दुई हजार की बात! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आ दरणीय नमोजीहुकूम सतप्रतिसत प्रणाम. आपकी अनुग्या के अनुसार परचार के कार्य में पूरी क्षमता औ’ शक्‍ती के साथ लगा हूं. इस बखत बिहार के कृषकों के जीवन में हरित क्रांती लाने हेतु हम काम में जुटे है...(पुढील मजकुराचा तर्जुमा मराठीत...शुद्ध तूप संपले!) निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण देशभर फिरत आहात, आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते काही प्रांतांत जीवाचे रान करत आहेत. देशाचा गृहमंत्री असलो तरी मी पक्षाचा एकनिष्ठ आणि निरलस कार्यकर्ता आहे, हे आपण जाणताच. ‘पहिले देश, फिर दल...अंत में स्वयं’ हे बोधवाक्‍य माझ्या मनावर कोरलेले आहे. पक्षात आणि पक्षाबाहेरही माझी प्रतिमा ही अत्यंत सज्जन, मितभाषी आणि शुद्ध मानली जाते. (इतिहास हे वाक्‍य लक्षात ठेवेल, ही आशा आहे.) पक्षाचा साधासा अध्यक्ष असताना मीच आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते, हे आठवते का? तेवढी एक गोष्ट सोडता माझ्या नावावर आजवर एकही गुन्हा नाही.
सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सध्या बिहारमध्ये प्रचार करत आहे. बिहारमधील एका गावात झालेल्या प्रचारसभेत माझ्यावर गंभीर पेचप्रसंग ओढवला.
समोर माझे किसानभाई आणि भगिनी बसल्या होत्या. त्यांना बघून मला हुरूप आला. म्हटले आपणही तुमच्यासारखे करून पाहू!! त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या बकवास ‘न्याय’ योजनेवर टीका करून झाल्यावर मी प्रधानमंत्री किसान योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गरीब किसानांच्या खात्यात तुमच्या लाडक्‍या चौकीदाराने वर्षाला सहा हजार रुपये टाकायला सुरवात केली असून, दोन हजारांचा पहिला हप्ता तुम्हाला मिळालाच असेल, असे मी गर्वाने विचारले. माणूस एखाद्याला हातउसने पैसे देतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कर्णाची कळा असते. आपल्याइतका दिलदार माणूस उभ्या दुनियेत नसेल, असे त्याला वाटत असते. मलाही तसेच काहीसे वाटत होते. पण...
‘‘दुई हजार मिले की नहीं मिले?’’ मी व्यासपीठावरुन विचारले. मी हा सवाल करताच सभेत बसलेल्या काही शेतकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले. प्रत्येकाला वाटत होते की शेजारी बसलेल्याला मिळाले असले पाहिजेत! आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे जास्त पैसे कायम असतात, असे माणसाला वाटत असतेच. माझ्या खात्यापेक्षा गडकरीजींचे खाते अधिक चांगले आहे, असे मला सुषमादीदीही मध्यंतरी सांगत होत्या. असो.
‘‘ज्यांना कुणाला मिळाले, त्यांनी हात वर करा!’’ मी व्यासपीठावरुनच ओरडलो. पुन्हा किसानांनी एकमेकांकडे पाहिले. एकही हात वर आला नाही. अरेच्चा! कोणालाच कसे दोन हजार मिळाले नाहीत? मला फार आश्‍चर्य वाटले. पण ज्यांच्याकडे खिशात फद्याही नसतो, तेच लोक काखा-बगला वर करतात, असे वाटून मी त्या प्रश्‍नाचा नाद सोडला. दोन हजार मिळालेला किसान काखा-बगला कशाला वर करील?
‘‘लगता है किसीको मिले नहीं है...’’ मंचावर बसलेले सुशासनबाबू ऊर्फ मा. नितीशकुमारजी पुटपुटले. ओठांच्या कोपऱ्यातून कुचकट हसताना त्यांना मी पाहिले. भयंकर राग आला. पण मला काही बोलता येईना. ‘‘असे कसे होईल? कोणाला तरी मिळालेले असलेच पाहिजेत...’’ असे काहीबाही पुटपुटत मी तसाच उभा राहिलो. शेवटी ‘‘येतील, येतील! खात्यात येतील हं...’’ असा दिलासा देत मी भाषण गुंडाळले.
माझे दोनच प्रश्‍न आहेत. उत्तरे द्याल का?
एक, दुई हजार खरंच देण्यात आले आहेत, की संकल्पपत्रातली नुसती ओळ? आणि दोन, पुढल्या भाषणात मी ‘आठ कोटी शौचालये, दोन कोटी घरे आणि हर घर में बिजली,’ ह्यांचा उल्लेख करावा की नाही? कळावे. आपला.
एक सामान्य पक्षकार्यकर्ता. राजनाथसिंह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com