ढिंग टांग ब्रिटिश नंदी: लिफ्ट पॉलिटिक्स..!

खा लून वर आणि वरुन खाली ये-जा करणारी लिफ्ट हे राजकारणाचे प्रतीक आहे. लिफ्टमधून अनेक प्रवासी वरखाली करत असतात. एकमेकांशी हास्यविनोद करत आपापला मजला गाठतात. प्रसंगी टाळी मागतात, देतात. काही जण मात्र कोपऱ्यात तोंड घालून आपला मजला येईपर्यंत उभे राहतात आणि ढिम्म बोलत नाहीत.
ढिंग टांग ब्रिटिश नंदी: लिफ्ट पॉलिटिक्स..!
ढिंग टांग ब्रिटिश नंदी: लिफ्ट पॉलिटिक्स..!sakal

खा लून वर आणि वरुन खाली ये-जा करणारी लिफ्ट हे राजकारणाचे प्रतीक आहे. लिफ्टमधून अनेक प्रवासी वरखाली करत असतात. एकमेकांशी हास्यविनोद करत आपापला मजला गाठतात. प्रसंगी टाळी मागतात, देतात. काही जण मात्र कोपऱ्यात तोंड घालून आपला मजला येईपर्यंत उभे राहतात आणि ढिम्म बोलत नाहीत. लिफ्टमध्ये बडबड करणे पाश्चात्य जगात अशिष्ट मानले जाते. कुणी खाकरले तरी बॉम्बस्फोट झाल्यासारखी घबराट पसरते. आमची चूक हीच झाली की भर लिफ्टमध्ये आम्ही ढेकर दिला…

विधीमंडळ सभागृहाच्या ऐतिहासिक लिफ्टचे जतन करण्याची मागणी सर्व पक्षांकडून केली जात असून आमचा तीस पाठिंबा आहे. सदरील लिफ्टचे जतन व संवर्धनासाठी वने व सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून पुढील किमान सत्तावन्न पिढ्यांना ही लिफ्ट प्रेरणा देत राहील, अशी योजना आखण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. विधीमंडळातील लिफ्ट ही अत्याधुनिक स्वरुपाची असून तिला कान नाहीत. याच कर्णविरहित लिफ्टमध्ये गत सप्ताहात काही रोमहर्षक प्रसंग घडले. माननीय उधोजीसाहेब आणि माननीय नानासाहेब (फडणवीस) यांनी याच लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. हास्यविनोद केले. तेव्हापासून विधीमंडळात येणारे अनेक कार्येच्छुक लिफ्टपाशीच घोटाळताना दिसू लागले आहेत.

सरकारचा निषेध करण्यासाठी अनेक विरोधी पक्षाचे सदस्य विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून घोषणा देतात. असे काही उद्वाहन आंदोलन लिफ्टमध्ये छेडता येईल का, याची चाचपणी चालू आहे. काही माथेफिरुंनी लिफ्ट हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नये, म्हणून सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचेही समजते. तरीही लिफ्टनजीकची गर्दी कमी व्हायला तयार नाही. माननीय नानासाहेबांनी तर आपले दालन सोडून लिफ्टपाशीच टेबल टाकण्याची तजवीज केल्याचे सूत्रांकडून कळते. गेल्या सप्ताहात माननीय उधोजीसाहेब त्यांना लिफ्टमध्ये भेटले. त्यानंतर या सप्ताहात त्याच लिफ्टसमोर त्याच ठिकाणी त्याच सुमारास तरुणांचे तडफदार नेते विक्रमादित्यजी यांची भेट झाली. त्या भेटीच्यावेळीच आमच्याकडून आगळीक घडली. त्याचे झाले असे की-गेल्या सप्ताहात आपले पूज्य पिताश्री लिफ्टने नानासाहेबांसोबत गेले, हे विक्रमादित्यांच्या कानावर गेले. त्यांच्या मनाने घेतले की आपणही जावे.

गेल्या सप्ताहात आपले पूज्य पिताश्री लिफ्टने नानासाहेबांसोबत गेले, हे विक्रमादित्यांच्या कानावर गेले. त्यांच्या मनाने घेतले की आपणही जावे. पण ते कैसे जमावे? परंतु, विक्रमादित्यांनी हट्ट सोडला नाही. ते शांतपणे लिफ्टपाशी जाऊन उभे राहिले. घाईघाईने नानासाहेब तेथे अवतरले. गेले काही महिने आमचे प्रिय नानासाहेब लिफ्टपाशीच घोटाळताना दिसतात. त्यांनी विक्रमादित्यजींना नमस्कार केला. विक्रमादित्यजींनी ताबडतोब तो परत केला. ‘‘काय चाल्लंय?,’’ नानासाहेबांनी विचारले. आता या प्रश्नाला तसा काही अर्थ नाही. हा सवाल कोणीही कोणालाही कधीही विचारु शकतो. यावर ‘‘मज्जेत, मस्त, ठीक, तुमचं कस्काय?,’’ यापैकी काहीही उत्तर असू शकते. विक्रमादित्यजींनी मात्र वेगळे उत्तर दिले. ‘‘लिफ्टने चाललोय!,’’ ते म्हणाले. आसपासचे लोक ‘हहह हह हहह’ असे हंसले!!

यात नेमका काय जोक झाला ते आम्हाला क्षणभर उमगले नाही. पण नानासाहेबही नागपुरी पद्धतीने दिलखुलास हसले, आणि ‘हॅप्पी जर्नी’ असे पुटपुटले. वास्तविक विक्रमादित्यजींसारख्या तरुण, तडफदार नेत्याने लिफ्टचा वापर टाळून जिन्याने जाणे श्रेयस्कर ठरले असते. ‘‘तुम्ही इकडे कुठे?,’’ विक्रमादित्यांनी विचारले.‘‘मी हल्ली इथेच असतो!,’’ लिफ्टकडे बोट दाखवत नानासाहेबांनी सांगितले. ‘‘तुम्ही येताय का?,’’ विक्रमादित्यजींनी आणखी एक सातमजली जोक केला. त्याचा पुरावा उपस्थितांनी तीनमजली हास्यकल्लोळ करुन दिला. नानासाहेबही एकमजली हसले. लिफ्ट आली, आणि तेवढ्यात आम्ही ‘हॉऊऽऽब’ असा ध्वनियुक्त ढेकर दिला. लिफ्टला कान नसतात; पण नाक असते!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com