ईव्हीएम पत्रे! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय दादूराया, सप्रेम जय महाराष्ट्र! सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या शुभेच्छा...पत्र लिहिण्यास कारण की सध्या ईव्हीएम यंत्राने निवडणुकांमध्ये घातलेला धुमाकूळ आपण सारेच पाहतो आहोत. गेली चारेक वर्षे हा भयानक प्रकार चालू आहे. अनेक पक्षाच्या पुढाऱ्यांवर घरी बसण्याची पाळी आली, त्याला प्रामुख्याने हे भिकारडे यंत्र कारणीभूत आहे. त्या संदर्भात काही जोरकस पावले आपण साऱ्यांनी मिळून उचलावीत, असा उद्देश असल्यामुळे बऱ्याच निवृत्त व अर्धनिवृत्त पुढाऱ्यांना अशी पत्रे सध्या लिहीत आहे. वेळवखत पाहून ही पत्रे नंतर ग्रंथरूपाने प्रसिद्धही करीन, असे म्हणतो.

परंतु, (कसा का असेनास...) तू माझा भाऊ आहेस! म्हणून तुला हे स्पेशल पत्र!
ईव्हीएम यंत्रांबद्दल माझ्या मनात पहिल्यापासून कमालीचा संशय होता. वेगवेगळी रंगीत बटणे लावलेले एक दळभद्री यंत्र सत्तेत कोण बसणार हे ठरवते, हेच मला कबूल नव्हते. आपल्यासारख्या पुढाऱ्यांच्या भाषणांना लाखोंची गर्दी जमते. माझ्या भाषणांना तर मैदाने तोकडी पडतात. भेटणारा प्रत्येक जण ‘साहेब, आपलं मत तुम्हालाच...’ असे शपथपूर्वक सांगतो. पण निवडणुकीचा निकाल लागला की घरातल्या आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत यावेसे वाटत नाही! आपली एवढी मते जातात तरी कुठे? ती ‘कुठे’ जातात, हे कळलेले आहे, पण ‘कशी’ जातात हे मात्र अजून (कुणाला) कळलेले नाही...रातकिडा ओरडतो त्याचा त्रास फारसा होत नाही, तो लेकाचा कुठल्या सांदीसपाटीत बसून ओरडतो आहे, हे न कळल्याचा त्रास अधिक होतो, त्यापैकीच हे!!

तेव्हा आपण सर्व राजकीय पक्षांनी मिळून मागणी करायला हवी की निवडणुका जुन्या पद्धतीप्रमाणे कागदी मतपत्रिकांद्वारेच घ्याव्यात, व ही सारी इव्हीएम यंत्रे होळीत घालावीत!! हे होणार नसेल, तर निवडणुकींवर चक्‍क बहिष्कार घालावा, असे आवाहन मी करीत आहे.
कळावे. तुझाच सदू.
* * *

प्रिय सदूराया, तुझे पत्र मिळाले! ईव्हीएममुळे तुला गेली दोन-चार वर्षे बराच आराम मिळाला, हे तुझ्या पत्रावरुन दिसून येते. सर्वच निवृत्त आणि अर्धनिवृत्त पुढाऱ्यांना अशी पत्रे धाडण्याचा तुझा इरादा कौतुकास्पद आहे...पण मला पत्र धाडण्याचे कारण काय? मी निवृत्तही नाही आणि अर्धनिवृत्तही नाही. किंबहुना गेल्या चार वर्षांत माझ्याइतके बिझी कोणीच नव्हते. माझे उत्तम चालले आहे, हे कोणीही मान्य करील!! ईव्हीएमबद्‌दल आमच्याही मनात राग आणि संशय आहे. हे ‘कमळ’वाले आल्यापासून ते यंत्र अक्षरश: डोक्‍यात जाते. कुठलेही बटण दाबा, मत आपले त्या ‘कमळा’लाच...काय करावे हे कळत नाही!! जेव्हा जेव्हा मी मतदानाला जातो तेव्हा तेव्हा ते यंत्र उल्टेसुल्टे करून बघतो. काहीही सापडत नाही.

परंतु, काहीही असले तरी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची तुझी आयडिया त्याच्याही पलीकडची आहे. एकदम निवडणुकीवर बहिष्कार? वाह रे वा! तुझे पत्र वाचून आम्हाला शेपूट तुटक्‍या वानराची (की कोल्ह्याची?) गोष्ट आठवली. पाचरीत शेपूट अडकल्याने शेपटाला मुकलेल्या त्या चतुर प्राण्याने शेपूट हा अनावश्‍यक अवयव असून अखिल प्राणिमात्रांनी त्याचा त्याग करावा, अशी मौलिक सूचना केली होती म्हणे! तुझे तसे तर नाही ना?
तुमच्या पक्षात हल्ली ना कार्यकर्ते, ना नगरसेवक, ना आमदार आणि ना खासदार!! तुमचे काय जाते निवडणुकीवर बहिष्कार घालायला? भल्या गृहस्था, ‘पत्ते खेळण्याचा कंटाळा आला म्हणून झोपायला जाऊ या’, असे म्हणणाऱ्या रिटायर माणसासारखी तुझी मागणी आहे. बाकी सर्व क्षेम. तुझाच दादू.
ता. क. : तुझे पत्र म्हंजे निवडणुकीपूर्वी मागितलेली टाळी मानायची का? कळव. दादू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com