बाबासाहेबांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद 

बाबासाहेबांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद 

गतशतकापासून भारतीय लोकजीवनाला प्रभावित करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. पांडित्य, निरलस, ज्ञाननिष्ठ, समष्टिनिष्ठ, चिंतनदृष्टी आणि व्यापक लोकहिताची तळमळ ही डॉ. आंबेडकरांच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत; तसेच त्यांच्या ज्ञानगंभीर व्यक्तिमत्त्वाला भारतीय समाजव्यवस्थेचे मूल्यभान आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचे मनोज्ञ अधिष्ठानही लाभले होते; परंतु भारतीय समाजमनातील तेव्हाच्या आणि आजच्याही दुराग्रही अपसमजांमुळे डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा "विवेननिष्ठ राष्ट्रवाद' हा महनीय विशेष बराच काळ दुर्लक्षित राहिला आहे. 

सामान्यतः एकोणिसाव्या शतकापासून "राष्ट्रवाद' या संकल्पनेचा प्रभाव जगभर जाणवू लागला आहे. राष्ट्रवाद ही केवळ एक मानसिक संकल्पना असल्याचे पाश्‍चात्य अभ्यासक प्रो. झिरमन यांनी म्हटले आहे. अनेक देशांमधील विचारवंतांना धर्म, शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती व इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी "राष्ट्रवाद' हे प्रभावी साधन वाटत आले आहे. "राष्ट्रवाद' या संकल्पनेला देशकाल स्थितीनुसार अनेक परिमाणे आणि अर्थछटा लाभल्या आहेत. भारतीय संदर्भात बोलायचे तर राष्ट्रवादाचे तीन अंतःप्रवाह आपल्याला जाणवतात. समृद्ध भूतकाळ, श्रद्धा आणि अस्मिता यांची धर्मनिष्ठ गोळाबेरीज मांडणारा हिंदुत्वाची दिशा घेऊन निघालेला राष्ट्रवाद हा एक प्रवाह होय. देशातील विविधतेतील एकतेवर विशेष भर देणारा उदारमतवादी वळणाचा गांधी-नेहरूंचा राष्ट्रवाद हा भारतीय राष्ट्रवादाचा दुसरा प्रवाह होय; तर जोतिराव फुले, आगरकर आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारमंथनातून प्रकटलेला "विवेकनिष्ठ राष्ट्रवाद' हा भारतीय राष्ट्रवादाचा तिसरा अन्‌ महत्त्वाचा अंतःप्रवाह मानला जातो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाजव्यवस्थेच्या विषमतोलांची आणि गुण मर्यादांची प्रगल्भ जाण होती. भारतीय समाजजीवन, इतिहास, कला, संस्कृती, विद्याक्षेत्रे या सर्वांचे सर्वस्पर्शी आकलन त्यांना होते. त्यांच्या मते, "केवळ भौगोलिक आकार असलेला "देश' म्हणजे "राष्ट्र' नव्हे. समान भाषा, वंश, जात, श्रद्धा व अस्मिता म्हणजे "राष्ट्र' नव्हे. उलट "राष्ट्र' ही एक वस्तुनिष्ठ समूहभावना आहे... ती सद्‌सद्विवेकशक्तीची भावना आहे' (लेखन आणि भाषणे, खंड 3, पृ. 308-9) वंश, भाषा, भूगोल व संस्कृती या गोष्टी निखळ राष्ट्रीयत्वाच्या प्राथमिक गरजा नव्हेतच, हे त्यांनी "पाकिस्तान' ग्रंथात अनेक तऱ्हांनी पटवून सांगितले. त्यांनी "राष्ट्र' संकल्पनेचे अनेक धर्मांध व श्रद्धांध पाश तोडून या संकल्पनेला विशुद्ध जीवनचिंतनाची विवेकनिष्ठ अर्थवत्ता बहाल केली. मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना हाच राष्ट्रवादाचा मूलाधार आहे असे ते मानत. देशभरातील विविध जात, धर्म, भाषा, श्रद्धा यांच्या विवेचनातून प्रकटलेली एकत्वाची भावना हे राष्ट्रवादाचे केंद्रक आहे असे ते म्हणत. 

डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रवादाला सर्वंकष शोषणमुक्तीचा संदर्भ होता. देशातील शोषित समूह शोषणमुक्तीशिवाय राष्ट्रीय प्रवाहात समरस होणारच नाहीत, हे सत्य ते ओळखून होते. भारतीयांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या मर्यादा त्यांना ज्ञात होत्या. सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य वगळता "स्वातंत्र' संकल्पनेत असलेला मर्यादित अर्थावकास ते ओळखून होते. त्यांना राष्ट्रवादातील धर्मसत्तेचे अधिष्ठान अमान्य होते. त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना धर्मातीत, धर्मविहीन, इहवादी स्वभावाची होती. शेकडो, हजारो जातींनी विभागलेले लोक हे एक "राष्ट्र' कसे होऊ शकतील, असा धर्मनिष्ठ राष्ट्रवाद्यांना त्यांचा निर्णायक सवाल होता. भारतीय जातीसंस्थेचे उच्चाटन ही भारतीय राष्ट्रवादाची पहिली पायरी असे ते म्हणत. 

डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रवादाला बुद्धिप्रामाण्यवादाचे तत्त्वगंभीर अधिष्ठान होते. प्राचीन संस्कृती, परंपरा, धर्म, वंश इत्यादींच्या भावड्या व अतिरंजीत गौरवातून असहिष्णुतेचा, अविवेकाचा जन्म होतो. अशा एकारलेल्या, असहिष्णू राष्ट्रभावनेतून राष्ट्राचे अकल्याण होते, असे त्यांचे मत होते. जुन्या संचिताची व नव्या मूल्यांचीही विवेक शक्तीच्या निकषांवर कठोर चिकित्सा झाली पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांना सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी राष्ट्रमीमांसा अमान्य होती. 

डॉ. आंबेडकरांच्या विवेकनिष्ठ राष्ट्रवादाला महात्मा जोतिराव फुल्यांच्या राष्ट्रचिंतनाची पार्श्‍वभूमी लाभली होती. जोतिरावांनी "सार्वजनिक सत्यधर्म' या ग्रंथात म्हटले आहे, "...यावरून या बळीस्थानातील एकंदर शुद्रातिशूद्रांसह भिल्लं, कोळी वगैरे लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतो ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय (नेशन) होऊ शकत नाही.' जोतिरावांच्या या अवतरणात त्यांचा समताधिष्ठित राष्ट्रवाद स्पष्ट प्रतिबिंबित झाला आहे. "एकमय लोक' म्हणजेच खरे राष्ट्रनिर्माण अशी जोतिराव फुल्यांची धारणा होती. जोतिरावांच्या या राष्ट्रमीमांसेचे व्यापक विकसन पुढे डॉ. आंबेडकरी राष्ट्रवादात झाले. ब्रिटिश साम्राज्यवाद, स्वातंत्र्याची चळवळ, जगभरातील फॅसिस्टांची आंदोलने, मानवमुक्तीचे लढे अशा सगळ्या जळत्या वास्तवाच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरांनी विवेकनिष्ठ, समाजवादी स्वाभावाच्या राष्ट्रवादाची उभारणी केली. 

डॉ. आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रवादाच्या मीमांसेत राष्ट्रवादाच्या अवरोधांचीही चिकित्सा केली आहे. देशभरातील विविध भाषांच्या अस्तित्वासोबतच अवघे राष्ट्र एका भाषेतून बोलले आणि व्यक्त झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. भाषिक, वांशिक, धार्मिक अहंकारापासून राष्ट्र वाचविले पाहिजे, असे ते म्हणत. आपल्या देशातील व्यक्तिपूजेचे अविवेकी कर्मकांड हा भारतीय राष्ट्रवादाच्या निकोप घडणीतील एक प्रमुख अवरोध असल्याचे ते मानत. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात पराक्रमाच्या व शौर्याच्या क्षणांपेक्षा तथाकथित महात्म्यांच्या व्यक्तिपूजनाचे सोहळेच अधिक आढळतात. राजकारणासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत व्यक्तिपूजेची स्तोत्रे अधिक उंच स्वरात आळवली जाताहेत. डॉ. आंबेडकरांचा आंधळ्या व्यक्तिपूजेपेक्षा व्यक्तिचिकित्सेवर अधिक भर होता. राष्ट्रापेक्षा कुणीही महात्मा वा व्यक्ती मोठी नाही असे ते म्हणत. रानडे, गांधी आणि जीना यांच्या व्यक्तिपूजेच्या उत्कर्षपर्वात डॉ. आंबेडकरांनी त्यांची तर्ककठोर व्यक्तिचिकित्सा केली हे विशेष. राष्ट्रनिर्माणाच्या उदात्त कार्यातील एक प्रमुख अडसर ठरणाऱ्या व्यक्तिपूजेपासून भारतीयांना सावध करताना त्यांनी लिहिले होते, "व्यक्तिपूजा करताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे. कारण आज आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जागोजागी "खिसेकापूंपासून सावधान' असे फलक लावले जातात; तसेच आता "महापुरुषांपासून सावधान' असे फलक लावण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.' "रानडे, गांधी आणि जीना' व्यक्तिपूजनाचे सोहळे अनेक पटींनी वाढलेल्या आजच्या काळात डॉ. आंबेडकरांचा "महापुरुषांपासून सावधान' (beware of great men) हा इशारा अधिकच अन्वर्थक व निर्वाणीचा ठरलेला दिसतो. 

डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा विवेकशील, मानवतावादी, इहवादी स्वभावाचा होता. त्यांनी अध्यात्माऐवजी सामाजिक नीतीला, धर्मनिष्ठेपेक्षा विवेकनिष्ठेला, वंश, जन्म, भाषा, अस्मिता या खुज्या घटकांऐवजी उदात्त मानवनिष्ठेला महत्त्व देणारा इहवादी राष्ट्रवाद, वंशश्रेष्ठत्वाला, भाषिक अहंकारांना समूळ नकार देत समाजातील सकळांच्या कल्याणाला गती देणारा उदात्त राष्ट्रवाद मांडला. समकालीन काळातील वैचारिक, सांस्कृतिक अराजकाच्या काळात त्यांचे राष्ट्रवादी चिंतन सर्वांसाठीच मार्गदर्शक प्रेरणादायी ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com