मर्म : पक्षी जाय दिगंतरा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

राजस्थानात ‘नहर गुंजावण,’ पंजाबात ‘टुगदार,’ हिंदीत ‘गुधूनभेर’ अशा नावानं ओळखला जाणारा ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ अर्थात माळढोक देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनं दिला आहे.

राजस्थानात ‘नहर गुंजावण,’ पंजाबात ‘टुगदार,’ हिंदीत ‘गुधूनभेर’ अशा नावानं ओळखला जाणारा ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ अर्थात माळढोक देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनं दिला आहे.

या पक्ष्याबद्दल असलेलं अज्ञान हे एक कारण त्यामागं आहे. सोलापूर भागात माळढोक सर्वप्रथम शोधणारे बी. एस. कुलकर्णी यांनी माळढोकचं प्राचीन नाव ‘गोनाद’ असल्याचं म्हटलं आहे. गाय हंबरल्यासारखा आवाज तो काढतो, म्हणून त्याला हे नाव पडलं असावं. त्याचा व्याकुळ हंबर कुणाच्याच कानी आला नाही, अशी स्थिती आहे. ज्या सोलापूर जिल्ह्यात माळढोकाच्या वाढीला पोषक वातावरण आहे, तिथून तो हद्दपारच झाला आहे. पण देशातूनही त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचं अचूक निदान करणारा हा पक्षी.

माळढोकाची मादी जमिनीवरील खड्ड्यात अंडी घालते. पाऊस पडणार नसेल तर ती अंडी घालत नाही. निसर्गातील बदलाची, पर्यावरणाच्या समतोलाची नेमकी जाणीव असणारा हा पक्षी आहे. अभयारण्य करूनही तो राखता आलेला नाही. उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचे वहन करणाऱ्या तारांमुळे त्यांची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष अहवालात काढलेला आहे, तो एकतर्फी आहे. काळपट असले, तरी चवदार मांसामुळे अभयारण्यातही त्यांची सर्रास हत्या झाली आहे. त्याचप्रमाणे माळरानावरील गवताळ कुरणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही अभावाने आढळतात. माळढोकाचा रहिवास अशा कुरणातच असतो. त्या कुरणातील किडे हे त्याचे अन्न. पठारी भागातील चराऊ कुरणांतील त्याची भटकंती हे दृश्‍य विलोभनीय तर होतेच; पण त्याच्या जीवनपद्धतीविषयी अभ्यासकांना अवगत करणारे होते. वाढत्या औद्योगीकरणाचा फटका निसर्गचक्राला बसला आहे. मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नाहीशा होत आहेत, तसा हा पक्षीही संपत आहे. अशा वेळी त्यांची कृत्रिम पैदास करायला हवी. हंगेरीतील अभयारण्यात असे प्रयत्न करण्यात आले आहेत. माळढोकांची संख्या कमी होणे ही माणसाची संवेदनशीलता लोप पावत असल्याचेही लक्षण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great Indian Bastard