काँग्रेसचा गळका हौद?

अनंत बागाईतकर
Monday, 16 March 2020

काँग्रेसला व राहुल गांधी यांना राजकारणात टिकायचे असेल, तर कार्यपद्धती बदलावी लागेल आणि नव्या परिस्थितीशी व संकल्पनांशी जुळवून घ्यावे लागेल. तसे केले नाही, तर काँग्रेस पक्ष बाहेर फेकला जाऊ शकतो किंवा राहुल गांधी बदलण्यास तयार नसतील, तर त्यांना व अन्य गांधींना बदलण्याची तयारी काँग्रेसला ठेवावी लागेल!

गळकी बादली, गळका हौद यांची अवस्था कशी असते? पहिल्यांदा लहानसे छिद्र पडते, ते बुजवल्यावर काही दिवसांनी आणखी एक, मग थोडे मोठे.....! त्यात भर पडत जाते ! कारण? मूळ बादली किंवा मूळ हौदच कमजोर व जुना झालेला असतो. डागडुजी केली तरी ती तात्पुरतीच ठरते. त्यामुळे पूर्ण नूतनीकरणाची गरज निर्माण होते. काँग्रेसला तशाच नूतनीकरणाची आवश्‍यकता आहे, अन्यथा गळती लागत लागत सर्वच संपुष्टात येण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून गेले म्हणून पक्ष हादरला किंवा त्यामुळे पक्ष संपणार आहे, असे मुळीच नव्हे. कारण शिंदे यांना ‘ग्वाल्हेरचे महाराज’ ही पदवी व त्यामुळे वलय प्राप्त असले तरी ते फार लोकप्रिय नेते आहेत, असा त्याचा अर्थ नाही. अन्यथा २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले नसते. आताही जे २२ आमदार बाहेर पडले आहेत, त्यातील फक्त नऊ आमदार त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि उरलेली मंडळी कधीही टोप्या फिरवू शकतात. त्यामुळे शिंदे यांच्या बहिर्गमनाचे निमित्त करून काँग्रेसचे नेतृत्व आत्मपरीक्षण करून पक्षाला केवळ सावरण्याचेच नव्हे, तर त्याला पुन्हा गतिमान व चैतन्यशील करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करू इच्छिते यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून आहे.

पक्षाध्यक्षपदाबाबतचा पेच
अलीकडे दोन-तीनदा संसदेत राहुल गांधी यांच्याशी पत्रकारांचा अनौपचारिक संवाद झाला. राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष न होण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. पक्षात ते जे बदल करू इच्छितात, ती संधी त्यांना मिळत नसल्याने पुन्हा अध्यक्ष होऊन करायचे काय, असा त्यांच्या एकंदर बोलण्याचा रोख दिसला. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. राहुल गांधी जो काही काळ अध्यक्ष होते, त्या काळात पक्षातील ‘ओल्ड गार्ड’ काहीसे पिछाडीवर गेले होते. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व पुनःश्‍च त्यांच्या मातुःश्री सोनिया गांधी यांच्याकडे गेले. त्यामुळे पिछाडीवरील ‘ओल्ड गार्ड’ पुन्हा सक्रिय झाले आणि पक्षसंघटनेची सूत्रेही त्यांनी पुन्हा ताब्यात घेतली. याचा अर्थ राहुल गांधी यांचे पक्षात काहीच चालत नाही, असा घ्यायचा म्हटले तर तो वेडगळपणा ठरेल. राज्यसभेचे उमेदवार निवडताना सोनिया, राहुल व प्रियांका या गांधी त्रिकुटानेच निर्णय घेतलेले आहेत. तसेच अन्य काही संघटनात्मक निर्णयातही त्यांचा सहभाग आहे. यामुळेच पक्षातील राहुल समर्थकांनी त्यांचे अध्यक्ष म्हणून पुनरागमन व्हावे यासाठी आरोळ्या सुरू केल्या. परंतु खुद्द राहुल गांधी यांची भूमिका आपल्याकडे जबाबदारी द्यायची असेल, तर संपूर्ण आणि त्यांना पाहिजे ते बदल करण्याच्या अधिकारांसह दिली जावी, अशी असल्याने काहीशी पेचाची स्थिती आहे. पक्षाचे एक नेते या स्वरूपात आपण पक्षाचे काम सांभाळत आहोतच, असेही राहुल गांधी काहीजणांकडे बोलल्याचे सांगण्यात येते. थोडक्‍यात क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधारपदाऐवजी संघातील एक खेळाडू म्हणून विक्रम केले, तसा काहीसा पवित्रा राहुल गांधी यांचा दिसून येतो. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील काही मंडळींनी आणि पक्षाबाहेरच्या काँग्रेसच्या हितचिंतकांनीही गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीकडे पक्षाची जबाबदारी दिली जावी, असा हाकारा सुरू केला आहे.

