सर्च-रिसर्च : शिरस्राण सलामत तो...

Helmet
Helmet

ड्यूक विद्यापीठातील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागात हेल्मेटच्या सुरक्षिततेवर नुकतेच महत्त्वाचे संशोधन झाले. त्यात सध्या संरक्षण विभागात वापरात असलेल्या हेल्मेटच्या गुणवत्तेची तुलना पहिल्या महायुद्धात फ्रेंच लष्कराने विकसित केलेल्या ॲड्रिअन हेल्मेटशी केली गेली. १९१५ मध्ये त्या हेल्मेटचा प्रथम उपयोग केला गेला.

सैनिकांच्या डोक्‍यांचे विस्फोटांपासून आणि तीव्र लहरींपासून संरक्षण व्हवे, या उद्देशाने ते वापरले गेले. प्रयोगशाळेतील ताज्या संशोधनातून असे दिसले, की ॲड्रिअन हेल्मेट आजच्या काळातील हेल्मेटपेक्षा सरस आहे. त्यामुळे मेंदू आणि डोके अधिक सुरक्षित राहू शकते. ‘Plos one’ या शोधपत्रिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या अंकात या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. ड्यूक्‍स विद्यापीठातील अभियांत्रिकी संशोधकांनी विस्फोटके अथवा अन्य कारणांनी मेंदूवर आदळणाऱ्या तीव्र ध्वनी किंवा वायुलहरींमुळे मेंदूवर होणाऱ्या आघातांवर संशोधन सुरू केलेय. विस्फोटकांमधील घातक व तीक्ष्ण पदार्थांमुळे होणारा शारीरिक नाश रोखण्यासाठी हेल्मेट या धातूच्या शिरस्त्राणाची निर्मिती झाली. बंदुकीच्या गोळ्या वा बॉम्बमधील किंवा हातगोळ्यातून वेगाने डोक्‍यात घुसणारे घातक पदार्थ, तसेच वाहनांच्या अपघातात किंवा बांधकामाच्या ठिकाणी अपघाताने डोक्‍यावर आदळणाऱ्या वस्तूंपासून संरक्षण मिळणे आवश्‍यक असते.

खाणमजुरांची तर ती अत्यावश्‍यक गरज आहे. मेंदूवर आघात झाला, तर कायमस्वरूपी शारीरिक व्यंग निर्माण होऊ शकते. माणूस कायमचा बेशुद्धावस्थेत जाऊ शकतो. विस्फोटकाचा तीव्र आघात हृदयाच्या कार्यावर वा श्‍वसनसंस्थेवर, श्रवणयंत्रणेवर परिणाम करू शकतो. त्यामुळेच विशेषतः सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट हे एक महत्त्वाचे साधन ठरते. 

ड्यूक विद्यापीठाच्या प्राट स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील संशोधक गटाचे प्रमुख जूस्ट ऑफ टीआयंडे यांच्या शोधनिबंधात हे स्पष्ट झाले आहे, की पहिल्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या हेल्मेटमुळे कित्येक सैनिक सुरक्षित राहिले असतील. अलीकडेच आठ जानेवारी २०२० रोजी इराकमधील अल असद विमानतळावरील अमेरिकी लष्करी छावणीवर झालेल्या इस्रायली क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे सुमारे शंभर सैनिकांच्या मेंदूला दुखापत झाली, त्यामुळे हे संशोधन तातडीने हाती घेण्यात आले.

पहिल्या महायुद्धातील ॲड्रिअन शिरस्त्राणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या वरच्या घुमटाकार भागाची मजबुती वाढविणारा वलयांकित धातूचा जाड भागाचा थर. या कमानीसारख्या भागामुळे आदळणाऱ्या तीव्र नादलहरी कमकुवत होतात. मेंदूवर होणारा आघातही कुमकुवत होतो. लष्करातील या प्रकारचे हेल्मेट इ. स. २००० च्या मध्यापर्यंत वापरात होते. मात्र, आता त्यात बऱ्याच सुधारणांची भर पडली आहे.  या संशोधनात संशोधकांनी नकली डोक्‍यांवर विविध रचनांच्या हेल्मेटचा वापर केला.

त्यावरील बाह्य आघातांमुळे आतील हवेच्या दाबांमधील होणाऱ्या सूक्ष्म बदलांची विविध ठिकाणची नोंद संवेदकांद्वारे करण्यात आली. नकली डोक्‍यांवरील नलिकांच्या जाळ्यात हेलियम वायू प्रचंड दाबाने सोडून पाहणी करण्यात आली. अशा वायूमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र आघाती लहरींचा परिणाम कोणत्या हेल्मेटमुळे किमान पातळीपर्यंत येऊ शकतो, याचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. या प्रयोगातसुद्धा ॲड्रिअन हेल्मेटची कार्यक्षमता सर्वोच्च ठरली. बाह्य विस्फोटकांमुळे डोके व मेंदूवर होणाऱ्या शारीरिक आघातांवरच आजवरचे संशोधन केंद्रित झाले होते. परंतु, मेंदूला होणाऱ्या शारीरिक दुखापतींपेक्षा त्यावरील आघातामुळे होणाऱ्या संवेदनात्मक कार्यक्षमतेवर होणाऱ्या आघाताकडे या संशोधकांनी लक्ष केंद्रित केले. बाह्य आघातामुळे मेंदूला शारीरिक इजा झाली नाही, तरी त्यावर निर्माण होणाऱ्या हवेच्या तीव्र दाबाचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यापासून संरक्षण मिळविणाऱ्या हेल्मेटची निर्मिती हा या संशोधनाचा मूळ उद्देश होता. युद्धाच्या काळात अधिक सुरक्षित ठरू शकेल अशा हेल्मेटच्या निर्मितीला या संशोधनामुळे चालना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com