उपोषण! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया.
आजचा वार : अनिवार.
आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार.
.............................

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया.
आजचा वार : अनिवार.
आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार.
.............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय काय करावे लागते, ह्याचे उदाहरण म्हणून ह्या भेटीकडे बोट दाखवता येईल. पण नेहमीप्रमाणे मोहीम फत्ते करून आलो, ह्याचे समाधान आहे. ती. अण्णांनी गाजराचा ज्यूस प्यावा म्हणून आम्हाला जे काही करावे लागले, त्यालाही उपोषणच म्हणतात!! आपोआप उपास घडल्यामुळे एका गुन्हेगाराला अवचित एकादशी घडल्यामुळे त्याला स्वर्गात जागा मिळाली, अशी एक कथा पूर्वी ऐकली होती. त्याची आठवण उगीचच झाली!! असो.
काही दिवसांपूर्वी ती. अण्णांनी उपोषणाची घोषणा केली, तेव्हाच खरे तर पोटात गोळा आला होता. ती. अण्णांचे उपोषण ही सत्ताधाऱ्यांसाठी सत्त्वपरीक्षा असते. ‘काहीही करा, पण अण्णांना गाजराचा रस द्याच!’ असा निरोप दिल्लीहून आला आणि मग कामाला लागलो. आमचे तंदुरुस्त मित्र ना. गिरीशभाऊ महाजन हे आमचे संकटमोचक आहेत. त्यांना बोलावून घेतले.
‘‘कस्संही करून ती. अण्णांच्या घशाखाली गाजराचा रस उतरवाच!’’ अशी गिरीशभाऊंना गळ घातली. ते म्हणाले, ‘‘काहीही काळजी करू नका. मी आहे!! आत्ताच राळेगणला जातो. दोन किलो गाजरं घेऊनच जातो!’’ ते तातडीने राळेगणला रवाना झाले. मग मी निर्धास्त झालो. आमचे गिरीशभाऊ वाघालाही गाजरे खायला लावतील असे आहेत. त्यांना बघून मला खरेतर हेवा वाटतो. गृहस्थ रोज भरपूर व्यायाम करतो. पण त्यांच्यानेही निभले नाही, हे प्रकरण! शेवटी बराच काथ्याकूट केल्यावर काल राळेगणला स्वत: जाऊन आलो.
‘‘अण्णा, सोडा ना आता उपोषण... घ्या ना गाजराचा रस!’’ चेहऱ्यावर शतप्रतिशत अजीजी आणून ती. अण्णांना गळ घातली. पण ते अजिबात ऐकेनात! ‘टिनोपाल, टिनोपाल, टिनोपाऽऽल’च्या (जुन्या जाहिरातीच्या) चालीवर त्यांचे आपले ‘लोकपाल, लोकपाऽऽल’ चाललेले होते.
‘‘मला गाजराचा ज्यूस आवडतो, म्हणून मी उपोषण करतो, असं वाटतं का तुम्हाला?’’ खोल आवाजात अण्णा म्हणाले. मी काही बोललो नाही. शेवटी म्हटले ‘आपण चर्चा करूया?’ तासाभरात अण्णा कंटाळून गाजराचा ज्यूस मागवतील आणि आपणही मिसळ खायला मोकळे होऊ असा माझा (राजकीय) अंदाज होता. पण अण्णांनी सहा तास किल्ला लढवला!! त्या सहा तासांत मला पाण्याचा घोटसुद्धा घेता आला नाही. समोर टीव्हीचे क्‍यामेरे होते. त्यांच्यासमोर उपोषणाला बसलेल्या अण्णांसमोर मी पाणीबिणी पितोय, हे कसे दिसले असते? केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अचूक वेळ साधत मोर्चा सोडला आणि काढता पाय घेतला. आमचे गिरीशभाऊ सारखे अधूनमधून बैठकीतून उठून जात होते आणि रुमालाने ओठबिठ पुसत येऊन बसत होते. यादवबाबा मंदिराच्या आसपास कुठे वडापावची गाडी तर लागत नसावी ना? ह्या शंकेने मला ग्रासले. मीही उठून बघून यायचा विचार करत होतो, पण ती. अण्णांनी तशी संधी दिलीच नाही. दर दहा मिनिटांनी ते ‘लोकपाल’ काढत. लोकपाल म्हटले की हल्ली अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. शेवटी खोल आवाजात अण्णांना म्हटले, ‘‘दिवसभर उपाशी आहे हो अण्णा!... आता तरी सोडा ना उपोषण!’’ अण्णांना बहुधा माझीच कणव आली असावी. त्यांनी शेवटी गाजराचा ज्यूस एकदाचा मागवला.  ...काल उगीचच उपास घडल्याबद्दल आज नाश्‍त्याला तीन प्लेट कांदेपोहे खाल्ले!! इति.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article