esakal | मिश्‍या-माहात्म्य! (ढिंग टांग)
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

मिश्‍या-माहात्म्य! (ढिंग टांग)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने) धडपडत आहेत. आपापल्या छब्या सोशल मीडियावर झळकावीत आहेत. आम्हीही फार मागे नाही. महिना-दोन-महिन्यांत त्याचा पुरावा आम्ही देऊच! विशिष्ट प्रकारच्या मिश्‍यांची अशा रीतीने एकीकडे मशागत सुरू असताना आम्ही मिश्‍यॉलजी ह्या विषयात पारंगतता मिळवण्याच्या मिषाने (हे वेगळे!) अभ्यासाला लागलो आहो. ह्या मिशीशास्त्राचा माशीभर परिचय येथे देत आहो. (तोंडओळख म्हणणार होतो, परंतु,...राहू दे!) वाचकहो, मिश्‍या हा अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि प्रखर पौरुषाचा आविष्कार आहे. मिश्‍यांमध्ये व्यक्‍तिमत्त्व कमालीचे उठून दिसते. जीवनातील कुठल्याही क्षेत्राला हे मिश्‍यातत्त्व लागू आहे.

प्राणी गुहेत राहात असे, तेव्हाही त्याला मिश्‍या होत्याच. तथापि, त्या चेहराभर पसरलेल्या केसांच्या निबीड अरण्यामुळे दिसून येत नव्हत्या. कालांतराने मानवास धारदार शस्त्रांचा शोध लागला व आगीचा शोध लागल्यानंतर (वाटीभर) गरम पाणीदेखील मिळू लागले. साहजिकच तेव्हापासून दाढी घोटणे व मिश्‍या कोरणे, ह्या जीवनावश्‍यक कृतींचा प्रारंभ झाला, जो आजतागायत सुरू आहे. मिशी वाढवणे व कोरणे हे एक कौशल्य असून त्यासाठी विलक्षण एकाग्रता लागते. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’!!
मिश्‍या ह्या साधारणत: तीन प्रकारच्या असतात. एक, दाभणकाठी. दोन, माशीकट. आणि तीन, बंदुकबाज! दाभणकाठी मिशीला एक कलात्मक धार असते व ह्या टाइपची मिशी स्मितहास्यासोबत खुलते.(असे म्हंटात!) दाभणकाठी मिशी बरेच काही रोम्यांटिक बोलते. (असेही म्हंटात!!) दाभणकाठी मिशी ही तशी बऱ्यापैकी निरुपद्रवी असून फारशी टोंचणारी नाही. तथापि, सामान्य माणसाने माशीकट मिशीपासून हमेशा दोन हात दूर राहावे, असे आमचे मत्त आहे. कां की, माशीकट मिशीचा मालक हा हिटलरी वृत्तीचा निघू शकतो, असे इतिहासात दाखले आहेत. माशीकट मिशी ही साधारणत: खड्‌डूस माणसास शोभून दिसते. सदर खड्‌डूस माणसास आपण हास्यास्पद दिसतो, हेच मुदलात ठाऊक नसते.

आपण तूर्त बंदुकबाज मिश्‍यांबद्दल थोडके वैचारिक हॅंडल चालवू!! बंदुकबाज ऊर्फ हॅंडलबार मिशी ही एक प्रकारची अत्यंत भारदस्त मिशी असून ती व्हटांवर बाळगणारास शत्रू घाबरतो, हे उघड आहे.  ह्या मिशीची लागवड सोपी नाही. व्हटांवरील आणि नाकाखालील चिंचोळ्या पट्‌टीतून गालावरल्या विस्तृत माळारानाच्या सर्व्हेनंबरात ती निगुतीने न्यावी लागते. त्यास तलवार, जंबिया किंवा बंदुकीच्या दस्त्याचा आकार असावा लागतो. विरुद्ध गालावरही हे संतुलन अचूक सांभाळावे लागते. थोडक्‍यात, बंदुकबाज मिशी बाळगणे हे येरागबाळाचे काम नोहे.
बंदुकबाज मिश्‍या गाल-व्हटांवर बाळगणारा मनुष्यमात्र मराठीत कांदब्य्राच्या कांदब्य्राही लिहू शकतो, हे उदाहरणार्थ बरोबरच आहे. किंवा त्यास विनोदी काव्य प्रसवून ते पेशही करता येते वगैरे वगैरे. (मराठी साहित्यात सदर मिश्‍यांची उदाहरणे अमूप आहेत. पण ते असो.) बंदुकबाज मिश्‍यांची माणसे  पराक्रम गाजवू शकतात, हे आपण पाहिलेच. आमच्या मते सफाचट बरड मैदानाची मालकी मिरवणाऱ्या पाकिस्तानच्या वझीरेआझम इम्रान खान ह्यांना ‘कांप्लेक्‍स’ आला नसेल तरच आश्‍चर्य. ते काहीही असो.
हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! ब्राव्हो!!

loading image