esakal | सर्च-रिसर्च : ताऱ्याभोवती सापडला प्राणवायू
sakal

बोलून बातमी शोधा

प्राचीन ताऱ्याचे प्रातिनिधिक चित्र

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, ‘आयएसी’ आणि केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला. त्यांना एक प्राचीन तारा सापडला असून, त्याच्याभोवती मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन अर्थात प्राणवायू असल्याचा दुजोरा मिळाला आहे.

सर्च-रिसर्च : ताऱ्याभोवती सापडला प्राणवायू

sakal_logo
By
सम्राट कदम

विश्वाची निर्मिती कशी झाली; त्यातून तारे, ग्रह, आकाशगंगा असलेले आजचे विश्व कसे निर्माण झाले? त्याची प्रक्रिया नक्की कशी होती आणि भविष्यात त्याचे काय होणार आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे अनेक वर्षांपासून माणूस शोधत आहे. माणसाने विश्वनिर्मितीचे अनेक सिद्धांत आजवर मांडले आहेत आणि ते सिद्धांत खरे आहेत की नाही, हे पडताळण्यासाठी तो वेधशाळेच्या माध्यमातून अवकाशातील ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांची निरीक्षणे घेत आहे. विश्वनिर्मितीचा सर्वांत जास्त योग्य मानला जाणारा सिद्धांत म्हणून स्टीफन हॉकिंग्ज यांचा ‘बिग बॅंग’चा सिद्धांत ओळखला जातो. सुईच्या टोकापेक्षाही सूक्ष्म असलेले विश्व क्षणार्धात महाविस्फोटाने पसरले. त्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडात महाकाय कृष्णविवरे, तारे निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे ग्रह, ताऱ्यांच्या सूर्यमाला निर्माण झाल्याचा सिद्धांत मांडण्यात येतो. सुरुवातीच्या कालखंडात ताऱ्यापासून इतर मूलद्रव्ये कशी तयार झाली? त्यातून ग्रहांची आणि अर्थातच जीवनाची प्रक्रिया कशी सुरू झाली? याबद्दल शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असाच एक प्रयत्न अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, ‘आयएसी’ आणि केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला. त्यांना एक प्राचीन तारा सापडला असून, त्याच्याभोवती मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन अर्थात प्राणवायू असल्याचा दुजोरा मिळाला आहे. ‘दी ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर’ या नियतकालिकात गेल्या महिन्यात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. हवाई बेटावरील ‘डब्ल्यू. एम. केक’ वेधशाळेच्या साह्याने शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचा आणि त्याभोवतालच्या प्रभामंडळातील १६ रासायनिक मूलद्रव्यांचा अभ्यास केला. आपल्याच आकाशगंगेत आढळणाऱ्या या ताऱ्याचा आकार ओबडधोबड आहे. त्यामुळे त्याला ‘हेलो स्टार’ असे संबोधले आहे. ऑक्‍सिजन हे ब्रह्मांडात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत जास्त आढळणारे मूलद्रव्य आहे. ताऱ्यांमध्ये हेलियम, हायड्रोजन, नंतर ऑक्‍सिजनची निर्मिती झाली. त्यातूनच पुढे इतर मूलद्रव्यांची निर्मिती होत पृथ्वीसारखे ग्रहही निर्माण झाले. ताऱ्यात असलेल्या रासायनिक रचनेनुसार ‘बिग बॅंग’नंतर सुमारे दहा कोटी वर्षांत या ताऱ्याची निर्मिती झाली असावी. गंमत म्हणजे, ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या कालखंडात ऑक्‍सिजनची निर्मितीच झाली नव्हती. तो निर्माण झाला तो आपल्या सूर्यापेक्षा वजनाने दहापटीने मोठ्या असलेल्या ताऱ्याच्या पोटात! तेही मोठाल्या न्यूक्‍लिअर फ्युजन अभिक्रियेतून. 

सामान्य ताऱ्यापेक्षा या ताऱ्याभोवती कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण जास्त आहे. अनुक्रमे दहा, आठ आणि तीन टक्के या प्रमाणात ही मूलद्रव्ये या ताऱ्याभोवती असल्याचे आढळले. ‘हेलो’ प्रकारातील काही तारे सध्या आपल्या सूर्यमालेत आहेत. परंतु, मूलद्रव्यांचे असे प्रमाण त्यांच्यामध्ये नाही. याच ताऱ्याच्या मदतीने ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या कालखंडात झालेल्या महाविस्फोटांची माहिती मिळविणे शक्‍य होणार आहे. तसेच हायड्रोजन, हेलियम आणि ऑक्‍सिजन यांपेक्षा जास्त अनुक्रमांक असलेल्या इतर मूलद्रव्यांची निर्मिती कशी झाली, याबरोबरच पृथ्वीसारख्या ग्रहांच्या निर्मितीवरही त्यामुळे प्रकाश पडेल.  

loading image