ढिंग टांग : प्रचार : समारोपाचे चिंतन!

dhing tang
dhing tang

प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात चिटपाखरू नाही. कोपऱ्यात न वापरलेल्या प्रचारसाहित्याचा एक छोटासा ढीग तेवढा दिसतो आहे. फार दिवसांनी कार्यकर्ते आपापल्या घरांचे पत्ते शोधत स्वगृही गेल्याचे हे लक्षण आहे. होय, हाडाच्या कार्यकर्त्यांना प्रचाराची रणधुमाळी संपली की दोन महत्कार्ये पार पाडावी लागतात. स्वत:चे घर हुडकणे आणि त्या घरात यशस्वीरीरत्या प्रवेश मिळवून दाखवणे! आमच्या माहितीतल्या एका कार्यकर्त्याने प्रचार आटोपल्यावर रात्री उशिरा स्वत:चे घर शोधण्यात यश मिळवले, परंतु, त्याच्या पत्नीनेच दरवाजा उघडून ‘कोण हवाय?’ असे डोळे चोळत विचारले. सदर कार्यकर्त्याने अखेर आपले मतदार ओळखपत्र दाखवूनच घरात प्रवेश मिळवला. ‘आलात सतरंज्या उचलून?’ अशा शब्दांत त्यास धारेवर धरण्यात आले. त्याला उलट उत्तरेही देता येईनात. कारण घोषणा देऊन देऊन त्याचा आवाज पार बसला होता.

उमेदवारांची अवस्था कार्यकर्त्यांपेक्षा वेगळी नाही. आमच्या माहितीतील एका उमेदवारास प्रचार संपताक्षणी धर्मपत्नीने गाडी धुवावयास लावली. ‘गाडीचा टेम्पो केलाय नुसता’ अशी जहरी टीका त्यास घरी ऐकावी लागली. बहुसंख्य उमेदवारांनी आपापले मोबाइल फोन स्विच ऑफ करून पलंग गाठला आहे. काल परवापर्यंत ह्या घरात अहर्निश चहापाण्याचे अग्निहोत्र चालू होते, तिथे आज बहुधा डाळराईसचे पार्सल मागवले जाईल, अशी शक्‍यता आहे. आपल्या घरच्यांनी तरी आपल्याला मते दिली असतील का? ह्या संशयाने सदर उमेदवारास झोप लागली नाही. घरीच घडलेल्या अपमानांचा सूड म्हणून उमेदवाराने पुढील पाच वर्षे आपण मतदारांना हिंग लावून विचारायचे नाही, अशी घोर प्रतिज्ञा केली आहे. निवडणूक प्रचाराची बिले भागवण्यात त्याचे पुढील काही महिने जातील.

बिनीच्या पुढाऱ्यांनी मात्र काल रात्रीपासूनच श्रमपरिहाराचा काळ सुरूदेखील केला. नाटक संपल्यावर भराभरा तोंडाचा ग्रीसपेंट काढून ‘चौथ्या अंका’साठी उतावीळ झालेल्या व्यावसायिक नटासारखीच त्यांची स्थिती आहे. प्रचार संपल्यानंतर हात झटकून अनेकांनी थंड परदेशात सहल करून येण्याच्या इराद्याने ब्यागा भरल्या आहेत. ह्या देशातील असह्य उन्हाळ्यापासून वाचण्याचा दुसरा उपाय तरी काय आहे? शिवाय देशाटनाने चातुर्य अधिक येते, हा भाग अलाहिदा. ‘उडाला तर बगळा, बुडाला तर बेडूक’ ह्या म्हणीनुसार त्यांनी भरपूर प्रचार केला, राजकारणे केली. पण आता वेळ श्रमपरिहाराची आहे. तेथे हयगय उपयोगाची नाही....मतमोजणीचा कल लक्षात घेऊन ते परत यायचे की नाही ते ठरवतील, असे दिसते.

टीव्हीवरील राजकीय बातम्यांचा रतीब आता कमी होत जाईल. वर्तमानपत्रातील राजकीय बातम्यांची जागा आता पुन्हा ‘घोसाळेवाडीत बिबळ्याचा संचार’, ‘मध्यरात्री समाजकंटकांनी पेटविल्या मोटारसायकली’, आदी बातम्या घेतील. पण वाचक-प्रेक्षकांचा हा संभ्रम दहाएक दिवसच टिकेल, कारण दहाएक दिवसांत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा येतेच आहे. सामान्य माणूस स्वत:चे मनोरंजन अचूक शोधतो. त्यासाठी त्याला कुठे परदेशी जावे लागत नाही. दिवाळीसारखा महागडा सण संपवून सारा देश महिनाअखेरीस तोंड कसे द्यायचे ह्याची विवंचना करू लागेल.
...कारण निकाल लागून नव्या सरकारचा शपथविधी होईतोवर खरोखरच मंथएंड येतेच आहे. ती दर पाच वर्षांनी नव्हे, दरमहा येते. देणं नास्ति, घेणं नास्ति...हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com