कोणी केला प्रचार? (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 4 मे 2019

नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र गडावर सक्‍काळीच जाग आलेली पाहून पार्काडातील वस्ती सावध झाली. आता काय नवीन घडत्ये? परमेश्‍वरास ठाऊक...जगदंब जगदंब.

नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र गडावर सक्‍काळीच जाग आलेली पाहून पार्काडातील वस्ती सावध झाली. आता काय नवीन घडत्ये? परमेश्‍वरास ठाऊक...जगदंब जगदंब.
गडाच्या बालेकिल्ल्यात चहाच्या कोपबश्‍यांची किणकिण सुरू झाली, तशी अमात्य बाळाजीराव नांदगावकरांनी उपरणे झटकून राजियांच्या दालनात प्रवेश केला. संवाद साधण्याची हीच खरी वेळ. ‘‘मुजरा, साहेब! आपल्या मोहिमेचे पडसाद अजुनी उमटत आहेती! एकंदर मोहीम फत्ते जाहली, असे म्हणावयास हवे!’’ विनम्रपणे बाळाजीरावांनी स्तुतिसुमनांनी संवादास प्रारंभ केला.
‘‘फुर्रर्र!...फुरुक..!’’ राजे म्हणाले. किंचित चमकलेल्या बाळाजीरावांनी हळूचकन पाहिले. राजियांनी चहा बशीत ओतला होता.
‘‘‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणताच मऱ्हाटी रयत हास्यफवाऱ्यांनी उसळून उठली!,’’ बाळाजीराव पुढे म्हणाले. एवढे बोलिल्यानंतर आणखी एक कोप चहा मुदपाकखान्यातून बाहेर येईल, अशी त्यांची अटकळ होती. पण...
|
‘‘फुर्रर्रर्रर्र.....फ्रीकिक..!’’ राजियांच्या बशीतला चहा फवाऱ्याच्या रुपाने बाळाजीरावांच्या अंगरख्यावर आला. त्यांनी शांतपणे रुमाल काढून चहाचे शिंतोडे टिपले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ मोहिमेच्या आठवणींनी मोहरलेल्या राजियांचे मन एकदम खुशालले. त्या विराट सभा. ती अफाट गर्दी. तो अचाट प्रतिसाद...‘लाव रे तो व्हिडिओ’ ह्या शब्दांनी जणू उपस्थित लाखो श्रोत्यांवर गारुड होत असे. टाळ्यांचा कडकडाट. हास्याचा गडगडाट...आणि त्या नतद्रष्ट कमळवाल्यांच्या छातीतला धडधडाट अस्मान भेदून जाई. ‘लारेतोव्ही’ मोहिमेसारखी मोहीम ना कधी झाली, ना कधी होणार! महाराष्ट्राला पडलेले ते मनोहारी व्हिडिओस्वप्न होते...
‘‘बहु मझा आला...नाही?’’ दिलखुलासपणे राजे म्हणाले.
‘‘बहु बहु!’’ बाळाजीरावांनी रुकार भरला. दुसरा इलाजच नव्हता.  ‘‘चहा घेणार?’’ बाळाजीरावांवर खूश होऊन राजियांनी विचारले.  ‘‘घेतला आत्ताच!,’’ अंगरख्याकडे नजर टाकून बाळाजीराव पडेल सुरात म्हणाले.
‘‘आमचं आक्रमण असतंच असं जोरदार! एक घाव दोन तुकडे!! आमचं इंजिन कोण रोखितो, तेच आता पाहातो! घी देखा लेकिन बडगा नहीं देखा!’’ दातओठ खात राजे म्हणाले. चहाची कोपबशी त्यांच्या हातात शस्त्रासारखी चमकत होती. राजे उत्साहाने नुसते खदखदत होते. बाळाजीरावांनी मनाशी ताडिले की हाच तो क्षण, हीच ती वेळ...मसलत सांगून टाकावी.
‘‘साहेब, पण एक अडचण निर्माण झाली आहे. अपेक्षेप्रमाणे दुश्‍मनाने अखेरचा डाव टाकिला आहे! निवडणुकीच्या काळात साहेबांनी घेतलेल्या प्रचार सभांचा सगळा खर्च तपशीलासकट सांगावा, अशी नोटीस आली आहे! आता काय करायचे?,’’ बाळाजीरावांनी अखेर मनाचा हिय्या करून विषय काढला.
‘‘त्यात कसला आहे खर्च? हॅ:!!’’ राजियांनी हातानेच तो विषय जणू किर्कोळ बाब असल्यागत झटकला.

‘‘सदरील प्रचार सभांचा खर्च कोणी केला? किती केला? कां केला? ते त्वरित कळविण्याचे फर्मान नुकतेच प्राप्त झाले आहे! मघाशी म्हणालो, त्याप्रमाणे हा दुश्‍मनाचा कुटिल आणि अखेरचा डाव आहे, साहेब! आपला एकही उमेदवार रिंगणात नसताना ते आपल्याला जाब कसा विचारू शकतात?’’ बाळाजीराव तावातावाने युक्‍तिवाद करीत राहिले. राजे शांतपणे सारे ऐकत होते. बाळाजीराव बराच वेळ बोलत होते. हाताची घडी आणि तोंडावर रुमाल ठेवून राजे ऐकत राहिले. (खुलासा : हाताची घडी घातल्यावर तोंडावर रुमाल कसा ठेवणार? असा प्रश्‍न विचारू नये. ठेवतात म्हंजे ठेवतात!) अखेर एक नि:श्‍वास सोडून ते म्हणाले-
‘‘आम्ही घेतल्या त्यांना प्रचार सभा कसं म्हणता येईल? कोणी केला प्रचार? कोणाचा? कधी?’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article