हत्तींची भाषा ‘लय’ भारी!

हत्ती आपापसात संवाद साधू शकतात, हे कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर केल्यानंतर निदर्शनाला आले आहे. तथापि, त्यात आणखी संशोधनाची गरज आहे. त्यानंतर याविषयी अधिक स्पष्टता येऊ शकेल.
हत्तींची भाषा ‘लय’ भारी!
हत्तींची भाषा ‘लय’ भारी!sakal

विज्ञानवाटा

प्रा. शहाजी मोरे

सर्व प्राण्यांमध्ये हत्तींचे वेगळेपण नजरेत भरते, त्यांच्या आकार आणि बहुतेक सर्व अवयवांमुळे. हत्तींबद्दल कुतुहलही तितकेच! त्यांची ग्रहणक्षमता व आकलनही विलक्षणच. शिकवल्यास काही खेळही ते शिकू शकतात. सर्कशीमध्ये तर हत्तींचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण असते. हत्तींकडून अनेक शारीरिक कामेही करून घेतली जातात. हा बुद्धिमान प्राणी आहे. हत्तींविषयी अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत. अलीकडेच हत्तींविषयी, हत्तींच्या भाषेविषयी एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हत्ती आणि त्यांची भाषा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या संशोधनात कृत्रिम प्रज्ञेची (एआय) मदत घेण्यात आली.

हत्ती विशिष्ट प्रसंगी आरोळी देतात. परंतु हलक्या खोल आवाजात हत्ती एकमेकांशी संभाषण साधत असतात, त्यांच्या अनेक सामाजिक प्रसंगात त्यांचे ते विशिष्ट आवाज असतात. सर्वात महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक म्हणजे (नव्या संशोधनानुसार) हत्तींना चक्क नावाने सादही घातली जाते म्हणे! नावाने साद घालणे, हाक मारणे हे मानवप्राण्याचे महत्त्वाचे लक्षण. अन्य प्राण्यांमध्ये मात्र हे लक्षण नसते. नवीन संशोधनानुसार हत्तींमध्येही हे लक्षण असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. हत्ती त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला विशिष्ट आवाजात साद घालतो; पण ती साद आपल्याला कळत नाही. ती साद कृत्रिम प्रज्ञेला कळू शकते, एवढेच नव्हे तर ते एकमेकांशी (त्यांच्या संदर्भात) अर्थपूर्ण संवाद साधत असतात. हत्तींचे हे ‘अर्थपूर्ण’ संभाषण अभ्यासण्यासाठी कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजीमधील ध्वनिजीवशास्त्रज्ञ (ॲकॉस्टिक बायॉलॉजिस्ट) मिकी पार्डो व कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर व ‘सेव्ह द एलीफंट्स’च्या वैज्ञानिक मंडळाचे अध्यक्ष जॉर्ज व्हिटेमायर यांनी केनियामधील ‘अँबोसेली नॅशनल पार्क’ आणि ‘सांबुरू अँड बफेलो स्प्रिंग्ज नॅशनल रिझर्व्हज’ येथे हत्तीणी आणि त्यांच्या पिलांमधील संभाषणातील ४६९ आवाजांचे मुद्रण करून त्यांचे विश्लेषण केले.

वेध हत्तींच्या संवादाचा

हत्तींमधील संभाषणातील वेगळेपणा किंवा अर्थ मानवी कानांना कळू शकत नाही, मानवी श्रवणयंत्रणा हत्तीचे दोन आवाज वेगळे करू शकत नाही किंवा मानवी श्रवणयंत्रणेला त्यातील फरक कळू शकत नाही, म्हणून त्यांनी कृत्रिम प्रज्ञेचे सहाय्य घेतले. एक हत्ती दुसऱ्या हत्तीच्या आवाजांना (आपण आवाजच म्हणू शकतो, परंतु ते हत्तींसाठी शब्द असू शकतात) प्रतिसाद देतात. हे आवाज शास्त्रज्ञांनी मुद्रित केले आणि ‘एआय’च्या साधनांना विश्लेषण करावयास सांगितले. जर त्या आवाजांमध्ये एखाद्या हत्तीचे नाव असेल तर केवळ ध्वनींवरून किंवा ध्वनींच्या स्वरूपावरून शास्त्रज्ञ ते ओळखू शकत नाहीत की कोणत्या हत्तीला संबोधले आहे किंवा बोलावले आहे. शास्त्रज्ञ हेही ओळखू शकत नाहीत की, हत्तींनी काढलेल्या आवाजातील कोणता भाग म्हणजे हत्तीचे ‘नाव’ असेल; परंतु ‘एआय’च्या साधनांनी मात्र कोणत्या हत्तीशी संवाद साधावयाचा आहे, ते मानवी अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अचूक ओळखले.