प्रादेशिक पक्षांची नाराजी
एका बाजूला खुद्द काँग्रेसमध्येच दिशाहीनपणा व भरकटलेपणा दिसून येत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षांचे भाजप-विरोधी राजकारण व मोर्चेबांधणीतही अन्य विरोधी व प्रामुख्याने सबळ प्रादेशिक पक्ष काँग्रेसला सहभागी करून घेताना दिसत नाहीत. अर्थात ज्याप्रमाणे जुने राजे-महाराजे यांना आपल्या पूर्ववैभवाचा अहंकार असतो, तसाच काँग्रेसलाही आहे. आपण राष्ट्रीय पक्ष असल्याचा विलक्षण मद काँग्रेसमध्ये अद्याप आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे दिल्ली दंगलीच्या वेळचे आहे. दिल्लीत भीषण दंगल झाल्यानंतर दंगलग्रस्त भागात शांततायात्रा काढणे, राष्ट्रपतींना निवेदन देणे वगैरे कार्यक्रम संयुक्तपणे करण्याबाबत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी काँग्रेस नेतृत्वाला सुचविले. त्यात सर्व भाजपविरोधी पक्षांना सामील करणे व त्यातून शक्तिप्रदर्शन करण्याची त्यांची योजना होती. परंतु काँग्रेस नेतृत्वाने ‘कल्पना-चौर्य’ करून स्वतः एकट्याने व परस्पर राष्ट्रपतींना भेटण्याचा कार्यक्रम केला. शांततायात्रा काढण्याचे धैर्य नव्हते, पण दंगल शांत झाल्यानंतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर राहुल गांधी यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. विरोधी पक्षांना ज्या पद्धतीने काँग्रेसने दगा दिला, त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेसवर नाराज होणे स्वाभाविक होते. त्याचीच परिणिती मग शरद पवार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी, अरुण शौरी व यशवंत सिन्हा, डी. राजा यांनी एका संयुक्त पत्राद्वारे काश्‍मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करण्यात झाली. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्याची घोषणा झाली.

नवी राजकीय संस्कृती
राहुल गांधी यांचा पक्षावर, पक्षाच्या धोरणावर दिसून येणारा प्रभाव हा असा आहे. राहुल गांधी यांना आघाडीच्या राजकारणात फारसा रस नाही. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला विरोध केला आणि तुटकपणे त्यास मान्यता दिली. ‘एनजीओ’ आणि पोथीनिष्ठेच्या आधारे राजकारण करण्याकडे राहुल गांधी यांचा कल आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची त्यांची तयारी असली तरी इतरांची ती नाही. त्यामुळेच काँग्रेसला गळती लागली आहे. राजकारणाचे स्वरूप धंदेवाईक आणि ‘करिअरिस्ट’ झाले आहे. क्रिकेटचे उदाहरण द्यायचे झाल्यास आता लोकांना पाच-पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात रस राहिलेला नाही. त्यांना ‘टी-२०’ किंवा फारतर एक दिवसाच्या सामन्यात रस आहे. जेथे चटकन चमकता येते आणि नाव, कीर्ती, मानमरातब प्राप्त होऊ शकतो. ज्योतिरादित्य शिंदे किंवा तत्सम नेत्यांना काँग्रेसमध्ये राहून काही मिळत नसेल, तर ते फार काळ ‘पक्षसेवा’ करू शकणार नाहीत. त्यांना ‘राजकीय मेवा’ मिळेल तेथे ते जातील. या प्रवृत्ती राजकारणावर वरचष्मा गाजवू लागतात, तेव्हा विचारसरणी, तत्त्वज्ञान या गोष्टी पुस्तकी होतात. राहुल गांधी अशाच काही कल्पनांना उराशी कवटाळून बसू पाहात असल्याने नव्या पिढीला आकर्षित करण्यात त्यांना अपयश येत आहे. कारण नव-राजकारणात ‘तत्काळ- परिणाम’, ‘तत्काळ फलनिष्पत्ती’ (इमिजिएट आउटकम अँड डिलिव्हरी) अपेक्षित आहे. खूप काम करून मग उद्दिष्टप्राप्ती हा दीर्घ काळाचा मार्ग निवडण्याची कुणाची तयारी नाही. त्यामुळेच ज्या पक्षाला काल नावे ठेवली, त्याच पक्षात दुसऱ्या दिवशी प्रवेश करून इच्छित पदप्राप्तीचे खेळ व सोहळे हा नियम होऊ पहात आहे. त्यामुळेच काँग्रेसला व राहुल गांधी यांना राजकारणात टिकायचे असेल, तर कार्यपद्धती बदलावी लागेल आणि नव्या परिस्थितीशी व संकल्पनांशी जुळवून घ्यावे लागेल. त्यासाठी सबळ प्रादेशिक पक्षांशीदेखील प्रसंगी हातमिळवणी करावी लागेल. या बदलत्या परिस्थितीशी जुळते न घेतल्यास काँग्रेस पक्ष बाहेर फेकला जाऊ शकतो किंवा काँग्रेस व राहुल बदलण्यास तयार नसतील तर त्यांना व अन्य गांधींना बदलण्याची तयारी काँग्रेसला ठेवावी लागेल !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anant bagaitkar article congress politics