बकासुर रिलोडेड! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

कोणे एके काळी (पक्षी : महाभारत काळात) अज्ञातवासात हिंडत राहिलेल्या पांडवांना एकदा मार्गात कृष्णद्‌वैपायन व्यास महर्षी भेटले. नमस्कारादी सोपस्कारानंतर व्यासांनी त्यांना सांगितले, की असे लपतछपत कां फिरता? नजीकच एकचक्रानगरी म्हणून एक गाव आहे. तेथे एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आश्रित म्हणून रहा. बरे पडेल! त्या काळी ‘मेकमायट्रिप’ आणि ‘त्रिवागो’ची सोय नव्हती, आणि ‘एअर बीएनबी’ची भन्नाट आयडियाही नव्हती. साहजिकच माता कुंतीने त्यांचे ऐकले व आपल्या पाचही वीरपुत्रांना घेऊन ती ब्राह्मणाघरी आली. ‘ब्रेकफास्ट अँड बेड’च्या अटीवर त्यांना जागा तर मिळाली. परंतु...तेथे काही समस्या होती. यजमान अस्वस्थ होते. यजमानीणबाई आवराआवर करीत होत्या. मुले गप्प होती.
‘‘मी जातो...नाहीतरी माझा काय उपयोग आहे?’’ यजमान खोल आवाजात म्हणाले.
‘‘तुमचा विमा काढलेला नाही. मीच जात्ये!’’ यजमानीणबाई व्यवहारीपणाने म्हणाल्या.
‘‘त्यापेक्षा मीच जातो...’’ मुलगा म्हणाला.
‘‘मी गेले तर?’’ मुलगी म्हणाली.
कुंतीस काही कळेना! ह्यांना कोठे जायचे असेल, तर आपण पुन्हा दुसरे (एअर बीएनबी) घर  
कुठे शोधत फिरायचे? ती विचारात पडली. आदल्या रात्री यजमानीण बाई अंधारात मुसमुसत असल्याचे ऐकून माता कुंती शेवटी उठून तिजजवळ गेली व तिने तिच्या पाठीवर हात ठेवून विचारले, ‘‘बेहनजी, क्‍या प्रॉब्लम है?’’ (हे वाक्‍य हिंदीतच उच्चारले असेल, असे नाही. पण इफेक्‍टसाठी बरे पडते...असो.)
त्यावर यजमानीण बाईने तिला सांगितलेला प्रकार असा होता :
...कुणी एक बकासुरनामक राक्षस गेली पाच वर्षे एकचक्रानगरीच्या वेशीवरील गुहेत (फुकट) राहत असून गाडाभर अन्न, दोन बैल आणि एक माणूस असा ‘आहार’ त्याला नागरिकांकडून दर सप्ताहास पाठवला जातो. त्याबदल्यात नगरीचे परचक्रापासून संरक्षण, अबलांना अभय, उद्योजकांना सवलती आणि किसानांना कर्ज देईन, असे बकासुराने मान्य केले आहे. दर सप्ताहास एकेक घर बैलगाडीत अन्न भरून बकासुराकडे अन्न पाठवते. दोन बैल आणि कासरा धरणारा माणूस हेदेखील त्याच्या आहाराचाच भाग आहेत. आज रात्री आमच्या घरातून हा ‘आहार’ जाईल...काय करू? माझे तर नशीबच फुटले. ऊऊऊऊऊ...
‘‘काळजी करु नकोस, बहिणी! मला पाच पुत्र आहेत. त्यातला एक जण बैलगाडी घेऊन जाईल. चालेल?’’ माता कुंतीने मोठ्या मनाने सांगितले. ब्राह्मणाने थोडा विचार केला आणि ‘हो’ म्हटले. येणेप्रमाणे अन्नपदार्थ तयार करून बैलगाडीवर चढवण्यात आले आणि कासरा भीमाच्या हाती देण्यात आला. ‘भीम पिकिंग अप युअर फूड’ असा मेसेज बकासुराला धाडला गेला असेलही. नसेलही. त्याकाळात ही सिस्टिम कशी होती हे कसे सांगणार?
पुढे सगळे तुम्हाला माहीत आहेच. भीमाने स्वत:च झोमॅटोगिरी करत गाड्यातील चांगलेचुंगले पदार्थ मधल्यामध्ये बकाबका खाल्ले. डिलिव्हरीची वाट पाहत बसलेल्या बकासुराने लेट का झाला म्हणून गुहेबाहेर येऊन पाहिले, तेव्हा भीमाने डबे चाटून पुसून फस्त करत आणले होते. साहजिकच त्यांची तेथे मरेस्तोवर मारामारी झाली. भीमाने बकासुराला उचलून आपटला. नाही म्हटले तरी रिकाम्यापोटी मारामाऱ्या जड जातातच. बकासुर हरला. निपचित पडला. भीमाने दोन्ही बैल आणि रिकामी बैलगाडी घरी परत आणली आणि माता कुंतीला म्हणाला : संकट टळलं, पण मला खूप भूक लागली आहे...’’
तात्पर्य : बकासुर पाच वर्षे एकचक्रानगरीत राहत होता, हे वाक्‍य वाचून तुम्ही लग्गेच ह्या गोष्टीचा संबंध निवडणुकीशी आणि राजकारणाशी जोडला असेल! पण तसे काही नाही! कळले? शेवटी येऊन येऊन येणार कोण, हे तुम्हाला माहिती आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com