विमान खरेदी : काही दस्तावेज! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सर्वप्रथम आम्ही एक गोष्ट (नम्रपणे) स्पष्ट करतो, की आमच्याइतका जबर्दस्त ताकदीचा शोधपत्रकार सांपडणे एकूण कठीणच आहे. भल्या भल्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही लीलया उकरून काढली आहेत. ती उजेडात आणण्यापूर्वीच दुसरे कोणीतरी त्याची बातमी छापून मोकळे झाल्यामुळे आम्हाला आजवर त्याचे क्रेडिट मिळाले नाही, हा भाग अलाहिदा! परंतु, आम्हाला भ्रष्टाचाराची चीड इतकी जोरदार आहे, की श्रेयासाठी आम्ही फारसे उत्सुक नसतो. कुणीतरी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला म्हंजे झाले!! तूर्त आम्ही राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याचा माग घेत आहो.

सर्वप्रथम आम्ही एक गोष्ट (नम्रपणे) स्पष्ट करतो, की आमच्याइतका जबर्दस्त ताकदीचा शोधपत्रकार सांपडणे एकूण कठीणच आहे. भल्या भल्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही लीलया उकरून काढली आहेत. ती उजेडात आणण्यापूर्वीच दुसरे कोणीतरी त्याची बातमी छापून मोकळे झाल्यामुळे आम्हाला आजवर त्याचे क्रेडिट मिळाले नाही, हा भाग अलाहिदा! परंतु, आम्हाला भ्रष्टाचाराची चीड इतकी जोरदार आहे, की श्रेयासाठी आम्ही फारसे उत्सुक नसतो. कुणीतरी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला म्हंजे झाले!! तूर्त आम्ही राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याचा माग घेत आहो. ट्रकभर पुरावे (पक्षी : कागदपत्रे) आमच्याकडे जमा झाले असले तरी, सध्या ट्रक उपलब्ध नसल्याने ती प्रकाशात आणलेली नाहीत. ट्रक आला की पुरावे सादर करू.

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात ‘दाल में कुछ काला है’ हे स्पष्टच आहे. तशी काही कागदपत्रे आमच्या(ही) हाती लागली आहेत. सदर कागदातील टिपणांवरून लक्षात येते, की येथे लपवाछपवीचा मामला आहे. कारण ह्या कागदपत्रात एकही नाव धडपणी घेतलेले नाही. सगळे काही कोड्यात!! त्याचाच हा वानोळा देत आहो...
गोपनीय पत्रव्यवहार क्र. ३३३।१२।२०१८। ७.१५ सा.
डिअर सर, विमान खरेदीप्रकरणी आमचा चमू संबंधित प्यारिसमधील उत्पादकाशी वाटाघाटी करत असताना आणखी कुणीतरी (गुजराथी) व्यक्‍तीदेखील वाटाघाटी करत असल्याचे आढळून आले आहे. सदर गुजराथी व्यक्‍तीने साऱ्या मर्यादा ओलांडून ओलांडे नावाच्या फ्रेंच दुकानदाराशी संधान बांधून परस्पर बोलणी केली. एकाच दुकानात दोन गिऱ्हाइके एकच विमान खरेदी करण्यासाठी घासाघीास करू लागली, की काऊंटरपलीकडला शेठ गप्प उभा राहातो आणि दोन गिऱ्हाइके उगीच एकमेकांशी तंडू लागतात, तसा अनुभव तूर्त येत आहे. तरी दुसऱ्या व्यक्‍तीस दुसऱ्या दुकानात जाण्यास फर्मावावे ही विनंती. आपला. लाल ड्रॅगन.
* * *
डिअर लाल ड्रॅगन, आपण ओव्हर रिॲक्‍ट करीत आहात. दुसरी व्यक्‍तीही आपल्याच भल्यासाठी भाव पाडून मागत आहे, हे ध्यानी घ्यावे. फ्रेंच दुकानदार ओलांडे ह्यास त्याच्याशीच बोलू द्यावे. घासाघीस कशी करतात हे शिकून घ्यावे. शेवटी पैसा कुणाचा खर्च होणार आहे? पब्लिकचाच ना? तेव्हा तूर्त आपणच दुसऱ्या दुकानी जावे! आपला. चंदेरी पापलेट. (गोवा)
* * *
डिअर चं. पा., आपणांस पत्र लिहीत असण्याच्या काळात दुसऱ्या (गुजराथी) व्यक्‍तीने रेट फायनल करून विमाने उचलून नेलीदेखील! ओलांडेही दुकान बंद करून हसत हसत निघून गेला. आता आम्ही माचिस बॉक्‍स खरेदी करायला जाऊ का? कळावे. लाल ड्रॅगन.
* * *
डिअर ला. ड्रॅ., माचिस नको!! त्याऐवजी कानात घालायचे कापसाचे बोळे आणा! विमानात उपयोगी पडतात. ताबडतोब कार्यवाही करावी. चं पा.
* * *
प्रा. स्म. आ. मा. प्र. से. भा. स., आपण फ्रान्सला जाऊन काही विमाने आणल्याचे नुकतेच समजले. वास्तविक फ्रेंच बनावटीचे काहीही घ्यावे अशी स्थिती नाही. फ्रेंच लोकांना एरव्हीही भलत्याच गोष्टीत रस अधिक असतो!! वाइन बनवणारी माणसे विमाने कधीपासून बनवू लागली? असो.
चिनी बनावटीची विमाने स्वस्त आहेत, पण त्यांची ग्यारंटी नाही. अडीअडचणीला त्यांचाही विचार व्हायला हरकत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. आ. चं. पा.
...वाचकहो! अशी असंख्य पत्रे आम्ही आपणांसमोर उघड करू शकू. त्यातून राफेल विमानांमध्ये घोटाळा झालाय हे कळू शकेल. तोवर कानात (कापसाचे) बोळे घालून बसा! त्यांची डिलिव्हरी ऑलरेडी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article