मी डोंबिवलीकर ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 14 मार्च 2018

आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब,
शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी साहित्यात सुप्रसिद्ध होती किंवा आहे. संदर्भ : उपनगरी रेल्वे टाइम टेबल.) आठ-बावनच्या गाडीला हमखास विण्डोसीट सर करणारा भाद्दर गडी म्हणून मला सदर पदवी मिळाली आहे, ह्याची नम्र जाणीव मी करून देतो. असो.

आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब,
शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी साहित्यात सुप्रसिद्ध होती किंवा आहे. संदर्भ : उपनगरी रेल्वे टाइम टेबल.) आठ-बावनच्या गाडीला हमखास विण्डोसीट सर करणारा भाद्दर गडी म्हणून मला सदर पदवी मिळाली आहे, ह्याची नम्र जाणीव मी करून देतो. असो.
पत्र लिहिण्यास कारण की आपण आमच्या गावाला घाणेरडे शहर असे म्हटल्याचे ऐकले. ऐकून वाईट वाटले ! काहीसा संतापही आला. ‘आमच्या डोंबिवलीला नावे ठेवणाऱ्या माणसाच्या मच्छरदाणीत शंभर डास घुसोत’ असा शापही द्यावासा वाटला. पण दिला नाही. कारण आम्ही डोंबिवलीकर कमालीचे सुसंस्कृत आहोत. किंबहुना डोंबिवली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी (राजधानीचा मान विले पार्ले!) म्हणून अभिमानाने ओळख सांगत होतो. डोंबिवली हे घाणेरडे शहर आहे आणि त्याला बऱ्याच अंशी डोंबिवलीकरच कारणीभूत आहेत, असे आपण खरेच म्हणालात का? विश्‍वास बसत नाही. सुशिक्षितांच्या गावाला घाणेरडे म्हणणे तुम्हाला सुचले तरी कसे?

डोंबिवलीबद्दल तुम्हाला फारच कमी माहिती आहे असे वाटल्याने सदर पत्र लिहीत आहे. प्रथम आमच्या गावाविषयी थोडेसे : डोंबिवली हे फार प्राचीन गाव आहे. शेजारीच कल्याण नावाचे आणखी एक प्राचीन शहर असून, पथरी पुलाने दोन्ही गावे एकमेकांना जोडली आहेत. फार प्राचीन इतिहासात डोकावण्याची गरज नाही, (कारण तो आम्हाला म्हायतच नाय!) पण मध्य रेल्वेचे रूळ पडल्यानंतर डोंबिवली हे गाव प्रसिद्धीस आले, इतके सांगितले तरी पुरे. डोंबिवली हे प्रामुख्याने दोन भागांत वसले आहे. ईस्ट आणि वेस्ट. हे भाग रेल्वेमार्गाच्या दुतर्फा आहेत. रेल्वे लाइन ही डोंबिवलीची लाइफलाइन आहे. शिवाय, डोंबिवली हे पूर्वापार सुशिक्षितांचे गाव आहे. सारांश, ट्रेनच्या प्रवासात निम्मे आयुष्य घालवणाऱ्यांचे हे गाव आहे. काटकसरीने छानसा संसार करणाऱ्या चाकरमान्यांचे गाव आहे. अशा आयुष्यात गावात घाण करायला डोंबिवलीकरांना वेळ कुठे मिळतो? जो मनुष्य दिवसाचे बारा तास गावाबाहेरच जातो आणि निव्वळ झोपण्यापुरता गावात येतो, त्याने घाण कुठे करायची असते? तुम्हीच सांगा!
...सकाळी उठावे. (कमीत कमी पाण्यात) आंघोळ आटोपून सात-सतरा किंवा आठ-बावन किंवा नऊ-तेवीसची लोकल पकडून नोकरीला जावे. योग्य वेळेत मस्टर गाठून पुरेशी चाकरी झाल्यावर सायंकाळी उशिरा घरी परतावे...येताना कानेटकरांच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या त्रिमूर्ती पोळीभाजी केंद्रातून दोनशे ग्रॅम मटार उसळ आणि पाच चपात्या असा झक्‍क ‘बेत’ आणावा. वरणभाताचा कुकर घरी लावावा, हा आमचा दिनक्रम आहे. ह्यात घाणेरडेपणाला स्कोप कुठे आहे?
असा वहीम आहे की गेल्या निवडणूक प्रचाराच्या टायमाला डोंबिवलीत आल्यावर तुम्हाला मजबूत डास चावले असणार ! त्यामुळे संतापून तुम्ही हे विधान केले असावे. आमच्या डोंबिवलीतले इमानी मच्छर हे पाहुण्यांना इंगा दाखवतात, हे खरे आहे. पण एकदा (रक्‍ताची) ओळख पटली की मग काही प्रॉब्लेम नसतो.
साहेब, भल्या माणसाने डासांचा राग उगीचच बिचाऱ्या माणसांवर काढू नये. उदार मनाने आमच्या गावी पाहुणचारास यावे. चार दिवस राहावे. हवी तर आम्ही तुम्हाला मच्छरदाणी बांधून देऊ. पण एकदा येऊन डोंबिवली हे सुशिक्षितांचे शहर आहे, असे म्हणून जावे. कळावे.

ता. क. : आमच्या (पक्षी : डोंबिवली ईस्ट हं!) फडके रोडच्या मॉडर्न क्‍याफेत वडासांबार बेस्ट ! कळावे. आपला. आठबावनकर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article