फक्त चार मिनिटांची भेट! (ढिंग टांग)
इतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ घालवावा की लगीनघाईत रमावे? इशारे द्यावेत की निमंत्रणे? वाटाघाटी कराव्यात की मुलाखती? राजियांची कोठली मोहीम कोठल्या दिशेने जाईल, ह्याचा भरवसा काही उरला नाही.
इतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ घालवावा की लगीनघाईत रमावे? इशारे द्यावेत की निमंत्रणे? वाटाघाटी कराव्यात की मुलाखती? राजियांची कोठली मोहीम कोठल्या दिशेने जाईल, ह्याचा भरवसा काही उरला नाही.
गाड्यांचा ताफा भरधाव निघाला. कोठे निघाले? इतिहासाने कुजबूज ऐकली. त्याने कान टवकार्ले. पुढील प्रसंग पाहोन आपल्या बखरीत नोंदवण्याचा निश्चयो केला...
घडले ते असे...
शिवाजी पार्कावरोन तडक निघालेली बिनीची फौज दीन गाजवीत मलबार किल्ल्याच्या बालेकिल्ल्याशी जावोन थडकली, तेव्हा प्रहरभर उलटोन गेला होता. ‘वर्षा’गडाचे बालेकिल्ल्यावरील खासे रक्षक नाही म्हटले तरी बेसावधच होते. नव्या डूटीवर सकाळीच आलेले रखवालदार दिवसाभराचा फक्त पाचवा चहा तर पीत होते.
किल्ल्याचें अलीकडे अवघ्या वावभर अंतरावर मोक्याचे ठिकाण येते. -तीन बत्ती नाका! ह्या ऐतिहासिक तीन बत्ती नाक्यास उजवी घालोन दुर्गम चढण चढोन वर्षागडावर चाल करोन जाणारा वीर विरळाच!! कां की दमछाक करणाऱ्या ह्या चढणीवरच गनिमाचे निम्मे सैन्य दमगीर होत्ये, ऐसा आजवरचा आनुभव! कैक वीरमर्दांनी तीन बत्ती नाक्यापरेंतच मजल मारिली. पुढे वर्षागडीं पोहोचे पोहोचेपरेंत त्यांचा कारभार आटोपला. प्रंतु येथे कोणी लेचापेचा गडी नव्हता. खुद्द राजे मोहीमशीर जाहलेले. खुद्दांचे उपस्थितीमुळे नवनिर्माणाचें फौजेस अपरंपार चेव चढलेला. आता लढाई आर या पार! ह्या नतद्रष्ट, खोटारड्या सत्ताधाऱ्यांची सिंहासने उलथीपालथी जाहल्याशिवाय राहाणे अशक्य!! (काकांनी दिलेल्या घड्याळात) दहा वाजोन पंचावन्न मिनिटे जाहलेली. ‘‘चला बेगीने चला, दम तोडो नका... गनिम टप्प्यात आहे!’’ ऐसा हाकारा जाहला. घाई उडाली. हे रण खातरीने जालीम होणार, ह्याची खूणगाठ पत्रकारांस पटली. ‘मलबारचे जुझ’ म्हणोन हा समरप्रसंग इतिहासात अमर होणार होता हे खरेच. त्याची नोंद करणे इतिहासाला टाळता आले नसतेच.
‘‘खाश्यांच्या गाड्या पुढे घ्या’ ऐसा हुकूम सुटला. शिस्तबद्ध फौज भरारा दुतर्फा पांगली. राजियांची गाडी थेट बालेकिल्ल्याच्या फाटकाशी भिडवोन त्यांनी किल्लेदाराकरवी आत सांगावा धाडला.- ‘राजे आले आहेत. स्वागतास तय्यार राहावे!’
‘‘कोण पायजेल?’’ सक्काळीच डूटीवर आलेल्या गेटवरील नव्या रखवालदाराने अनवधानाने विचारले. ही त्याची घोडचूक होती, हे त्यास थोडे उशिरा कळालें! कारण तोवर गाडीची कांच खाली करून राजियांनी त्यास प्रखर नेत्रज्वाळेने जवळ जवळ भस्मसात केले होते. बिचारा!
‘‘इथं कोण राहातं?’’ खास कमावलेल्या खर्जात राजियांनी रखवालदारास पुशिले.
‘‘कोनी का ऱ्हाहीना! आपनाला कोन हवं बोहोला!!’’ रखवालदार ऐक्कत नव्हता. एरव्ही ह्या औद्धत्याबद्दल त्यास कडेलोटाचीच शिक्षा झाली असती. पण राजे मोहिमेच्या व्यापक विचारात व्यग्र होते. अशा चिल्लर रखवालदारास कोठे मोजत बसायचे?
...येजमानांस सांगावा पोचला. वर्दी सुटली. बालेकिल्ल्याची शिबंदी तल्लख जाहली. राजियांची गाडी आत घेण्यात आली. ‘वर्षा’गडाच्या मोकळ्या माळावर राजियांची गाडी यू-टर्न घेत असतानाच राज्याचे कारभारी श्रीमंत नानासाहेब उपरणे सावरीत सामोरे आले. गाडीच्या खिडकीतूनच राजियांनी त्यांच्या हातावर तिळगूळ ठेवला. घरच्या मंगलकार्याची निमंत्रणपत्रिकाही हाती ठेविली. ‘या हं!’ एवढेच उद्गार त्यांनी काढले. कारभारी नानासाहेब ‘हो हो..नक्की!’ असे जेमतेम म्हणाले, तोवर गाडीचा यू-टर्न घेवोन झाला होता. उघड्या गेटमधोन राजियांची गाडी भरधाव बाहेर पडली.
...हे सारे चार मिनिटांत घडले!