हौस ऑफ बांबू : व्याकरणाचे शिकरण..!

वाघमारे गृहस्थ हे शासनमान्य मराठी भाषेचे तज्ज्ञ समजले जातात. शासकीय लेखन हा एक निराळाच वाङ्‌मय प्रकार आहे, हे अनेक मराठी वाचकांना माहीत नसेल. हे पुस्तक वाचा, होईल ओळख!
grammar is the key to speak language communicate understand better
grammar is the key to speak language communicate understand betterSakal

न  अस्कार! मी आता शुद्ध भाषेत बोलायचं ठरवलं आहे. कारण आपल्या भाषेला व्याकरणाची शिस्त हवीच, हे मला मनापास्नं पटलं आहे. बोलीभाषांची दादागिरी सुरू झाल्यामुळे आपली मराठी प्रमाण भाषा बिचारी कोपऱ्यात जाऊन उभी राहिली आहे. वशाटाच्या घमघमाटात अचानक कुणीतरी साबुदाणा वडा आणून ठेवावा, तशी! काय हे?

शाळेत व्याकरण म्हटलं की आम्ही शरण जायचो, पण ते शिकरण आहे हे नुकतंच समजलं. मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल माझ्या मनात इतकी कळकळ निर्माण होण्यासाठी निमित्त झालं, ते एक मोलाचं पुस्तक.

शासकीय मराठीचे (ही एक वेगळीच बोली आणि लेखी भाषा आहे... वेगळ्या प्रवर्गातली!) भाषातज्ज्ञ सलील वाघमारे यांनी ‘मराठी भाषा : लेखन-मार्गदर्शन’ या अभिनव शीर्षकाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन ‘ग्रंथाली’नं केलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात नुकतंच त्याचा सोहळा पार पडला.

वाघमारे गृहस्थ हे शासनमान्य मराठी भाषेचे तज्ज्ञ समजले जातात. शासकीय लेखन हा एक निराळाच वाङ्‌मय प्रकार आहे, हे अनेक मराठी वाचकांना माहीत नसेल. हे पुस्तक वाचा, होईल ओळख!

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छानच झाला. हल्ली मराठी भाषेसाठी कोण येवढी गर्दी करतं? पण होती. नंतर लक्षात आलं की, सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर हिरवा हिरवागार झब्बा घालून रंगमंचावर उपस्थित आहेत. शेजारी आमचे प्रा. प्र. न. जोशी, त्यांच्या बाजूला मराठीचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत देशमुखसाहेब, प्रसिद्ध लेखिका नीलिमा गुंडी वगैरे मराठीचे पापड (मिरगुंड, कुर्वड्या समाविष्ट) बसलेले आहेत. मी आपली जागा शोधून बसले.

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सूत्रसंचालिका डॉ. लतिका भानुशाली यांनी एवढं विचारपरिप्लृत (हा शब्द मेला अजून धड कळला नाही!) आणि प्रदीर्घ सूत्र मांडलं की, आम्हा प्रेक्षकांचं संचालन अवघड होऊन बसलं. असं काही झालं की व्याकरणाचा धसका बसतो.

‘प्रनं’ नेहमीच्या सुरात म्हणाले की, हल्ली प्रत्येक प्रदेशाची वेगळी प्रमाणभाषा ठरू लागली आहे, खानदेशी प्रमाण वेगळं, मालवणी वायलं आणि कोल्हापुरी येगळंच!

प्रांताधिकारी देशमुखसाहेब सर्वांवर करडी नजर ठेवून होते. त्यामुळे वेलणकर ते वगळून सगळ्यांकडे हसतमुखाने पाहत बसले होते. त्यांची ‘मसाप’च्या गेस्ट हाउसच्या खोलीत मस्तपैकी वामकुक्षी झालेली चेहऱ्यावरच दिसतच होती.

साहित्यिक किंवा भाषाविषयक कार्यक्रमात एक अभिनेते काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थितांना पडला असणार, असं वाटून बहुधा ते गालातल्या गालात हसत होते, पण तसं काही नव्हतं. भाषणात त्यांनीच विषय काढला.

म्हणाले, ‘‘अभिनय करताना विरामचिन्हं कुठं आणि कशी उच्चारायची, याचा अभ्यास करावाच लागतो, मिस्टर! त्या अर्थानं मी एक अभ्यासकच आहे..,’’ वास्तविक हे आम्हा (प्रेक्षकांना) मान्यच होतं. पण... जाऊ दे!

नीलिमाताई गुंडी यांनी मात्र थेट भूमिका मांडली, त्यानं मी खरं तर विचारात पडल्ये. त्या म्हणाल्या की, ‘‘भौतिकशास्त्राचे किंवा अन्य शास्त्रांचे नियम असतात, मग भाषेलाही नकोत का? व्याकरणानं भाषा पुष्ट होते...’’

वाघमारे यांच्या पुस्तकाला भाषातज्ज्ञ यास्मिन शेख यांची प्रगल्भ प्रस्तावना लाभली आहे. त्या अर्थी वाघमारे यांनी व्याकरणाचं शिकरण वाढलंय, हे ओळखता येतं. नवोदित लेखक, पत्रकार, शासकीय मराठीत लिहू पाहणारे अनेक क्षेत्रातले जाणकार, हौशे-नवशे आणि गवशांनाही हे पुस्तक उपयुक्त पडेल.

कार्यक्रमाच्या वेळी सगळ्यांना काका हलवायाकडून आणलेली अल्पोपाहाराची बॉक्सेस प्याकबंद अवस्थेत देण्यात आली. सगळ्याच (पुण्याच्या) प्रेक्षकांनी ती पिशवीत टाकून घरी नेली!!

मराठीचं व्याकरण हे असं हलवायाच्या पुड्यासारखं आहे. उघडेपर्यंत आतली मज्जा कळणार नाही!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com