विन की बात! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’ म्हंजे जिंकणंसुद्धा बरं का! जीवनात तुम्ही खूप जिंकावं म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे. तेव्हा ऐका!

मित्रांनो, पहिली आणि दुसरीतल्या मित्रांसाठी प्रकाशकाकांनी दिलेली भेट मी तुमच्यापर्यंत पोचविणार आहे. ही एक मस्त दिवाळी भेट आहे! यापुढे तुमच्या परीक्षा क्‍यान्सल, क्‍यान्सल, क्‍यान्सल!! नो होमवर्क, नथ्थिंग!! फक्‍त खेळ, गाणी, मज्जा!! आणि हो, तुमच्या पाठीवरचं दप्तराचं ओझंसुद्धा मी एकदम कमी करून टाकणार आहे. पहिली दुसरीतल्या मित्र-मैत्रिणीनी फक्‍त दीड किलो वजनाचं दप्तर न्यायचंय शाळेत, डब्बा इन्क्‍लुडेड!!.. मज्जा आहे किनई? चला, दिवाळीच्या सुट्‌टीनंतर आणखी एक मोठ्‌ठी सुट्‌टी सुरू झाली असं समजा! भेटूया लौकरच.
 तुमचा लाडका विनोदकाका.
* * *

आता काही प्रतिक्रिया :
बंटी : प्रीय वीनोदकाका सा. नमसकार वीनंति वीषेश, पूस्तके बंद केली म्हणून थॅंक्‍यू. दप्तर उचलल्यामूळे माझी पाठ दुखली. आईने बाम लावून दिले. बाबा पण तीला म्हणत होता, की माला पण लाव ना बाम! तर आईने त्याला खूप मारले!! पण आता माझी पाठ दूखणार नाही. थॅंक्‍यू. तूमचाच बंटी. (इयत्ता दूसरी)
चिनू चापटणे : डिअर विनोदअंकल, मम्माने सांइतले की तुम्हाला लेटर लिहून मेनी मेनी थॅंक्‍स म्हण. म्हणून लिहिते आहे. काल संद्याकाळी मम्माला मी सांइतले की ‘‘माझा होमवर्क कर ना...सीरिअल काय बघते?’’ तर मी म्हणाली, ‘आता मला नो होमवर्क... तुला एग्झाम नाही, मला होमवर्क नाही!’ म्हंजे आता मम्मा नुस्ती सीरिअल बघणार! कारण माझा होमवर्क तिच करते... तरी पण थॅंक्‍यू. चिनू.
इलास इचलकरंजीकर : मा. विनोदकाका. मुजरा! मी अजून पूस्तकेच घेटलीच नव्हती. मोबाइल शाळंत नेला तर चालंल्का? कळवा. तरीही थॅंक्‍यू. इलू इच्या.
मिसेस धोपटकर : हॉनरलेबल श्री. विनोदजी, सर्वप्रथम दिवाळीच्या बिलेटेड शुभेच्छा. दिवाळीच्या सुट्‌टीत आम्ही उटी म्हैसूर करून आलो. खूप धमाल आली. आल्या आल्या बातमी मिळाली की चि. विनूला (हा आमचा विनू हं...विनेश!) परीक्षा आणि होमवर्क नाही म्हणून! अश्‍शी खुश झाले म्हणून सांगू!! सैपाकीणबाईला लग्गेच आलू परोठे करायला सांगितले आणि ह्यांना आईस्क्रीम आणायला पाठवले. (चि. विनूला खूप आवडते!) पण चि. विनू मित्राकडे स्लीपओव्हर करायला गेला... मग काय? आम्हीच खाल्ले आइस्क्रीम!! थॅंक्‍यू हं! आपलीच मिसेस धोपटकर ऊर्फ शैला.(चि. विनूची मम्मा. इयत्ता दुसरी.) इश्‍श! चि. विनूची इयत्ता दुसरी हं! मी ग्राज्वेट आहे!!
* * *

वरील प्रतिक्रियांना उत्तर :
प्रिय बालमित्र आणि त्यांचे पालक,
तुमच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, डोळ्यात पाणी आले!! पुढल्या ‘विन की बात’मध्ये उल्लेख करीन! माझ्या निर्णयांचे स्वागत केल्याबद्‌दल थॅंक्‍यू!.. मलाही लहानपणी दप्तराचे भारी ओझे व्हायचे. तेव्हाच मी ठरवले होते की शिक्षणमंत्री झालो रे झालो की पहिले ही दप्तरं उडवायची! मला होमवर्कही नको वाटे. तेव्हाच मी ठरवले होते की मंत्री झालो की होमवर्कला च्याट!! अजूनही मी होमवर्क करत नाही, म्हंजे बघा!! मित्रांनो, होमवर्क नाही केला तरी काहीही अडत नाही आयुष्यात!! कळलं? बेस्ट लक!
तुमचाच विनोदकाका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com