esakal | सर्च-रिसर्च : जलपान आणि स्थूलत्व
sakal

बोलून बातमी शोधा

water-drink

कोलोरॅडो डेन्व्हर विद्यापीठातील संशोधक मीगेल लॅनस्पा यांनी पाणी नेमके काय भूमिका यात बजावते यावर संशोधन केले आहे आणि पाणी व स्थूलपणा यांच्यात काय संबंध आहे यावरही प्रकाशझोत टाकला आहे.

सर्च-रिसर्च : जलपान आणि स्थूलत्व

sakal_logo
By
राहुल गोखले

काही वेळा उपाय अगदी सहज करण्यासारखे असतात. हृदयाची व्याधी, हृदयविकाराचा झटका किंवा टाइप २ प्रकारचा मधुमेह अशा आजारांना कारणीभूत अवस्था एकवटतात तेव्हा त्यांना ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ म्हटले जाते. या अवस्थांमध्ये रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात असाधारण वाढ होणे, कमरेभोवती चरबी साठणे अशी लक्षणे असतात. दुसरीकडे स्थूलपणा हादेखील त्रासदायक. मात्र या दोन्हीवर पथ्य म्हणून पाणी पिण्याने लाभ होऊ शकतो, असा निष्कर्ष ताज्या संशोधनात काढण्यात आला आहे. कोलोरॅडो डेन्व्हर विद्यापीठातील संशोधक मीगेल लॅनस्पा यांनी पाणी नेमके काय भूमिका यात बजावते यावर संशोधन केले आहे आणि पाणी व स्थूलपणा यांच्यात काय संबंध आहे यावरही प्रकाशझोत टाकला आहे. ‘जेसीआय इन्साइट’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शरीरातील वॅसोप्रेसीन नावाचे संप्रेरक हे शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते आणि त्यातूनच आपल्याला तहान लागल्याची भावना होते. ज्यांना मधुमेह आणि स्थूलपणा असतो त्यांच्यात मात्र या पदार्थाचे प्रमाण वाढलेले दिसते. तसे का असते यावर या संशोधनात लक्ष केंद्रित करण्यात आले. संशोधकांनी उंदरांवर हे प्रयोग केले. त्यांनी या एका गटातील उंदरांना गोड पाण्याचे सेवन करण्यास लावले- यात मुख्यतः फ्रुकटोज प्रकारची शर्करा होती; तर दुसऱ्या गटातली उंदरांना साधे पाणी पिण्यास दिले. आढळले ते असे की ज्या उंदरांना फ्रुकटोजयुक्त पाणी देण्यात आले होते त्यांच्या बाबतीत मेंदूला तसे संदेश जाऊन वॅसोप्रेसीनची निर्मिती सुरू झाली. या वाढलेल्या वॅसोप्रेसीनने मग पाण्याचा शरीरातील साठा वाढवत ठेवला आणि चरबीच्या स्वरूपात ती साठवण झाल्याने डिहायड्रेशनमध्ये त्याची परिणती झाली. याचे पर्यवसान स्थूलपणा वाढण्यात झाले. ज्या उंदरांना साधे पाणी देण्यात आले होते त्यांच्या बाबतीत मात्र स्थूलपणा वाढला नाही. याचा पुढे अधिक खोलात जाऊन या संशोधकांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळले की याला ‘व्हीबी’ नावाचा रिसेप्टर कारणीभूत आहे. रिसेप्टर सामान्यतः ऊर्जेचे रूपांतर विद्युत संदेशांमध्ये करतात. ‘व्हीबी’ या रिस्पेटरची माहिती असली तरी त्या रिसेप्टरचे नेमके कार्य काय याविषयी मात्र पुरेशी माहिती नव्हती. या प्रयोगांत त्याचाही उलगडा झाला आहे. ज्या उंदरांत या रिसेप्टरचा अभाव होता, त्या उंदरांमध्ये शर्करेचा काहीही प्रतिकूल परिणाम दिसला नाही. मात्र रिसेप्टर असणाऱ्यांमध्ये मात्र साध्या पाण्याने जो परिणाम साधला तो अनुकूल असाच होता; तो म्हणजे वॅसोप्रेसीनचे उत्पादन नियंत्रणात ठेवणे आणि पर्यायाने स्थूलपणाला अटकाव करणे. शर्करेमुळे वॅसोप्रेसीनचे उत्पादन होण्यास शरीरातील यंत्रणा उद्युक्त करतात आणि मग पाणी साठविण्याच्या कृतीने हेच वॅसोप्रेसीन चरबी साठण्यास म्हणजेच पर्यायाने स्थूलपणा वाढीस लागण्यास कारणीभूत ठरते हा या प्रयोगांचा सारांश.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डिहायड्रेशनचा त्रास
वाळवंटांतील प्राण्यांमध्ये वॅसोप्रेसीनचे प्रमाण अधिक आढळते यामागे हाच तर्क आहे. त्या प्राण्यांना पाणी सहज मिळत नाही आणि त्यामुळे चरबीच्या रूपाने हे पाणी शरीरात साठविले जाते. पाणी प्यायले नाही की डिहायड्रेशन होते आणि त्याचा परिणाम स्थूलपणा वाढण्यात होतो, असाही संबंध या संशोधकांनी दृगोच्चर केला आहे. याचाच संबंध मानवी शरीराशी लावताना संशोधकांनी म्हटले आहे, की स्थूल असणाऱ्या व्यक्तींमध्ये बऱ्याचवेळा डिहायड्रेशनचा त्रास आढळतो त्याचे कारणही हेच असते की पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते. तेव्हा साधे पाणी पीत राहणे हा एकीकडे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ आणि दुसरीकडे स्थूलपणा या दोन्हींचा अपाय आटोक्‍यात ठेवण्यासाठी सहजसाध्य उपाय आहे हेच संशोधकांनी या प्रयोगांतून अधोरेखित केले आहे.

loading image
go to top