
Farewell to the Gentleman Umpire Dickie Bird Passes Away at 92
Sakal
अरविंद रेणापूरकर
मैदानातील पंच हा तटस्थ, शांत, अचूक निर्णय देणारा आणि खेळकर स्वभावाचा असणे अपेक्षित असते. ब्रिटनचे हेरॉल्ड डेनिस बर्ड अर्थात डिकी बर्ड याच पठडीतील. १९७० ते १९९० च्या दशकांत क्रिकेटविश्वात लोकप्रिय आणि खेळकर पंच म्हणून डिकी बर्ड यांनी नावलौकिक मिळवला. क्रिकेट इतिेहासातील सर्वात लोकप्रिय पंचांपैकी एक असणारे हेरॉल्ड डिकी बर्ड यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. महान फलंदाज सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया देताना क्रिकेटने थोर अद्वितीय व्यक्तिमत्त्व गमावले, अशा शब्दांत भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे डिकी बर्ड यांनी निवृत्ती स्वीकारुन बराच काळ लोटला असला तरी त्यांची आठवण आजही काढली जाते ती निर्दोष निर्णयाबाबत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६ कसोटी आणि ६९ दिवसीय सामन्यांत पंचगिरी केली. एकुणातच त्यांनी २६ वर्षांत ३८१ सामन्यांत पंच म्हणून भूमिका बजावली. १९ एप्रिल १९३३ मध्ये जन्मलेले बर्ड करियरच्या शेवटच्या टप्प्यात लिसेस्टरशायरसाठीदेखील मैदानात उतरले होते.