अर्थ आणि अनर्थ (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय नवमतदार वाचकांनो, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या महासोहळ्याला (कधीच) प्रारंभ झाला असून, ह्या सोहळ्यात सारा देश (टप्प्याटप्प्याने) सहभागी होत आहे. आतंकवाद्यांकडे जसे ‘आयईडी‘ नावाचे स्फोटक असते, तसे आपल्याही खिशात ‘व्होटर आयडी’, असे उद्‌गार आपल्या सर्वांचे महालाडके प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांनी काढल्याने आम्ही सलग अर्धा तास निपचित पडलो होतो. आपल्या खिशात असले काहीतरी भयंकर सापडल्यास पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, ह्या भयाने आमची बोबडी वळली. परंतु ही वस्तू लोकशाहीचा प्रतिपाळ करणारे महान ओळखपत्र असल्याची खात्री पटल्याने आम्ही आता ५६ इंची छाती काढून हिंडू लागलो आहो.
मुद्दा एवढाच, की मतदानाचे लोण आता तिसऱ्या टप्प्यात आले आहे. तब्बल काही कोटी (आकडा गुलदस्तात) नवमतदारांना पहिलेपणाची चव चाखावयास मिळणार असल्याने ह्या एकंदरच सोहळ्याबद्दल त्यांस ज्ञानांमृत पाजणे आवश्‍यक आहे. पूर्वीचे काळी नवविवाहितांना मार्गदर्शन करण्यासाठी घरातील काही बुजुर्गांची गरज पडत असे. त्याच चालीवर आम्ही सदर मार्गदर्शन करीत आहो.
माझ्या प्रिय नवमतदारांनो, प्रचाराच्या दरम्यान आपण चिक्‍कार भाषणे ऐकली असतील. त्यातील अनेक वाक्‍ये रिपीट का होतात, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. त्याच वाक्‍यांचा अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ सांगण्यासाठी आम्ही इथे बसलो आहो!
वाक्‍य पहिले : लोकशाहीचा हा महान सोहळा आहे. त्यात सहभागी होणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यचि आहे.
अर्थ : उन्हे तापली असली तरी लेको, घरातून निखळा आणि आमच्या डोंबलावर एकदाची मते टाका!
वाक्‍य दुसरे : धर्म, जातपात, पंथ सारे काही विसरून सारा देश मतदानाच्या पवित्र कार्यात उतरून जगतासमोर लोकशाहीचे उज्ज्वल उदाहरण ठेवत आहे.
अर्थ : फोडा, फोडा डोकी एकमेकांची! बसा उरावर! काढा अब्रू एकमेकांची, करा चिखलफेक... काहीही करा, पण आम्हाला मतदान करा, म्हंजे झालं!
वाक्‍य तिसरे : प्रत्येकाने नीरक्षीरविवेक वापरून मतदान करावे.
अर्थ : ह्याचा अर्थ थोडा अवघड आहे. कारण नीरक्षीरविवेक हा शब्द रस्त्यात पडलेल्या ओंडक्‍यासारखा येथे आडवा पडला आहे! शब्दार्थाचे जाऊ दे. ह्या वाक्‍याचा अर्थ : सबकुछ ट्राय करो, लेकिन बाद में सही याने की हमकू चुनो!!
वाक्‍य चौथे : देशाच्या विकासासाठी आम्ही हातमिळवणी केली आहे!
अर्थ : इथे ‘देश’चा अर्थ ‘आम्ही’ असा घ्यावा!
वाक्‍य पाचवे : ईव्हीएममध्ये अनेक घोटाळे आहेत! निवडणूक कर्मचारी प्रशिक्षित नाहीत, शिवाय उन्हाळ्यामुळे अनेक ईव्हीएम यंत्रे काम करत नाहीत! ह्याला निष्पक्ष निवडणूक म्हणता येणार नाही...
अर्थ : मतमोजणीनंतर आमचे बारा वाजले तर काय बोलायचे, ह्याची तजवीज वरील वाक्‍यात आहे.
वाक्‍य सहावे : देश रसातळाला चालला आहे. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून देशात दुही माजली आहे.
अर्थ : मीच रसातळाला चाललो आहे. आमच्याच अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, निवडणुकीतला खर्च काढण्यासाठी सत्तेशिवाय तरणोपाय नाही.
वाक्‍य सातवे : जनतेच्या मनात काय आहे, हे मतमोजणीच्या दिवशीच कळेल.
अर्थ : काहीही टोटल लागत नाही! उगीच अर्ज भरला, असे वाटण्याची वेळ कृपा करून आमच्यावर आणू नका!
वाक्‍य आठवे : गरिबी नष्ट करणे, हे सत्ताधाऱ्यांचे पहिले काम आहे आणि सत्तेवर आल्यावर आम्ही गरिबी नष्ट करूच!
अर्थ : हे वाक्‍य सोपे आहे, फक्‍त गरिबी ह्या शब्दाआधी ‘आमची’ हेही म्हटलेले गृहीत धरावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com