esakal | सर्च-रिसर्च : मानवी रक्त आवडे डासांना !
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

डास दिसायला लहान असला तरीही डासांमुळे ज्या साथी पसरतात त्या भयानक असतात. त्यामुळेच डास हा सातत्याने संशोधनाचा विषय राहिला आहे. वोलबेकिया जिवाणू सोडलेले डास संशोधकांनी हा विषाणू नसलेल्या डासांमध्ये सोडले आणि डेंगीला अटकाव करण्याचा यशस्वी प्रयोग केला. दोन एक वर्षांपूर्वी सिनसिनाटी येथील संशोधकांनी प्रयोगांतून हे सिद्ध केले होते की डासांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर डास माणसाचे रक्त पाण्याच्या स्रोतासाठी शोषतात. आता एका नव्या प्रयोगात डासांना मानवी रक्ताची चव कशी कळते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

सर्च-रिसर्च : मानवी रक्त आवडे डासांना !

sakal_logo
By
राहुल गोखले

डास दिसायला लहान असला तरीही डासांमुळे ज्या साथी पसरतात त्या भयानक असतात. त्यामुळेच डास हा सातत्याने संशोधनाचा विषय राहिला आहे. वोलबेकिया जिवाणू सोडलेले डास संशोधकांनी हा विषाणू नसलेल्या डासांमध्ये सोडले आणि डेंगीला अटकाव करण्याचा यशस्वी प्रयोग केला. दोन एक वर्षांपूर्वी सिनसिनाटी येथील संशोधकांनी प्रयोगांतून हे सिद्ध केले होते की डासांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर डास माणसाचे रक्त पाण्याच्या स्रोतासाठी शोषतात. आता एका नव्या प्रयोगात डासांना मानवी रक्ताची चव कशी कळते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बरीच माणसे एकत्र बसलेली असतानाही एखाद्याला डास जास्त चावतात आणि मग असे म्हटले जाते की त्या माणसाचे रक्त गोड आहे, म्हणून त्याला डास अधिक चावतात. डासांना गोड चव आवडते हे यामागील गृहीतक. मात्र खरोखरच तसे असते का यावर नव्या प्रयोगाने उलगडा केला आहे. वस्तुतः डास हे मानवी रक्तपिपासू कायमचे नसतात; त्यांचे अन्न फुलांमधील मधुर द्रव हे असते. मात्र जेव्हा मादी डास अंडी घालणार असतात तेव्हा त्या माणसाचे रक्त शोषतात आणि तेही प्रथिनांचा आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून. मात्र तरीही फुलांमधील मधुर द्रव आणि मानवी रक्त यांच्यामधील फरक डासांना नेमका कसा कळतो आणि त्यासाठी डासांमध्ये निसर्गाने काही विशिष्ट योजना केली आहे का हे पाहण्यासाठी रॉकफेलर विद्यापीठातील काही संशोधकांनी डासांमध्ये जनुकीय बदल करून अशी व्यवस्था केली की विशिष्ट चवीने कोणते मज्जातंतू उद्दिपित (फ्लूरेस) होतायेत ते कळावे. हे केल्यावर डासांना विविध प्रकारचे अन्न देण्यात आले. एडिस इजिप्टी प्रजातीचे हे डास होते.

प्रयोगांतील निरीक्षणांवरून असे आढळले की फुलांमधील मधुर द्रव आणि मानवी रक्त शोषण्यासाठी आणि त्यांचा ’स्वाद’ कळण्यासाठी डास तोंडातील दोन वेगवेगळ्या भागांचा उपयोग करतात. रक्ताची चव घेण्यासाठी डास सोंडेसारख्या भागाचा (स्टायलेट) वापर करतात. मात्र तरीही रक्ताची चव डासांना कशी कळते हे शोधणे बाकी होतेच. तेंव्हा मग ग्लुकोज (जे फुलांमधील द्रव्यात आणि रक्तात असते), मीठ, सोडियम बायकार्बोनेट (जे रक्तात आढळते) आणि अडिनोझिन ट्राय फॉस्फेट (एटीपी : जे पेशींना ऊर्जा देते) या घटकांचे मिश्रण करून डासांना ते अन्न म्हणून देण्यात आले आणि हे शोषताना डासांमधील कोणते मज्जातंतू उद्दिपित होतात हे निरीक्षण केले. वस्तुतः एटीपीची चव माणसाला कळत नाही. पण डासांच्या साठी मात्र तेच एटीपी हे पक्वान्न असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अर्थात जेव्हा या चार घटकांपैकी कोणताही एकच किंवा दोनच घटक असणारी द्रव्ये डासांना देण्यात आली, तेव्हा मात्र काही विशिष्ट मज्जातंतूच उद्दिपित झाले. जेंव्हा ग्लुकोज देण्यात आले तेंव्हा रक्त शोषणाऱ्या सोंडेंशी निगडित कोणतेही मज्जातंत उद्दिपित झाले नाहीत. याचे कारण बहुधा फुलांच्या मधुर रसात देखील साखर असते हे असावे. तेच निरीक्षण अन्य घटकांच्या बाबतीत दिसले. मात्र जेव्हा हे सगळे घटक असणारे एका अर्थाने कृत्रिम रक्त देण्यात आले तेंव्हा मात्र डासांच्या सोंडेंशी -म्हणजेच मानवी रक्त शोषणाऱ्या अवयवाशी- निगडित सर्व मज्जातंतू एकाच वेळी उद्दिपित झाले. मज्जातंतू उद्दिपित होणे याचा अर्थ शरीराला चेतना मिळणे. तेव्हा रक्त गोड आहे म्हणून डास जास्त चावतात, असे आता म्हणण्यात अर्थ नाही. रक्तातील सर्वच घटक एकत्र असताना डासांना आकर्षित करतात. डास चावू नयेत म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना यातून नवी दिशा मिळेल. अशी कोणती औषधे विकसित करता येतील का की जी मानवी रक्तात गेल्यावर डासांना ते रक्त शोषण्यापासून परावृत्त करता येईल किंवा रक्ताचा ’स्वाद’ डासांना येणार नाही, या दिशेने संशोधन करण्यास हे प्रयोग लाभदायी ठरतील. अखेर डासांमुळे पसरणाऱ्या साथींतून माणसाची मुक्तता करून मानवी जीवन निरामयी करावे हाच या सर्व प्रयोगांचा आणि संशोधनाचा उद्देश असतो.

Edited By - Prashant Patil

loading image