कलावंतांचे विद्यापीठ

sudha karmarkar
sudha karmarkar

पोराटोरांच्या गलबल्याने गजबजलेले घरअंगण अचानक सुनेसुने झाल्याची भावना आज असंख्य नाट्यरसिकांची झाली असणार. सुधाताई करमरकर यांच्या जाण्याने असे सुनेपण येणे साहजिकही आहे. मराठी रंगभूमीच्या प्रांगणात बालनाट्याचा स्वतंत्र सुभा आपल्या सहीशिक्‍क्‍यानिशी समर्थपणे चालवणारी एक शिल्पकर्तीच आपल्यातून उठून निघून गेली आहे. सुधाताई करमरकर ८५ वर्षांच्या होत्या आणि गेली अनेक वर्षे रंगभूमी व अभिनयापासून दूरही होत्या. तरीही त्यांचे जाणे खूपच वेदनादायी आहे. अमेरिकेतील वास्तव्यात बालरंगभूमीचे तंत्र-मंत्र शिकून आलेल्या सुधाताईंनी मुंबईत परतल्यानंतर साहित्य संघाच्या छत्राखालीच ‘लिट्‌ल थिएटर’चा छोटेखानी संसार १९५९मध्ये थाटला. त्यांच्या हाजी कासम वाडीतल्या घरात चिल्ल्यापिल्ल्यांचा तेव्हा धुमाकूळ असे. तालमींच्या निमित्ताने त्या अंगणात येऊन खेळून गेलेल्यांपैकी कितीतरी जण आज नामवंत कलाकार म्हणून नाव गाजवत आहेत, यातच सारे काही आले.

नाटककार रत्नाकर मतकरीलिखित ‘मधुमंजिरी’ हे त्यांचे बालरंगभूमीवरचे पहिले नाटक. या नाटकातील सुधाताईंनी साकारलेली चेटकीण आजही कित्येकांच्या स्मरणात आहे पुढे सुमारे पंचवीसेक बालनाट्ये सुधाताईंनी जिद्दीने रंगमंचावर आणली. ‘अलिबाबा आणि आणि चाळीस चोर’, ‘अल्लादीन आणि जादूचा दिवा’, ‘चिनी बदाम’ या त्यांच्या बालनाट्यांमधूनच भक्‍ती बर्वेंसारखी बेजोड अभिनेत्री मराठी रंगभूमीला मिळाली. मराठी बालरंगभूमीने आजचे स्वरूप येण्यामागे सुधाताईंचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. बालरंगभूमीबरोबरच त्यांनी मोठ्यांसाठीच्या नाटकातही लक्षणीय भूमिका केल्या. ‘वीज म्हणाली धरतीला’ किंवा ‘आनंद’सारख्या नाटकात त्यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या प्रतिभाशाली लेखणीतून आलेले संवाद आणि भूमिका समर्थपणे पेलली. वसंतराव कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’ किंवा ‘बेइमान’ या नाटकांमधून त्यांनी लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. संगीत नाटकांमध्येही त्यांनी अनेक कामे केली. अभिनय, संगीत, नृत्य, दिग्दर्शन, लेखन अशा अनेकविध भूमिका समरसतेने आणि लीलया पार पाडणाऱ्या सुधाताई ही व्यक्‍ती नव्हतीच, ते एक विद्यापीठच होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्रात आज रितेपणाची भावना घर करून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com