esakal | पाठराखण (ढिंग टांग)
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

पाठराखण (ढिंग टांग)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दमल्या भागलेल्या सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षाशी उभ्या राहून मुसमुसताहेत. पदराला नाक पुसताहेत. तेवढ्यात ‘हर हर हर हर महादेऽऽव’ अशी आरोळी घुमते. पाठोपाठ लखलखती तलवार फिरवत साक्षात राजाधिराज उधोजी महाराज प्रविष्ट होतात. अब आगे...
उधोजीराजे : (गरागरा डोळे फिरवत) हमारे दुश्‍मन की ये मजाल! ज्यादा गमजा कराल, तर गाठ ह्या उधोजीशी आहे म्हणावं!
कमळाबाई : (गडबडून डोळे पुसत) अगं बाई!! काही दगाफटका झाला का? कुणाशी झगडताय इतकं?
उधोजीराजे : (गवाक्षातून बाहेर बघत) लेको, जीभ हासडून माहिमी हलव्यासारखी तळहातावर ठेवीन! डोळे काढून कंदी पेढ्यासारखे वाटीन!! (तिसरी उपमा न सुचून) हात कलम करून बंबात घालीन!!
कमळाबाई : (मुसमुसत) नको, नको असं नका बोलू!!
उधोजीराजे : (तलवार खाली आणत) का?
कमळाबाई : (डोळे पुसत) किती भिकार उपमा सुचतात तुम्हाला! शी:!! आम्हाला नाही आवडत!
उधोजीराजे : (वरमून) बरं...ऱ्हायलं! नाही बोलत!
कमळाबाई : (खोल आवाजात) कुणाशी दोन हात करत होता?
उधोजीराजे : (त्वेषानं) तुम्हालाच टाकून बोलणाऱ्या त्या दुश्‍मनांशी! आमच्या प्रिय कमळाबाई सरकारास अधिक उणा बोल लावणाऱ्याचं तळपट झालंच म्हणून समजा!! चहावाली काय, चोर काय, खुनी काय...जीभ दिली आहे म्हणून काहीही बोलावं? आणि तुम्ही काहीही ऐकून घ्यावं?
कमळाबाई : (दु:खी सुरात) जाऊ दे हो! तुम्ही कशाला इतकं मनावर घेताय! लोक आम्हाला बोलतात, तुम्हाला नव्हे! म्हटलं एखाद्यानं आम्हाला हजार वेळा चोरटी... तुम्हाला काही तोशीस नाही लागायची!
उधोजीराजे : (विर्घळून) असं कसं? झालं गेलं विसरून पुन्हा गुण्यागोविंदानं एकत्र यायचं असं आपलं ठरलं, तेव्हाच आमचा शब्द गेला होता... आठवतंय?
कमळाबाई : (ओठ काढून) नाही हो आठवत!
उधोजीराजे : (मिशीला पीळ देत) आम्ही म्हटलं होतं की पाच वर्षांचा बेबनाव बघितलात, आता आमची दोस्ती बघा! म्हटलं होतं की नाही?
कमळाबाई : (विषण्णपणाने) ते खरंय हो... पण आमच्यासाठी तुम्ही इतके कष्टी नका बाई होऊ! आम्हाला त्यांनी चोरटी म्हटलं, तर आम्हीही त्यांच्या तीर्थरूपांचा उद्धार केलाच ना?
उधोजीराजे : (कोमल स्वरात) एखादीला सतत कुणी टोचून बोललं तर ती एकदा तरी फणा काढीलच की नाही? की शिवीगाळ करणाऱ्याला घरी चहाला बोलावील? अशा असहाय अबलेच्या पाठी उभं राहाणं हे ह्या उधोजीचं कर्तव्य नव्हे काय?
कमळाबाई : (मंचकावर पाठ वळवून बसत) आमच्या लढाया आम्ही लढू! आमच्यामुळे तुम्हाला किती मनस्ताप सहन करावा लागतो! आमच्यासाठी तुम्ही तलवार उपसून धावलात, ते बघूनच कृतकृत्य झाले मी! आपण आमच्यासाठी उसळून उठलात, त्यासाठी दुश्‍मनाचे लाख लाख आभार मानायला हवेत बरं!!
त्यांनी आम्हाला अपशब्द उच्चारले नसते, तर स्वारी इतकी खवळली नसती, आणि आमच्यावरील प्रेमाचं दर्शन घडलं नसतं! देव करो, आणि दुश्‍मन आम्हांस आणखी बोल लावो..!
उधोजीराजे : (पार विकेट उडून) तुमच्या रक्षणासाठी हा उधोजी सदैव निधड्या छातीनिशी सामना करील, ही आम्हाला आण आहे!! निश्‍चिंत राहा, विजयाकडे घोडदौड करा! यश तुमचंच आहे! खचू नका, भिऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत!!
कमळाबाई : (हंबरडा फोडत) नका हो, नका असं बोलू!
उधोजीराजे : (हळूवारपणे) काय झालं बाईसाहेब?
कमळाबाई : (डोळे पुसत) सहा महिन्यांपूर्वीपर्यंत तुम्ही आम्हाला अस्संच टोचून बोलत होता, त्याची उगीचच आठवण झाली!!

loading image