सर्च-रिसर्च : शतायुषी होण्याचे रहस्य

Old-People
Old-People

आपल्याकडे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर शरद ऋतू असतो. या काळात नभांगणातील ग्रह-तारे खुलून दिसतात. दिवस सणासुदीचे असल्याने वातावरण सुखावह असते. अशा वेळी ‘जीवेत शरद: शतम्‌; पश्‍येत शरद: शतम्‌’ असे आशीर्वचन कानावर पडते. पण, फार कमी लोक शतायुषी होतात. जगातील पाच जागी शतायुषींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याबाबत संशोधन चालू असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इटलीजवळच्या भूमध्य समुद्रात सार्डिनिया बेटावर शंभरी ओलांडलेले सरासरी २० नागरिक असतातच; पण नव्वदीपुढील लोकांची संख्याही जास्त असते. तेथील टियाना गावातील एक लाख लोकांमधील २४ नागरिक शतायुषी असतात. हे बेट भौगोलिकदृष्ट्या ‘एकाकी’ पडलेले आहे. येथे बाहेरच्या लोकांची ये-जा नसते. स्थानिक लोकांचा कल आरामात व मजेत जीवन व्यतीत करण्याकडे असतो. इथे कुटुंबप्रधान संस्कृती असून, तीन पिढ्या एका घरात वावरताना दिसतात. वडीलधारी मंडळी अनुभवी असल्यामुळे त्यांना मान आहे. सर्व मध्यमवर्गीय आहेत. बरेचसे लोक मेंढपाळ असल्यामुळे रोज २० ते २५ किमी चालतात. त्यांच्या रंगगुणसूत्रात एम-२६ नावाचे जनुक (‘जीन मार्कर’) आहे. त्यात त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य दडलेलेय. सार्डिनियाचे लोक बाहेर कुठे जात नाहीत. शेळीचे दूध, चीज, भाजीपाला (वांगी, घोसावळी, टोमॅटो), चपटा पाव आणि रेड वाइन असा त्यांचा साधा आहार आहे. शांत खेळीमेळीचे कौटुंबिक जीवन, चालण्याचा व्यायाम आणि ‘एम-२६’ जणू हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असेल. 

अन्न हेच औषध
जपानच्या ओकिनावा भाग ‘ब्लू झोन’मध्ये येतो. येथील रिकयु बेटावर प्रति एक लाख नागरिकांमधील सत्तर शतायुषी आहेत. यांचा आहार कमी कॅलरीचा; पण ‘पोटभरू’ असतो. भात कमी; पण भाजीपाला जास्त, हे वैशिष्ट्य. त्यात रताळी, कोबी, गाजर, कच्ची पपई आणि कारली भरपूर असतात तसेच सोयाबीनचे दूध, दही, चीज असते. त्यांना ‘ग्रीन टी’ पिणे आवडते. इथे हृदयविकार आणि कर्करोग फारसा आढळत नाही. हे लोक समाजात अत्यंत एकोप्याने राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन तणावविरहित आहे. तिसरा ‘ब्लू झोन’ मध्य अमेरिकेतील कोस्टा-रिका देशात आहे. येथील निकोया बेटावर २५० लोकांतील एक शतायुषी असतो! काहींना खापर पणतू आहेत. येथील पाण्यात कॅल्शिअम असते. भरपूर सूर्यप्रकाश असल्याने लोकांना ‘डी’ जीवनसत्त्व मिळते. यांची हाडे बळकट असतात. या लोकांच्या आहारात नेहमी भात, मक्‍याची चपाती, पावटा, मटार, डबल बी, घेवडा, सॅलड आणि फळे असतात. यांना समाधानी आणि सात्त्विक जीवनाची ओढ आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन मी’ हेच यांच्या जीवनाचे ध्येय असते!   

चौथा ‘ब्लू झोन’ आहे लोमा लिंडा (कॅलिफोर्निया). येथील चार हजार नागरिकांमधील एक शतायुषी असतो. हे लोक शाकाहारी असून, धूम्रपान आणि मद्यपान करत नाहीत. ते मोकळ्या हवेत नियमित साधे व्यायाम करतात आणि ते ‘बॉडी मास इंडेक्‍स’ (कि. ग्रॅ. वजन भागिले मीटर मधील उंचीचा वर्ग) २० ते २५ राखतात. ते धार्मिक प्रवृत्तीचे असून, एकमेकांना मदत करतात आणि आवडत्या व्यक्तींच्या सहवासात राहतात. इकारिया (ग्रीस) येथील पाचव्या ब्लू झोनमधील ३५% नागरिक नव्वदी सहज गाठतात. हे लोक एकत्र येऊन रात्री गप्पा मारतात; पण दुपारी झोप भरून काढतात. यांचे भोजन शुद्ध ‘भूमध्य सागरी’ आणि ऑलिव्ह तेलमधील असते. त्यात बटाटा, पालेभाज्या आणि फळे असतात. तेथे अल्झायमर आणि डिमेंशियाचे प्रमाण कमी आहे. जगातील शतायुषी ‘अन्न हेच औषध’ मानतात. हलके व्यायाम नियमित करतात. त्यांचे जीवन सलोख्याचे साधे खेळीमेळीचे आहे; म्हणूनच  समृद्ध-समाधानी आहे!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com