बोटयात्रा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 20 मार्च 2019

जय गंगा मय्याकी! पुन्हा एकवार हा नश्‍वर देह पुनित जाहला आहे. पुन्हा एकवार पूर्वसंचित फळां आले आहे! मन कसे तृप्त जाहले आहे. तसे पाहू गेल्यास मी एक गुह्य नावाचा साधासुधा होडीवाला! परंतु तीन दिवसांपूर्वी नशीब फळफळले. देवलोकीचीच जणू अवतारमूर्त प्रकटली. आमच्या सर्वांच्या आवडत्या नेत्या प्रियंकादीदी अचानक समोर आल्या, मज म्हणाल्या : गुह्यदादा, वाराणसीला जायचे आहे. किती भाडे घेशील? आता एवढ्या मोठ्या नेतृत्वाला भाडे कोण सांगेल? नम्रपणे हात जोडले आणि म्हणालो : ताई, धन्य भाग सेवा का अवसर पाया... आपली सेवा करण्याची संधी मिळाली हेच आमुचे भाग्य.

जय गंगा मय्याकी! पुन्हा एकवार हा नश्‍वर देह पुनित जाहला आहे. पुन्हा एकवार पूर्वसंचित फळां आले आहे! मन कसे तृप्त जाहले आहे. तसे पाहू गेल्यास मी एक गुह्य नावाचा साधासुधा होडीवाला! परंतु तीन दिवसांपूर्वी नशीब फळफळले. देवलोकीचीच जणू अवतारमूर्त प्रकटली. आमच्या सर्वांच्या आवडत्या नेत्या प्रियंकादीदी अचानक समोर आल्या, मज म्हणाल्या : गुह्यदादा, वाराणसीला जायचे आहे. किती भाडे घेशील? आता एवढ्या मोठ्या नेतृत्वाला भाडे कोण सांगेल? नम्रपणे हात जोडले आणि म्हणालो : ताई, धन्य भाग सेवा का अवसर पाया... आपली सेवा करण्याची संधी मिळाली हेच आमुचे भाग्य. पण दुर्दैवाने आमच्या होडीचे शिड फाटले असून आमचा धंदा पंक्‍चर झाला आहे...’’
‘‘बोटीच्या शिडात हवा मी भरली तर?’’ दीदी आत्मविश्‍वासाने म्हणाल्या.
‘‘तर मग काहीच हरकत नाही, दीदी! मी आणि माझे साथीदार आपल्याला वाराणसीच्या अस्सी घाटावर सुखरूप पोहोचवू. बोट माझी, हवा तुमची... पण बाकी सारे क्षेम ही गंगामय्या पाहील!’’ मी म्हणालो.
‘‘बोट देशील पण गुह्यदादा, व्होट देशील ना?’’ प्रियंकादीदींनी खेळकरपणाने हसून विचारले. मतदानाचे हे गुह्य हा गुह्य कसा बरे फोडील? मतदान गुप्त असते. तरीही म्हणालो. ’देईन हो, देईन!’

...‘जय हो गंगा मय्या की’ अशी आरोळी ठोकून मनय्या घाटावरून नौका पाण्यात लोटली. दोन्ही तीरांवर भक्‍तगण ‘हात’ हलवीत उभे होते. दीदीस अभिवादन करत होते. दीदींनी शब्द दिल्याप्रमाणे आमच्या शिडात भराभरा हवा भरली. थोडा काळ गेल्यानंतर चोहीकडे पाणी आणि तीरावरले मतदार गायब अशी स्थिती निर्माण झाली. असे कसे चालेल? बोटीने तीराला धरूनच मार्गक्रमणा करणे उचित होते. त्यानुसार सुकाणू वळवले आणि पुन्हा बोट तीरानजीकच्या पाण्यात आणिली. पण तीरावर कुणीच नव्हते...
बराच वेळ दीदी काही बोलल्या नाहीत. आम्हाला वाटले की दीदींना बोट लागली! बोट लागली की माणसे आम्ही तातडीने आलेलिंबू मागवले. काही लोकांना बोट जाम लागत्ये. आलेलिंबू चोखीत बसून राहावे लागते. आम्हा नाखवा लोकांना बोट लागत नाही, हा एक गैरसमज आहे. एवढा अनुभवी नाखवा असूनही मला कधी कधी बोट लागते. मागल्या खेपेला आम्ही काही प्रयागतीर्थावरचे बांधव महाराष्ट्रात पर्यटनासाठी गेलो असता तांबड्या यष्टीची बसदेखील आम्हाला जाम लागली होती. तसेच तर काही दीदींना झाले नाही ना? काळजी वाटली...

‘नकोस नौके परत फियरु गं, नकोस गंगे ऊर भरु...’ हे सुप्रसिद्ध गीत आम्ही गुणगुणत वल्ही मारू लागलो. उणापुरा १४० किलोमीटरचा प्रवास. तीन दिवस वल्ही मारून मारून आमचे बावळे थकले. अखेर प्रयागराजच्या घाटावरून सुरू झालेली आमची गंगाजमनी तहजीब बोटयात्रा वाराणसीच्या अस्सी घाटावर संपली, तोवर आमच्या खांद्यांना कुणीही खांदा द्यायला उरले नव्हते!! अस्सी घाटावर पोचलो तेव्हा देवादिकांनीही पुष्पवृष्टी केली असावी. नाहीतर ऐन पाण्यात आमच्या खांद्यांवर (आणि नाकावर) फुले कोठून पडली असावीत? जाताना दीदींनी आम्हाला धन्यवाद दिले. पुढल्या वेळी नक्‍की भेटू असेही त्या म्हणाल्या. त्यावर आम्ही भाबडेपणाने त्यांना म्हणालो, की दीदी, पुढल्या वेळेला हाच प्रवास सव्वा तासात होईल. नमोजी आणि गडकरीजींनी इथला जलमार्ग एकदम टकाटक करायला घेतला आहे. मीसुद्धा एखादी रोरो बोट घेण्याचा विचार करतो आहे. देश बदल रहा है दीदी!’’
...तर दीदी भराभरा चालत घाट ओलांडून दिसेनाश्‍याच झाल्या. असो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article