संकटात ‘मोचक’! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय संकटमोचक गिरीशभौ, काल रात्रीपासून तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. स्विच ऑफ येतो आहे. अंमळनेरात प्रताप मिल कंपाऊण्डमध्ये झालेल्या इलेक्‍शनच्या सभेत घडलेल्या प्रकाराने तोंडचे पाणी पळाले आहे. तिथे जोरदार मारामारी झाली असे दिसते! टीव्हीवर पाहिले. मंचावर बसलेले कोण आणि मंचाच्या खाली बसलेले कोण, हेच कळत नव्हते. टीव्हीवरील बातम्यांमध्ये तुम्ही चपळाईने उठून उभे राहून एका माणसाला मंचावरून खाली ढकललेत, ते पाहून ‘है शाब्बाश’ असे ओरडावेसे वाटले. (काय फिटनेस आहे महाराजा!!) पण त्या तुंबळ युद्धानंतरच तुमचा फोन बंद झाला. लौकरात लौकर संपर्क साधून खुशाली कळवावी. उभा महाराष्ट्र (म्हंजे मीच) येथे तुमची वाट पाहतो आहे. कळावे. आपला. नानासाहेब फ.
ता. क. : संकटमोचकच संकटात सांपडला तर त्याचे मोचन कुणी करायचे? नाना.
* * *
आदरणीय माननीय ना. नानासाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. मी अगदी ठीक आणि सुरक्षित आहे. काळजी नसावी. अंमळनेरच्या सभेत पाच-सात मिनिटे तुंबळ मारामारी झाल्याचे मलाही समजले ते उशिरा! कारण बऱ्याच वेळाने मला भान आले. मी तेथेच होतो, पण मला ती पाच-सात मिनिटे युगांसारखी वाटली. नेमके काय होते आहे, हे कळायलाही मार्ग नव्हता. झाले ते असे...
मंचावरील गाद्यागिर्द्यांवर आरामात मांडी घालून बसलो होतो. आजूबाजूला आपले उमेदवार, नेते, आमदार उपस्थित होते. ‘‘खूप गरम होऊन ऱ्हायले आहे’’ असे आम्ही एकमेकांना सांगत असतानाच अचानक खाली बसलेले काही कार्यकर्ते येऊन वादावादी करू लागले. (आमच्या जळगाव-अंमळनेरची भाषा अशा वेळी काय काय वळणे घेईल, हे सांगता येणे अवघड!) मंचावरीलच एका (नाव छापून आले आहे.) पुढाऱ्याने उठून माजी आमदार पाटील ह्यांना उताणे पाडले. ‘‘अरे अरे, काय करून ऱ्हायला?’’ असे विचारण्याआधीच कल्लोळ उडाला. माझ्या आसपास फक्‍त पायच दिसत होते. कारण मी बसलो होतो, बाकी मारामारी करणारे उभे होते.
साहेब, मी रोज दोन तास व्यायाम करतो. माझे शरीर अत्यंत चपळ आहे. तात्काळ दोन्ही हात मागल्या बाजूला टेकवून मी दोन्ही पाय दांडपट्ट्यासारखे फिरवले. एका संतप्त कार्यकर्त्याने खालून मंचावर झेप घेतली. ती मी लीलया हुकवली. तोवर बॅटमॅनसारखा मंचावर उडी मारून आलेला तो कार्यकर्ता हवेतच असताना मी विलक्षण चपळाईने त्याचा फक्‍त मोहरा (हवेतल्या हवेत) फिरवला. उलट्या वेगाने तो परत मंचाखाली कोसळला. तोवर पाटीलसाहेबांना मारकुट्यांनी घेरले होते. अभिमन्यूसमान लढणाऱ्या पाटीलसाहेबांना मारकुट्यांच्या कोंडाळ्यातून बाहेर काढण्याचे काम कठीण होते. पण त्यांच्याभोवती बागडणाऱ्या पायांमध्ये वेगाने घुसून मी पाटीलसाहेबांना त्या चक्रव्यूहातून ओढले आणि (काही कळायच्या आत) त्यांना बाहेर काढले. मारकुट्यांचे कोंडाळे दुसऱ्याच कोणाला तरी बुकलत राहिले. त्या दंगलसदृश प्रसंगात सर्वात करुण अवस्था पोलिसांची होती. एक पोलिस निरीक्षक मकरंद अनासपुरेची अवकळा चेहऱ्यावर आणून वीरासनात बसून राहिला होता. त्याला उठताही येईना की बसताही येईना. मी त्यालाही मदतीचा हात दिला.
‘‘उठा!’’ मी हात देत म्हणालो.
‘‘कंबरेत अडकलो जी! स्टेरिंग लॉक झालं जी आमचं!’’ तो विव्हळत म्हणाला. (हे आपल्या लॉ अँड ऑर्डरसारखेच!!) गपचूप तेथून सटकलो. मी सुरक्षित आहे आणि मला मारहाण झालेली नाही, ह्याची आता खात्री पटली का? आपला आज्ञाधारक गिरीशभौ.
ता.क. : महानारायण तेल आणि दुखदबाव लेप लावून पडलो आहे. अंगदुखी थांबल्यावर भेटायला येतोच. कळावे. गि. मा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com