सर्च-रिसर्च : परागीभवनातील अनोखा सहकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lizard

फुलांमधले पराग वाहून नेण्याचे काम वारा आणि विविध प्रकारचे कीटक करतात. मात्र एका विशिष्ट प्रकारच्या फुलांमध्ये परागीभवन करण्याचे काम एका जातीचा सरडा करतो, हे धक्कादायक वास्तव शास्त्रज्ञांना संशोधनासाठी वेगळी दिशा देणारे आहे. अनेकदा विज्ञानात माहिती कणाकणाने जमा होते. असे माहितीचे कण गोळा होतात व सृष्टीबद्दलची समज वाढत जाते.

सर्च-रिसर्च : परागीभवनातील अनोखा सहकारी

फुलांमधले पराग वाहून नेण्याचे काम वारा आणि विविध प्रकारचे कीटक करतात. मात्र एका विशिष्ट प्रकारच्या फुलांमध्ये परागीभवन करण्याचे काम एका जातीचा सरडा करतो, हे धक्कादायक वास्तव शास्त्रज्ञांना संशोधनासाठी वेगळी दिशा देणारे आहे. अनेकदा विज्ञानात माहिती कणाकणाने जमा होते. असे माहितीचे कण गोळा होतात व सृष्टीबद्दलची समज वाढत जाते. दक्षिण आफ्रिकेमध्ये असा सरडा आढळला. रुथ कोझिएन आणि टिमो व्हॅन देर निएत हे वनस्पतीशास्त्रज्ञ जोडपे एका परिषेदसाठी गेलेले असताना एका फुलाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. हिरव्या रंगाच्या आवरणात लपलेले आणि तीव्र वासाचे ते फूल होते. त्या फुलाचे स्थानिक नावच ‘दडलेले फूल’ (गुथ्रिया कॅपेन्सिस) या अर्थाचे होते. परागीभवन आणि इकॉलॉजी हा या दांपत्याचा अभ्यासाचा विषय. असल्याने त्यांना अनेक गोष्टी जाणवल्या. इतर फुलांप्रमाणे आकर्षक रंग नाहीत. हिरव्या रंगामुळे ते सहज दिसून येत नाही. तसेच अगदी जमिनीलगत असल्याने त्याच्यात परागीभवन होण्यासाठी जमिनीवर वावरणारे उंदीर किंवा चिचुंद्रीसारखे सस्तन प्राणी यांचा हातभार लागत असावा असा त्यांनी अंदाज केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या फुलाचा उल्लेख १८७६मध्ये पहिल्यांदा झालेला असला तरी त्याच्या या पैलूबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी अजून दोन शास्त्रज्ञांचे सहकार्य घेतले व संशोधन सुरु झाले. त्यांचा दिवसा सकाळी सहा वाजता सुरू होई आणि बारा तास काम केल्यावर ते परत येत. या फुलांचे परागीभवन निशाचर प्राण्यांमुळे होत असेल असा अंदाज असल्याने त्या फुलांभोवतीच्या रात्रीच्या हालचालींची नोंद करणारी उपकरणे व कॅमेरे रात्री लावून ते दुसऱ्या दिवशी सकाळी येत. पाच दिवस काम करूनही त्यांना फारशी चांगली निरीक्षणे मिळाली नाहीत. मग त्यांनी संपूर्ण दिवसभराच्या हालचाली नोंदविण्याचे ठरवले. रात्री एकत्र बसून दिवसभरातील नोंदी व फोटो डाउनलोड करीत असताना (स्युडोकॉर्डीलस सबव्हर्डीस जातीच्या) एका सरड्याची प्रतिमा दिसली. सरडे फुलातील मरंद चाखण्यासाठी येतात, अशी नोंद १९७७मधली पोर्चुगीझ बेटे मादेरा येथे झालेली होती. त्यानंतर तशा प्राण्यांच्या ४० जाती फुलांपाशी येतात असे माहिती होते. मात्र मरंद खाणे वेगळे व परागीभवन होणे वेगळे. मरंद खाताना ते फुलेही नष्ट करीत असत. पण परागीभवन होत नसे. मग त्यांनी या सरड्याच्या नोंदी घ्यायला सुरुवात केली. या सरड्यांच्या हालचालींवर बंधने येतील असे केले. जेथे हे सरडे गेले नाहीत, त्या भागातील फुलांमध्ये ९५ टक्के कमी परागीभवन झाले होते. याचाच अर्थ हे सरडे परागीभवन करीत होते. त्यांच्या नाकाडाने ते मरंद चाखत होते. त्यांच्या नाकाडाला विशिष्ट रंग लावला. पुढे ते दुसऱ्या फुलापाशी जात होते, तेथील फुलांच्या मायांगापाशी हाच रंग लागलेला आढळला. या मरंदाची चव कडवट आणि जळालेल्या प्लॅस्टिकसारखी असावी असे, त्यातील एकाचे मत आहे. अशा पदार्थाकडे ते का आकर्षित होत असावेत असाही प्रश्न त्यांना पडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी सरपटणाऱ्या प्राण्यांकरवी परागीभवन होण्याची केवळ एकच नोंद आहे. तीन मीटर उंचीच्या लाल रंगाची फुले असणाऱ्या ट्रोकेटिया ब्लॅकबर्नियाना या जातीच्या झाडात गेको या जातीच्या सरपटणाऱ्या प्राण्याकडून परागीभवन होते. ही वनस्पती मॉरिशस बेटावर होती. त्या सरड्याच्या अंगावर लाल रंग होता, तो त्या फुलाशी मिळताजुळता होता व ही फुले कपाच्या आकाराची होती. गुथ्रिया फुलावरचा नारिंगी रंग सरड्याच्या अंगावरील रंगाशी मिळताजुळता होता व त्या फुलांचा आकारही कपासारखा होता. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर सारे धागेदोरे जुळत गेले आणि सरड्याद्वारे परागीभवन होण्याच्या पहिल्या घटनेची नोंद झाली.  ‘एरवी संथ- काहीशा कंटाळवाण्या गतीने चालणाऱ्या कामात असा एखादा रोमांचक क्षण येतो, की तो या धडपडीचे सार्थक करतो,’  ही यातील एका संशोधकाची प्रतिक्रिया बोलकी आहे.

Edited By - Prashant Patil

Web Title: Article Write Jayant Gadgil Pollination Lizard

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top