज घेत) नाव सांगू? की डायरेक्‍ट व्हिडिओ लावू? 
-ब्रिटिश नंदी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Dhing Tang British Nandi Artical