डॉ. पार्डो आणि ‘सेव्ह द एलीफंट्स’ संस्थेचे संशोधन सहाय्यक डेव्हिड लोलचुरागी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर हत्तींच्या विविध प्रकारच्या आवाजांचे मुद्रण हत्तींना ऐकवले आणि त्यांच्या प्रतिसादाचे चित्रण केले. विशिष्ट आवाजांना विशिष्ट हत्ती प्रतिसाद देतात; म्हणजे कान टवकारणे, डोके वर काढणे आणि पुन्हा आपल्या ध्वनीच्या स्वरुपात प्रतिसाद देणे! हे पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत झाले. त्यांनी हत्तींच्या प्रतिसादांचे केलेले चित्रण पुन्हा पुन्हा पाहिले असता असे आढळले की, विशिष्ट हत्ती विशिष्ट आवाजांना प्रतिसाद देतात. विशिष्ट हत्तीला उद्देशून आवाज काढला असेल तर तोच हत्ती प्रतिसाद देतो, इतर हत्ती प्रतिसाद देत नाहीत. नावांना किंवा नावाने हाक मारल्यास केवळ हत्तीच प्रतिसाद देतात, असे नाही. डॉल्फीन्स, पोपट एकमेकांना नावाने साद घालतात, परंतु ही नावे उच्चारणे म्हणजे इतरांनी उच्चारलेल्या आवाजाची ती नक्कल असते. म्हणजे आपण- माणसाने एका पोपटास विशिष्ट नाव दिले असेल आणि त्याचे दुसऱ्या पोपटासमोर वारंवार उच्चारण केले असेल तर तो दुसरा पोपट त्या आवाजाची नक्कल करून त्या पोपटास साद घालू शकतो. म्हणजे डॉल्फीन्स, पोपट दुसऱ्याने/माणसाने ठेवलेल्या नावाचा उच्चार करू शकतात. ते स्वतः कोणाला नावे नाही ठेवत. ते काम माणसांचे! (वाईट अर्थाने नाही) म्हणजेच मानवानंतर हत्ती हा एकमेव प्राणी आहे की, जो एकमेकांना मानवाप्रमाणे विशिष्ट आवाजाने (म्हणजेच नावाने) साद घालत असतात.

हे प्राथमिक निष्कर्ष असले तरी हत्ती एकमेकांना कसल्यातरी आवाजाने संबोधतात हे महत्त्वपूर्ण आहे. माणूस जसा विविध वस्तूंना वेगवेगळी नावे देतो, तसे हत्तीही काही वस्तूंना नावे देतात असे म्हणणे घाईचे ठरेल, असे पार्डो म्हणतात. परंतु ते एकमेकांना नावे देतात तर वस्तूंनासुद्धा नाव देत असण्याची शक्यता असू शकते, असेही पार्डो म्हणतात. त्यांचे हे संशोधन ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’ या शोधपत्रिकेत १० जून २०२४ रोजी प्रसिद्ध झाले आहे. हत्तींच्या अस्तित्वासाठी सामाजिक जीवन महत्त्वाचे आहे. हत्तींना विशिष्ट ‘नावे’ कशी मिळाली असावी, हे अजूनही अस्पष्ट आहे. एक गृहितक असे आहे की, त्यांच्या मातेपासून किंवा पिल्लाची काळजी घेणाऱ्या हत्तीणींपासून ‘नावे’ मिळाली असण्याची शक्यता आहे. आमचे असे निरीक्षण आहे की, पिल्लांच्या जन्मानंतर काही वेळाने त्याची माता हत्तीण पिल्लाचे वारंवार नाव घेत असते आणि आश्चर्य वाटत असले तरी यामुळेच पिल्लांना नाव मिळत असावे. ‘‘हत्तींच्या आवाजांच्या मुद्रणाचे ‘एआय’मार्फत केलेल्या विश्लेषणावरुन आणि त्यांचे चित्रण पाहून आम्ही हे निष्कर्ष काढले आहेत”, असे पार्डो म्हणतात.

हत्तींचे आकलन, वर्तन आणि संभाषण या विषयी संशोधन करणाऱ्या ‘एलिफंट व्हॉईसेस’ या संस्थेचे वैज्ञानिक संचालक जॉयम पूले यांच्या निरीक्षणानुसार पिल्लाच्या जन्मानंतरच्या काही तासातच किंवा दिवसातच पिल्लांना नाव दिले जात असावे. या संशोधनात चौदा महिने प्रत्यक्ष जंगलात हत्तींबरोबर घालवले आहेत आणि त्यांचे संभाषण ध्वनिमुद्रित केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात १०१ हत्ती हे आवाज देणारे, तर ११७ हत्ती प्रतिसाद देणारे होते. त्यांना या शास्त्रज्ञांनी ‘युनिक कॉलर’ आणि ‘युनिक रिसिव्हर’ असे संबोधले. हत्ती त्यांच्या आयुष्यभर सामाजिक बंध अनेकांबरोबर ठेवतात. परंतु जंगलातील परिस्थितीमुळे अनेकदा ते एकमेकांपासून दुरावतात आणि पुन्हा एकत्र येतात. म्हणून त्यांना नावे असणे अगत्याचे असते. नावांमुळे ते पुन्हा एकत्र येऊ शकतात, संवाद साधू शकतात. हे माणसासारखेच झाले. माणसंही एकमेकांपासून सकारण, अकारण, गैरसमज वगैरेंमुळे दुरावतात, पुन्हा एकत्रही येतात (बहुधा). “हे समान लक्षण हत्तीच्या संवर्धनात अतिशय महत्त्वाचे ठरेल,” असे व्हिटेमायर म्हणतात. या संशोधनामुळे एखाद्या विषयाच्या आकलनाला ‘एआय’ कशी गती देते, याची चुणूक दिसली. या संशोधनामुळे हत्तींना भाषा असते, हे कळले. भाषा असणे म्हणजे हत्ती विचारही करू शकतात. याची खूण. आता ‘एआय’कडे जितकी विदा प्राप्त होईल, त्या प्रमाणात यातील अनेक बारकावे लक्षात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com