महाजालातील ‘लहरी’ आणि संधी

डॉ. केशव साठये (प्रसारमाध्यमांचे अभ्यासक)
सोमवार, 20 जून 2016

आपल्या बौद्धिक क्षमतांना जगाच्या बाजारपेठेत उभे राहण्याची संधी म्हणून डिजिटल क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. या माध्यमाचा वापर करून जागतिक बाजारपेठेत ठामपणे उतरू, तेव्हाच खऱ्या अर्थाने इंटरनेट इकॉनॉमीचे फायदे आपल्याला मिळतील.
- डॉ. केशव साठये (प्रसारमाध्यमांचे अभ्यासक)

आपल्या बौद्धिक क्षमतांना जगाच्या बाजारपेठेत उभे राहण्याची संधी म्हणून डिजिटल क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. या माध्यमाचा वापर करून जागतिक बाजारपेठेत ठामपणे उतरू, तेव्हाच खऱ्या अर्थाने इंटरनेट इकॉनॉमीचे फायदे आपल्याला मिळतील.
- डॉ. केशव साठये (प्रसारमाध्यमांचे अभ्यासक)

इंटरनेटच्या जाळ्याने भारतीय जनतेच्या दैनंदिन आयुष्याचे महावस्त्र विणले गेले आहे की काय असे वाटावे, अशी एक बातमी आली आहे. इंटरनेटच्या वापरात भारत आता अमेरिकेच्या पुढे गेला आहे. चीन पहिल्या स्थानावर आहेच. आता आपण त्यांच्या खालोखाल या डिजिटल विश्वाचे मानकरी झालो आहोत. ‘मेरी मिकर’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने जागतिक इंटरनेट वापरासंबंधीचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे, त्यात हा तपशील पुढे आला आहे.

इंटरनेटचा वापर करून व्यापारात आघाडी घेण्यात गेल्या काही वर्षांत ‘फ्लिपकार्ट’, ‘अमेझॉन’, ‘क्विकर’ यांनी मोठी आघाडी घेतल्याचे आपण पाहिले आणि त्यामुळे आनुषंगिक व्यवहार म्हणजे जाहिरात आणि प्रत्यक्ष पुरवठा सेवा यांनाही बरकतीचे दिवस आले. अर्थात हा व्यवहार करताना या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विपणनाचा भाग म्हणून आर्थिक झळही बऱ्याच प्रमाणात सोसली आहे; पण यामुळे आता आपल्याकडे ऑनलाइन आर्थिक सेवाही मूळ धरू लागल्या आहेत. वस्तूंची खरेदी, बिलाचा भरणा या गोष्टी आता भारतीयांच्या अंगवळणी पडू लागल्या आहेत. पण ही सगळी वाढ भारत ही वस्तू-सेवा विक्रीची बाजारपेठ म्हणून होताना दिसत आहेत. आपण या माध्यमाचा वापर करून जगाच्या बाजारपेठेत ठामपणे उतरू, तेव्हाच खऱ्या अर्थाने इंटरनेट इकॉनॉमीचे फायदे आपल्याला मिळतील.

भारतात कृषी-उद्योग, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील संशोधन, विक्री, विपणन यात आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘नेट’च्या मदतीने काही ॲप्स विकसित करता येतील. आज अमेरिकेसारख्या देशात ‘यु ट्यूब’ला खूप मागणी आहे. आपल्या तरुणांना या संकेतस्थळावर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपली दृकश्राव्य कला ठेवता येईल, ज्यायोगे आंतरराष्ट्रीय प्रेक्षक त्यांना लाभू शकेल आणि त्यातून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. संशोधनपूर्ण आशय निर्मितीचे वितरण हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘नेट’ माध्यमामुळे शक्‍य झाला आहे. अनेक लेखक, पत्रकार व्यावसायिक तत्त्वावर ब्लॉग्ज लिहून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत. आपणही यात विशेष प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडील हस्तकला उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्तम मागणी आहे. पेंटिंग्ज या कलाप्रकारातही भारतीय चित्रकारांनी जगभरात चांगली पत मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर आपले गुणी चित्रकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बस्तान बसवू शकतात.

