दोस्ती काफी..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय मित्र उधोजीसाहेब, शतप्रतिशत नमस्कार. तातडीचे व गोपनीय पत्र पाठवीत आहे. पत्र घेऊन येणारे गृहस्थ माझ्या विश्‍वासातले आहेत. काळजी नसावी! पत्र लिहिण्यास कारण की आमचे कमळाध्यक्ष आदरणीय मा. मोटाभाई हे स्वत: आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या गांधीनगर येथे जाणार आहेत. ‘‘तुम्ही सोबत याल का?’’ अशी विचारणा त्यांनी माझ्याकडे केली. मी हक्‍काने ‘‘त्यात काय? लग्गेच पाठवतो’’ असे त्यांना सांगून टाकले आहे. तरी हे पत्र मिळताक्षणी तुम्ही टाकोटाक निघावे आणि गुजराथेत जावे ही विनंती. तुमच्याशिवाय ते अर्ज भरायला तयारच नाहीत. म्हणाले, ‘‘उधोजी नसतील, तर ह्या साऱ्याचा उपयोग तरी काय? अर्ज भरताना माझ्या उजव्या हाताशी ते हवेत!’‘ मला तुमचा विलक्षण अभिमान वाटला! म्हटले, आपला मित्र किती लोकप्रिय आहे!!

काही दिवसांपूर्वीपर्यंत मोटाभाईंना तुम्ही ‘आदिलशहा, औरंगजेब’ असे काय काय म्हणत होतात. एकदा तर त्यांना तुमच्यापैकी कुणीतरी ‘लाल गेंडा’ असेही म्हटलेले मी ऐकले. पण मोटाभाईंचे हृदय खूप खूप मोठे आहे. त्यांना तुमच्यावांचून आताशा करमत नाही. असो. ‘इतकी वर्षे आमची दुश्‍मनी बघितलीत, आता दोस्ती बघा!’ असे तुम्ही सांगितले होते. तुम्ही शब्द पाळला, ह्या जाणिवेने सद्‌गदित व्हायला होते. सदर पत्र घेऊन येणारा गृहस्थ एक पुडा व एक रिकामी वाटी घेऊन येईल. पुडा ठेवून घ्यावा. (त्यात गुजराथचा फेमस फाफडा आहे!!) आणि रिकाम्या वाटीत कृपया विरजण पाठवावे. आमच्याकडचे दही संपले आहे!! कळावे. आपला नम्र मित्र. नाना.
ता. क. : आमचे ईशान्य मुंबईचे खासदार मा. सोमय्या हे तुमची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कृपया त्यांना भेट देऊन उपकृत करावे. मा. सोमय्या हे आमचे एक चांगले कार्यकर्ते असून त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळीही आपण सोबत यावे, ही कळकळीची विनंती. आपला. नाना.
* * *
प्रिय मित्र नानासाहेब, जय महाराष्ट्र. तुमचे पत्र मिळाले. सूचनेनुसार तातडीने ब्याग भरायला घेऊन गांधीनगराकडे निघालो आहे. खुद्द मोटाभाईंनी आम्हाला सोळा मिस्ड कॉल दिले. शेवटी मीच फोन करून ‘येतोय’ असे कळवले आहे. पत्र आणणारा माणूस तुमच्या विश्‍वासातला आहे, असे तुम्ही म्हणालात, तेव्हाच आम्हाला संशय आला होता.- कमाल झाली!! ईशान्य मुंबईत तुम्ही ज्या माणसाला उमेदवारी देऊ पाहताय, तोच हा माणूस होता!! त्याला आमच्या लेखी क्षमा नाही.

सदर माणसाला मी गेले दहा-बारा दिवस भेट नाकारतो आहे, म्हणून कालच त्याने बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने आमचे घर ही वाघाची गुहा आहे!! बंगल्याच्या आवारात दोन दांडगे श्‍वान आहेत!! लहा लहा हसत उभे असलेले दोन कुत्रे पाहून सदर मनुष्य भिंतीवरच बराच वेळ बसून होता!! खाली उतरायला तयारच नव्हता. कोणीही सोमय्यागोमय्या आमच्या बंगल्यात असा प्रवेश करू शकत नाही, हे आपण जाणताच. भिंतीवरून परस्पर पसार झालेले हे गृहस्थ आज तुमचे पत्र घेऊन दारात राजरोस हजर!! ह्याला काय म्हणायचे? जाऊ दे.
‘मैंने एकबार कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता’ हा फिल्मी डायलॉग सलमान खानचा नसून आमचाच आहे! त्यांनी तो चित्रपटात वापरला, इतकेच. एकदा युती केली म्हंजे केली!!! मग मागे बघण्याचे काही कारण नसते. गांधीनगरला जायला निघतो आहे. सोबत साबुदाणा वड्यांचा डबा नेतो आहे... आमच्या मोटाभाईंसाठी! कळले? पुन्हा एकवार जय महाराष्ट्र. आपला  उ. ठा.
ता. क. : विरजण पाठवत आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com