पर्यावरण : अनिर्बंध हस्तक्षेपाची लक्षणे

Environment
Environment

मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष अनादीकालापासूनचा आहे. पृथ्वी नावाच्या एकाच ग्रहावर मानवासह प्राणी, पक्षी असे सगळेच रहातात. या प्रत्येकाला आपापला अवकाश हवा असतो. यापूर्वी लोकसंख्या कमी होती. वनक्षेत्र जास्त होते. त्यामुळे वन्य प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक आधिवास आपोआप मिळत होता. गेल्या पाच-सहा दशकांमध्ये वनक्षेत्राची अपरिमित तोड झाली.

कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी मानवी वस्ती वाढल्याने रोजच्या रोज शेकडो झाडांची कत्तल झाली. वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक आधिवासावर मानवाने कुऱ्हाड घातली. ती उद्‌ध्वस्त केली. त्यामुळे पुणे, नाशिक, नगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जंगलात रहाणाऱया बिबट्याचा आधिवास बदलला. उसक्षेत्र हे त्याच्यासाठी सुरक्षित आधिवास झाला. सुरक्षित जागा, पाणी आणि अन्न या तीनही गरजा येथे पूर्ण होऊ लागल्या. त्यामुळे बिबट्यांच्या पुढच्या पिढ्या आता याच आधिवासात वाढत आहे. त्यातून आता वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढताना दिसतो.   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संघर्ष अटळ
वन, वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाचा नवीन टप्पा आता सुरू झाला. याचे कारण, या प्रत्येकाच्या अवकाशाची पुनर्रचना होत आहे. त्या प्रक्रियेतील हे संघर्ष आहेत, हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यांच्या हद्दीवर, ग्रामीण भागात, ऊसक्षेत्रापुरते मर्यादित असलेला वन्य प्राण्यांचा संघर्ष आता हळूहळू शहरांच्या गजबजलेल्या भागांपर्यंत येऊन पोचल्याचे दिसते. म्हणूनच नाशिक शहरात बिबट्या रस्त्याने पळताना दिसतो, तर कोथरुडसारख्या दाट लोकवस्तीच्या उपनगरातील नागरिक गव्याला बघायला रस्त्यावर गर्दी करत असल्याचे विदारक चित्र भविष्यातील संघर्षाची भीषणता स्पष्टपणे दाखवते. पृथ्वी ही फक्त माणसाची मक्तेदारी आहे, अशा आविर्भावात मानवी समाज पोचलाय की काय, अशी शंका निर्माण व्हावी, इतःपर मानवाने निसर्गात हस्तक्षेप केला आहे. टेकड्याफोडीपासून ते जंगलतोडीपर्यंत पावलोपावली याच्या खुणा आपल्याला अवतीभोवती दिसतात. त्यामुळे मानवाचा या अनिर्बंध हस्तक्षेप थांबला जात नाही, तोपर्यंत वन्यजीव आणि मानव संघर्ष अटळ राहील, यावर तज्ज्ञांचे एकमत होत आहे.

मानवावरील हल्ले
बिबटे, वाघ या मार्जारकुलातील नेमका नरभक्षक कोण, हे ओळखण्याच्या प्रक्रियेत चुका होण्याची शक्‍यता असते. एखाद्याला माणसावर हल्ला करण्याची सवय लागली आहे का, याची वेगवेगळ्या परिमाणांमधून वारंवार पडताळणी करावे लागते. त्यासाठी कॅमेऱ्यासारखे अद्ययावत तंत्रज्ञान निश्‍चितच उपयुक्त ठरते. १९७२च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार शिकार बेकायदा ठरविण्यात आली आहे. नरभक्षक वाघावर ज्या-ज्या वेळी गोळ्या झाडल्या, त्या-त्या वेळी प्राण्यांच्या हक्कावर जास्त चर्चा होते. प्रत्यक्षात ती वन्यजीव संवर्धनाच्या परिप्रेक्ष्यातून चर्चा झाली पाहिजे. मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या एकत्र रहाण्याबद्दल कायम टोकाची भूमिका घेतली जाते. एकतर ती लोकानुनय करणारी असते किंवा थेट प्राणीहक्काची पताका हाती घेणारी असते. यात दोन्हीतील सुवर्णमध्य गाठणे, ही आता काळाची गरज आहे.

यासाठी या प्रश्नाच्या मुळाशी जावे लागेल. असहिष्णुता हे यापैकी एक कारण आहे. तर, ती नेमकी कशामुळे येते, याचा शोध घेतला पाहिजे. पिकाचे, गोधन, मेंढीपालन, कुकुटपालन याचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटके बसू लागतात, तेव्हा वन्य प्राण्यांबद्दलची सहिष्णुता संपते. ही सहिष्णुता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही विमा उतरविता येतो का, याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले टाकली पाहिजेत. वन्यजीवांना प्रतिबंधित करण्यासाठी ठोस पावले उचलता येतील का, त्याचे प्रशिक्षण देता येईल का, याचा समावेश मानव आणि वन्य जीव संघर्षातील उपाययोजनांसाठी केला पाहिजे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com