ढिंग टांग : आलीया ‘योगा’सी..!

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी.
आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे.
आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।।

............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार पावले टाकताना ब्रह्मांड आठवते आहे. सकाळपासून एकही फोनकॉल घेऊ शकलेलो नाही. डाव्या कुशीवर झोपलेल्या माणसाने (चुकून) उजव्या बाजूला मोबाईल फोन ठेवला की काय होते, ह्याची चुणूक मिळत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी काहीही सहन करायला तयार आहे. पण योगा डे आला की अगदी ‘काही नको’ असे होऊन जाते. माझी ही अवस्था काल सकाळी नांदेडात केलेल्या योगाभ्यासामुळे झाली आहे, हे वेगळे सांगायला नको!!
पू. रामदेवबाबाजी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात शुक्रवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने म्हणजे मी,- जाहीर योगासने केली. जाहीर म्हंजे अगदी जाहीर! पायजमा आणि सदऱ्यातील एक विदर्भी मनुष्य भरभक्‍कम उड्या मारताना कुणी पाहिला असेल, तो मीच!! एरवी मला स्टेजची भीती वाटत नाही. लंबीचवडी भाषणे करणे, मुलाखतींमध्ये चटकदार उत्तरे देणे, इतकेच काय, फिल्मी गाणे म्हणायची पण माझी तयारी असते. किंबहुना, स्टेजवरून भाषणे देण्यापेक्षा गाणी म्हणणे मला अधिक आवडते. पण त्या स्टेजवर उभे राहून योगासने कर, असे कुणी सांगितले की आपले हातपाय गळतात!! असो.

पू. रामदेवबाबा ह्यांनी भरीस घातल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यास नांदेडमध्ये अर्धातास पिदवण्यात आले. इलाजच नव्हता. ठिकठिकाणाहून योगान्यूज मिळत होती. परम आदरणीय देवस्वरुप श्रीमान नमोजी रांचीत नाक धरुन बसले होते आणि श्रीमान मोटाभाई ह्यांनी हरयाणात रोहतक येथे खांदे घुसळावयास प्रारंभ केला होता. लखनौत योगीजींनी एका पायावर उभे राहून डोक्‍यावर हात जोडल्याचे पाहिले आणि निमूटपणाने पू. रामदेवबाबा सांगतील ते करायला तयार झालो.
काँग्रेस आणि बिगर काँग्रेसी सरकारांमधला सर्वात मोठा फरक योगाभ्यास हाच आहे. कांग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना हे असले जाच नव्हते. माझ्या आधीचे मुख्यमंत्री स्वत:हून दिल्लीत बॅडमिंटन वगैरे खेळायला जात असत. पण कोर्टात उड्या मारणे वेगळे आणि स्टेजवर उड्या मारणे वेगळे!!
पू. रामदेवबाबांनी आधी काही सोपी आसने करायला लावली. ती मनोभावे केली. उदाहरणार्थ, पोटावर आडवे झोपून दोन्ही तळव्यांवर हनुवटी रेलून झोपायचे आसन झक्‍कास होते. लहानपणी आम्ही रात्री अशा आसनात टीव्ही पाहत असू!! ह्या आसनात तर मी चर्चासुद्धा करायला तयार आहे. हे आसन झाल्यावर अचानक पू. रामदेवबाबाजींनी आपण आता ‘नृत्य करूया’ असे फर्मान सोडले, आणि सारे बिनसले...

दोन्ही हात विरुद्ध बाजूला फिरवून उड्या मारण्याचे हे नृत्य भयंकर होते. जिज्ञासूंनी (आपापल्या जबाबदारीवर) घरी करून पाहावे : दोन्ही हात पुढे आणायचे. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे फिरवत उंच उंच उड्या मारायच्या. ‘आओ ट्‌विस्ट करे’ हे महंमद रफीचे हिट गाणेही (मनातल्या मनात) म्हणायची परवानगी आहे.
...आंबलेले शरीर आणि कमरेतील उसणरूपी तणाव कसा कमी करावा? हा तूर्त महाराष्ट्रापुढला ज्वलंत सवाल आहे. अंथरुणात पडल्या पडल्या मनाची समजूत काढली. योगाच्या नावाखाली ट्‌विस्ट केले म्हणून काय बिघडले? नाहीतरी राजकारणात आम्ही काय करत असतो? चालायचेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com