किंमत

mrunalini chitale
mrunalini chitale

सान्वीच्या आईनं आणि आजीनं मिळून तिचा पाचवा वाढदिवस साजरा करायचा खूप मोठा घाट घातला होता. झिरमिळ्या, कार्टून्स नि माळा लावून सजवलेलं घर. खाण्या-पिण्याच्या पदार्थांची रेलचेल. मुलांसाठी गमतीचे खेळ नि बक्षिसांची खैरात. एक खेळ होता पायाने फुगे फोडण्याचा. सान्वीच्या काही मित्र-मैत्रिणींच्या पायाला फुगे बांधले होते. दुसऱ्या टीममधील मुलं त्यांच्यामागे धावत जाऊन पायानं फुगे फोडत होती. बघता बघता चिंध्या झालेले फुगे पंख्याच्या वाऱ्यानं उडत होते. हसण्या-खिदळण्याला आणि आपसातील भांडणाला ऊत आला होता.

यानंतर चार दिवसांनी घडलेला प्रसंग. रविवारची संध्याकाळ. फर्गसन रस्ता माणसांनी ओथंबून वाहत होता. पदपथावर पथारी पसरून अनेक विक्रेते बसले होते. टी शर्टस, कुडते, माळा, बांगड्या, गॉगल्स, कणसं, पुस्तकं. पुस्तकाच्या स्टॉलपाशी उभं राहून पुस्तकं चाळत असता माझं लक्ष शेजारी गेलं. एक बाई डोळे ताणून बारीक पोत ओवून माळा बनवत होती. तिची पाच-सहा वर्षांची मुलगी तिला मदत करत होती. तिचे डोळे मात्र शेजारच्या फुगेवाल्याकडे लागले होते. लाल-पिवळे फुगे वाऱ्यावर डुलत होते. तिच्याकडे पाहताना सान्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी रंगलेला फुग्यांचा खेळ आठवला. ‘तुला हवाय फुगा?’ मी विचारलं. तिनं आईकडे पाहिलं. मी एक फुगा विकत घेऊन तिच्या हातात दिला. आईच्या डोळ्यांतील मूक संमती ओळखून तिनं हात पुढे केला. दोन हातात दोरा घट्ट पकडून ती उडणाऱ्या फुग्याकडे पहात राहिली. त्या बाईशी बोलताना मला तिची हकिगत कळली ती अशी की ३-४ वर्षांपूर्वी ती यवतमाळजवळच्या गावातून तिच्या कुटुंबासह इथं आली. तिचा नवरा बिगारी काम करतो. तिच्याबरोबर असलेल्या मुलीच्या पाठची दोन मुलं तिची सासू सांभाळते. तिनं तिच्या वस्तीतील बायकांच्या मदतीनं मोठ्या हिमतीनं पोतीच्या माळा विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी रोज दोन बस करून ती इथं येते.

तिच्याकडे माळा विकत घ्यायला मुली आल्यामुळे मी बोलणं आवरतं घेतलं. तासाभरानं माझी कामं उरकून मी परतले, तोवर रस्त्यावरची गर्दी ओसरली होती. पथारीवाले आपलं सामान गोळा करत होते. माझी नजर त्या बाईला शोधत होती. तीही आपलं सामान आवरत होती. तिची मुलगी शेजारच्या खांबाला टेकून पेंगत होती. ‘काय गं, फुगा फुटला की वाऱ्यावर उडून गेला,’ मी विचारलं. ‘ऐसा कैसे होता? हवा निकालके रखा है।’ पिशवीमध्ये घडी करून ठेवलेला फुगा दाखवत तिची आई म्हणाली. ‘बससे जाते वक्त फूट जाता ना। घर जाके इसके छोटे भाईभी खेलेंगे।’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com