वणव्यांच्या वसुंधरेला झळा 

Forest-fires
Forest-fires
Updated on

जगाच्या एखाद्या भागातील जंगलात मोठा वणवा लागल्याच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. एका संशोधनानुसार, वणव्याचा धूर वातावरणात काही आठवडे राहतो, हजारो मैलांचा प्रवास करतो व आगीपासून खूप दूर अंतरावरील लोकांचे आरोग्यही बिघडवतो, असे समोर आले आहे. त्याचबरोबर धुरातील काळा आणि करडा रंग उष्णता शोषून घेतो व त्यामुळे खालील भागाचे तापमान वाढते. त्यामुळे भविष्यात जागतिक तापमानवाढीची समस्या अधिक गंभीर बनेल, असा इशारा ‘नासा’ने दिला आहे.

‘ग्रीनपीस इंटरनॅशनल’ या संस्थेच्या अहवालानुसार, २०२०मध्ये रशियामध्ये एक कोटी ९० लाख, तर ऑस्ट्रेलियात एक कोटी ८० लाख हेक्‍टर जंगल आगीत नष्ट झाले. या आगींत तीन कोटी प्राणी मृत्यमुखी पडले किंवा विस्थापित झाले. आगीतील धूर हवेत २३ किलोमीटरपर्यंत वर जात पृथ्वीच्या वातावरणातील दुसऱ्या स्तरापर्यंत (स्टॅटोस्फिअर) पोचतो आणि वाऱ्यांमुळे संपूर्ण पृथ्वीवर पसरतो. सारा हेंडरसन या पर्यावरण संशोधिकेच्या मते, ‘‘यावर्षी सायबेरियात लागलेल्या आगीचा धूर गेले अनेक महिने हवेतच असून, प्रशांत महासागर ओलांडून तो अलास्कापर्यंत पोचला आहे. त्याने सिॲटलसारख्या दूरच्या अंतरावरील शहरातीलही हवा प्रदूषित केली आहे. वणव्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंमध्ये काजळीचे अगदी छोटे कण असतात. वाहने व जड उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या व शहरांतील प्रदूषणात भर घालणाऱ्या कणांना पार्टिक्‍युलेट मॅटर (पीएम) म्हणून ओळखले जाते. मात्र, वणव्यातील धुरामुळे या कणांमध्ये प्रचंड वाढ होते व प्रदूषण प्रमाणाबाहेर वाढते. उदा. कॅनडातील जंगलात वणवा पसरल्यानंतर ब्रिटिश कोलंबियामधील शहरांत ‘पीएम ३’ कण वीसपट अधिक मोजले गेले. वणव्यातून बाहेर पडणारे ‘पीएम २.५’ कण मानवी आरोग्यासाठी हानीकारक ठरतात. हे कण श्वासोच्छ्वासाबरोबर मनुष्याच्या फुफ्फुसात प्रवेश करून श्वसनसंस्था निकामी करतात व त्यानंतर रक्तात पसरतात. त्यातून खोकला, श्वास लागणे व अस्थमाच्या झटक्‍यासारखे आजार उद्भवतात. ऑस्ट्रेलियात २०१९मध्ये लागलेल्या वणव्यानंतर श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या ३४ टक्‍क्‍यांनी वाढली होती. त्याचबरोबर या कणांतील रासायनिक घटकांमुळे कर्करोगासारखे आजार संभवतात, मुले अकाली जन्मतात व ‘कोरोना’सारख्या विषाणूजन्य आजारामध्ये रुग्णाची स्थिती अधिक दयनीय करतात. हा धूर फुफ्फुसातील प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ‘मायक्रोफेजेस’ या पेशींना इजा पोचवतो. वणव्यातील धुराचे काही दिवसानंतर ऑक्‍सिडेशन होते व तो मानवी पेशी व उतींसाठी सामान्य धुरापेक्षा चारपट अधिक घातक बनतो.’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावरचे उपाय सांगताना हॅंडरसन म्हणतात,‘‘ वणवा पसरलेल्या भागातील लोकांनी ‘एन ९५’ मास्क वापरणे फायद्याचे ठरते. घरामध्ये एअर प्युरिफायर वापरणे, घरात शक्‍यतो धुराला प्रवेश करू न देणे यातूनही बचाव होतो. मात्र, वणव्यांचा परिणाम भविष्यात मानवाबरोबरच पर्यावरणावरही होणार आहे. वणवा व शेतीतील तण जाळल्याने वातावरणात कार्बन डायऑक्‍साइड व इतर हरितगृह वायू मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत.’’ अल्बेर्टा विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञ माइक फ्लानिजन यांच्या मते, ‘‘जगभरातील वणव्यांमुळे वातावरण तप्त होऊन उन्हाळ्यांचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे जंगलात आगींचे प्रमाण वाढत असून, या आगींमुळे पुन्हा वातावरण तप्त होत आहे. भविष्यात हे दुष्टचक्र असेच सुरू राहणार आहे.’’ ‘नासा’च्या संशोधकांनी वातावरणावर होणारा धुराचा आणखी एक परिणाम शोधून काढला आहे. त्यांना अंटार्टिकासारख्या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वीच्या धुराचे ढग दाटून राहिलेले आढळले आहेत. जागतिक पातळीवर विचार केल्यास या ढगांमुळे पृथ्वीचे तापमान काहीसे कमी होते, मात्र स्थानिक पातळीवर या कणांमुळे तापमानात वाढ होते, हे आर्क्‍टिक परिसरात दिसून आले आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनून जंगलांतील वणव्यांचे प्रमाण वाढत जाईल. जगभरात वणव्यांचे प्रमाण वाढत असताना संशोधकांचे हे इशारे काळजीत भर टाकणारेच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com