आता केंद्र सरकारची ‘स्टार्ट अप’ ही योजना घ्या. यात नवउन्मेषाला प्रोत्साहन आहे आणि सर्जनशीलतेतून नव्या उद्योग-व्यवसायाची क्षितिजे धुंडाळणाऱ्या तरुणांना मोठ्या संधी आहेत. इंटरनेट माध्यमाच्या मदतीने या योजनेअंतर्गत आपण आता पायाभूत उद्योग उभारले पाहिजेत. जागतिक पातळीवर मागणी आहे, अशा अनेक सेवा, सॉफ्टवेअर यांना एक चांगले व्यासपीठ यातून देता येऊ शकते. आपल्या बौद्धिक क्षमतांना जगाच्या बाजारपेठेत उभे राहण्याची संधी म्हणून आपण या विश्वाकडे आता पाहिले पाहिजे. अर्थात त्यासाठी ठोस योजना, कार्यक्रम, कार्यपद्धतीची आखणी व्हायला हवी. नऊ राज्यांत ‘डिजिटल क्‍लासरूम’ योजना आपण नुकतीच सुरू केली आहे. याचा वापर करून अनेक कौशल्य विकास कार्यक्रम, उद्योजकता वाढीचे प्रकल्प देशाच्या कानाकोपऱ्यात नेता येऊ शकतात; पण यासाठी आपल्या इंटरनेट वापराच्या क्षमतेत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे

‘ट्राय’च्या आकडेवारीनुसार आज भारतात ३५ कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. त्यातील मोबाईलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३३ कोटी इतकी आहे. केवळ दोन कोटी ग्राहक स्थिर संगणक यंत्रणेद्वारे याचा फायदा घेतात. अमेरिकेत ६० टक्के इंटरनेट हे स्थिर संगणक यंत्रणेवर चालते. सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांतही स्थिर यंत्रणेचे प्राबल्य आहे. त्यामुळे अपेक्षित वेग त्यांना मिळतो. वायररहित इंटरनेटच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. इंटरनेटचा सर्वसाधारण वेग दिल्लीमध्ये सेकंदाला ३.४ मेगाबाइट, मुंबईत ३. १ मेगाबाइट, तर त्या तुलनेत क्वालालम्पूरमध्ये ११, दुबईत १४, तर पॅरिसमध्ये २० इतका प्रचंड आहे. ‘जगाच्या पाठीवर कोठेही जा, निबिड जंगलात जा आणि संपर्कात राहा’ अशा आकर्षक जाहिराती आपण पाहतो. पण दिल्ली, मुंबईसारख्या शहरातही इंटरनेट संपर्कात अडचणी येतात हे वास्तव आहे.  इंटरनेट वेगाच्या बाबतीत १३१ देशांमध्ये आपण ९१ व्या स्थानावर आहोत. ब्रॉड बॅंडबाबतीतही आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही. इंटरनेट वेग किमान सेकंदाला दोन मेगाबाइट हा आज ब्रॉड बॅंडचा निकष आहे. पाच वर्षांपूर्वी सेकंदाला किमान २५६ किलोबाइट हा वेग आपण अपेक्षित करत होतो आणि ‘३- जी’ जोडणीमध्येही आपल्याकडे सातत्यपूर्ण पद्धतीने हाही वेग मिळत नाही.

मुळात इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या पायाभूत सुविधा वाढवत नाहीत. उपलब्ध लहरी महाग असल्याचा दावा ते करतात. त्यामुळेच इंटरनेट वापरात आपण जगात मिळवलेले हे दुसरे स्थान हे आज तरी समारंभपूर्वक मिरवण्यासारखे नाही; पण सध्याच्या सरकारने या त्रुटीची गंभीरपणे नोंद घेतली आणि त्यानुसार स्पेक्‍ट्रमबरोबरच अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या, इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करून अडथळाविरहित सलग संपर्कस्रोत इंटरनेट ग्राहकांना उपलब्ध करून दिला, तर या सध्या लहरी वागणाऱ्या ‘नेट’कडून कोट्यवधी ग्राहकांना आनंद‘लहरी’ लाभतील हे नक्की!

Web Title: editorial, internet