esakal | कलाबहर : पाण्याचे चित्र काढणारा ‘प्रकाश’यात्री
sakal

बोलून बातमी शोधा

कलाबहर : पाण्याचे चित्र काढणारा ‘प्रकाश’यात्री

कलाबहर : पाण्याचे चित्र काढणारा ‘प्रकाश’यात्री

sakal_logo
By
गायत्री देशपांडे

नॅशनल गॅलरी, लंडनमध्ये फिरताना एका दालनात बराच चिवचिवाट ऐकू आला म्हणून जाऊन बघितलं तर शालेय मुलांचा एक समूह घेऊन कलाशिक्षक एका चित्रासमोर चर्चा करत होता. चित्रासमोर सर्व मुलं गोल करून बसली होती आणि प्रत्येक जण त्या चित्राबद्दल आपापले मत सांगत होते. चित्र होते ‘मॉने’चे-‘वॉटरलिलीज’! या चित्राबद्दल ही इवलीशी मुलं चर्चा करतायत हे बघून मी थक्क झाले. मला त्यांचा हेवाही वाटला. काय नशीबवान असतील ना ही मुलं?

अभ्यासू चित्रकार मॉने आणि दृकप्रत्ययवाद (Impressionism) हे एक समीकरण होते. त्याने वॉटरलिलीजची एक-दोन नाही, तर चक्क २५० चित्रे केली मालिकेमध्ये. त्याचे अनुकरण आजही कित्येक चित्रकार करतात. वेगवेगळ्या आकारातील ही चित्रे जगभरातील संग्रहालयांत बघायला मिळतात. एकच विषय घेऊन त्याचे विविध वेळी चित्रण करणे, अभ्यास करणे याचा पायंडा मॉनेनीच पाडला असावा. ‘वॉटरलिलीज’ ही त्याची सर्वात मोठी मालिका म्हणजे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या ३० वर्षांचे काम. हा चित्रकार अक्षरशः या मालिकेबरोबर मोठा झाला. वाढत्या वयाबरोबर त्याची दृष्टी जशी कमकुवत झाली, तशी ही मालिका पण वास्तववादाकडून थोडी अमूर्तवादाकडे जाताना जाणवते. त्यातील आकारांचे तपशील कमी होत गेले व विषयाचा प्रभाव जास्त राहिला. हा विषय मॉनेनी निवडला त्याच्या फ्रान्समधील घराच्या बागेतून. कोणीही मोहात पडावं अशी बाग त्याने अतिशय प्रेमाने घडवली होती. त्यात त्याने द. अमेरिका आणि इजिप्तवरून खास वॉटरलिलीज मागवल्या आणि एक सुंदर जपानी पद्धतीचा पूल पण बनवला, जो त्याच्या अनेक चित्रांतही दिसतो. या चित्रमालिकेत केवळ निसर्गात होणारे बदलच नव्हे, तर मॉनेचा जीवनप्रवासही झळकतो. वेळ, काळ, प्रकाश आणि त्याबरोबर स्वतः चित्रकार कसा बदलत जातो हे त्यात दिसते. ‘प्रकाश'' रंगवणाऱ्या या चित्रकाराने पाण्याचे चित्र म्हणून सुरू केलेली ही मालिका त्याच्या आयुष्याचे ध्येय बनली. बागेतच स्टुडिओ बांधून तिथे चित्र करण्यात तो रमून जायचा. ही चित्रे प्रभाववाद आणि भाववाद अशा दोन्ही वादांचा संगम वाटतात.

हेही वाचा: पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी पडणारा प्रकाश चित्रित करण्याच्या ध्यासामुळे स्थानिक संकेत व तत्सम तपशिलांना काहीसे दुय्यम स्थान मिळाले. ही चित्रे बघताना एका जादुई दुनियेत गेल्यासारखे वाटते. काहीसे अस्पष्ट आणि रंगांतून कंपन निर्माण करणारे हे भव्य चित्र नजरेचा आवाका व्यापून टाकतात. सुरेल संगीत ऐकल्यासारखाच हा अनुभव. इतर निसर्गचित्रांसारखी ही चित्रे नाहीत. यात क्षितिजरेषा नाही. ज्या तळ्याचे हे चित्रण आहे त्याचे काठ पण क्वचितच दिसतात. पाण्यात पडलेल्या आकाशाच्या प्रतिबिंबाच्या पार्श्‍वभूमीवर या चित्राचे हीरो आहेत - "वॉटरलिलिज'' - बास्‌! ब्रशच्या विविध प्रकारच्या फटकाऱ्यांनी कधी काटेकोर, कधी सैल, कमी- जास्त तीव्रतेने हे चित्रण केलेले आढळते. काही चित्रांची रचना तर इतकी अतिवास्तववादी आहे की नजर पूर्ण चित्रांत छान फिरते, त्या एका आकाराचा आधार शोधत तो कुठे सुरू होतो आणि संपतो हेही पटकन समजत नाही. काय किमया असेल या चित्रणाची! जवळून बघितलं तर केवळ विविध रंगांचे छोटे मोठे सैल भिरभिरणारे फटकारे, कुठेतरी अस्पष्टपणे विविध छटांचा संगम, रंगांचे थर हे दिसते. कधी पिवळे, कधी हिरवे फटकारे, एखादा लाल ठिपका तर एखादा जांभळा आणि मग सावल्यांसाठी अगदी सहज वापरलेला निळा. हे सर्व अंतरावरून पाहिलं तर या चित्रणशैलीची मजा समजेल. वॉटरलिलीज घडवताना रंगांचा, त्यांच्या छटांचा, मूल्यांचा, रंगलेपनाचा किती अभ्यास असेल हे स्वतः चित्रकारच जाणो.