सर्च-रिसर्च : विषाणूतील परस्पर संपर्क आणि मैत्री

Bacteria
Bacteria

विषांणूचे जसे अनेक प्रकार आढळतात, त्याप्रमाणे त्यांचे संसर्गाचे लक्ष्यही वेगळे असते. उदा. स्वाइन फ्लूचा विषाणू खास करून डुकरांना लक्ष्य करतो तर, बर्ड फ्ल्यूचा विषाणू पक्षांना संसर्ग करून आपली वृद्धी करतो. याखेरीज ‘फेज’ नावाच्या विषाणूंचा सर्वांत मोठा वर्ग जिवाणूंना संसर्ग करतो. जगातील जिवाणूंची (बॅक्टेरिया) प्रचंड संख्या पाहता हे विषाणू पर्यावरणातील त्यांचा समतोल राखायला मदत करतात. वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीतील ‘बॅसिलस’ वर्गातील बॅसिलस ॲन्थ्रॅसिस, बॅसिलस सिरीयस व बॅसिलस थुरीनजिएनसिस सारख्या संसर्गकारी जिवाणूंचे संतुलन फेज विषाणू साधतात. सजीवांच्या व्याख्येनुसार विषाणूंना पेशीची वैशिष्ट्ये नसल्यामुळे त्यांना निर्जीवांत गणले जाते. पण संधी मिळताच ते झपाट्याने वाढतात आणि इतर वेळेस सुप्तावस्थेत (लायसोजेनी) जातात. अशा वेळेस त्यांच्यात काही परस्पर संवाद होतो का? यावर गेले कित्येक वर्षे संशोधन चालू आहे. २०१७ पासून त्याबाबत ठोस पुरावे मिळून त्यांची विशिष्ट संपर्क भाषा असते आणि त्याद्वारे ते जिवाणूंवर कुरघोडी करून अस्तित्व अबाधित राखतात हे दिसून आले आहे. जिवाणूंच्या वसाहतीची वाढ होत असताना काही रसायने बाहेर पडतात. त्याद्वारे जिवाणूंना केव्हा वाढ करायची आणि ती थांबवायची याबद्दल संदेश मिळतो. ‘कोरम सेन्सिंग’ या नावाने ती जिवाणू विज्ञानात ओळखली जाते. विषाणूंची संपर्क यंत्रणा जिवाणूंच्या या संदेशांचा कानोसा घेत (मॉलेक्युलर स्नूपिंग) आपली संदेश यंत्रणा अद्ययावत ठेवते हे विशेष!

जिवांणूना लक्ष करून जेव्हा फेज विषाणूंची अनिर्बंध वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम जिवाणू फुटण्यात होतो. पण असे सतत चालल्यास सर्व जिवाणू नष्ट होऊन विषाणूंचा आसराच जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी विषाणूंना सुप्तावस्थेत (लायसोजेनी) जाणे भाग पडते. हे साधायला विषाणूंची संपर्क यंत्रणा कामाला येते. या बाबतीत इस्राईलच्या विझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये डॉ. रोटेम सोरेक आणि सहकाऱ्यांनी गेले तीन वर्षे संशोधन करून त्यातील बारकावे शोधून काढले आहेत. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की विषाणू जिवाणूत प्रवेश करताच एका सहा अमिनो आम्लांचा समावेश असलेल्या पेप्टाइडची निर्मिती करतो. यातून संदेश यंत्रणेची सुरुवात होते. या पेप्टाइडद्वारे विषाणूने वृद्धी करायची का सुप्तावस्थेत (लायसोजेनी) जायचे हे ठरवले जाते. लॅटिन भाषेतील शब्दाचा आधार घेऊन त्याला ‘आर्बिट्रियम’ म्हणून संबोधले गेले आहे. विषाणू जसे वाढतील तसे या पेप्टाइडची जिवाणू भोवतीची पातळी वाढते. विशिष्ट पातळीनंतर मात्र हे पेप्टाइडस जिवाणूत परत प्रवेश करतात आणि विषाणू वृद्धीची क्रिया थांबवून त्यांना बॅक्टेरियाच्या ‘जिनोम’मध्ये समाविष्ट व्हायला भाग पाडतात.

फेज विषाणूंतील सहकार 
एकाच प्रकारच्या विषाणूंमध्ये ऑर्बिट्रियम पेप्टाइडसद्वारा संपर्क होतो हे पाहिले गेले आहे. पण विभिन्न वर्गातील विषाणू स्वतःच्या अस्तित्वाला धोका असतानाही दुसऱ्या वर्गातील  विषाणूला मदत करतात. सहसा जिवाणू आपल्या क्रिस्पर यंत्रणेने फेज विषाणूच्या डीएनएचे तुकडे करतात आणि आपला बचाव करतात. पण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सॅम मुनोझ आणि इंग्लंडमधील एक्झिटेर विद्यापीठाचे एडझे वेस्ट्रा यांनी स्यूडोमोनास जिवाणूंवर वर दोन प्रकारचे विषाणू हल्ला करून त्यांना कसे नष्ट करतात ते संशोधनातून दाखवले आहे. या क्रियेत प्रथम  क्रिस्पर विरोधी प्रथिने असणारा विषाणू जिवाणूची प्रतिकारशक्ती बोथट करतो. त्यात काही विषाणू नाशही पावतात. मग  कमकुवत झालेल्या जिवाणूत  दुसऱ्या वर्गातील विषाणू सहजी प्रवेश मिळवून संसर्ग करू शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑर्बिट्रियमचे औषधी उपयोग
आर्बिट्रियमवर संशोधन करणारे मुख्य संशोधक सोरेक यांच्या मतानुसार आर्बिट्रियमसारखी यंत्रणा मानवाला संसर्ग करणाऱ्या एच आय व्ही आणि हर्पिस सिंप्लेक्ससारख्या विषाणूत असेल तर त्यांना प्रदीर्घ काळ सुप्तावस्थेत ठेवायला ती एखाद्या औषधासारखी वापरता येईल. एकंदरीत विषाणूंची संपर्क यंत्रणा जाणण्यामुळे विषाणूबरोबरच जिवाणू संसर्ग रोखण्याचेही मार्ग सापडणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com