‘ॲप’निंग : विज्ञानाची प्रयोगशाळा!

Laboratory of science
Laboratory of science

विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी विज्ञानाची आवड सर्व वयोगटांतील व्यक्तींमध्ये, तसेच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्‍यक आहे. मनोरंजनातून विज्ञान, खेळातून विज्ञान, तसेच कृतिशील आणि माहिती तंत्रज्ञानाद्वारे विज्ञान आदी अनेक प्रयोग यापूर्वीही करण्यात आले आहेत. दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर करत असूनही अनेकदा आपल्याला त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे माहीत नसतात.

जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांचे अनेक प्रयोग केवळ प्रयोगशाळेतच करता येतात, असे आपले पारंपरिक मत आहे. मात्र विविध प्रकारचे सेन्सर आणि संगणक अथवा मोबाईल यांचा वापर करून आपण हे प्रयोग सहज करू शकतो. प्रकाश, आवाज, हालचाल आदींबाबतची निरीक्षणे नोंदवून, तसेच एकत्रित साठवून त्यांच्या विश्‍लेषणाद्वारे मोबाईलवर अनुमान काढणे शक्‍य झाले झाले आहे ते ‘गुगल’च्या डिजिटल सायन्स नोटबुक या ॲपमुळे. हे ॲप अँड्रॉइड, गुगल क्रोम, ॲपल आदी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये उपलब्ध आहे.

अनेक एकसंध कृतींद्वारे विज्ञान प्रयोगांची आखणी व नियोजनक्षमता यामुळे हे शक्‍य आहे. या ॲपमुळे स्वयंअध्यायाचा आनंदही घेता येतो. आपल्या मोबाईलमध्ये आवाज, तापमान, लाईट, ॲक्‍सिलरेशन, हवेचा दाब आदी भौतिक राशींची मोजणी, निरीक्षणे व फोटो आदींची क्रमवार मांडणी या ॲपद्वारे करून त्याचे विश्‍लेषण करता येते. याच प्रकारच्या अनेक शास्त्रीय प्रयोगांच्या नोंदीही करणे शक्‍य आहे. कृतीद्वारे वैज्ञानिक शिक्षण आणि स्वयंअध्ययन यासाठी मोबाईलचा वापर करून ज्ञानप्राप्ती करणे हे या ॲप निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट दिसून येते.

डिजिटल सायन्स नोटबुक म्हणजे ‘गुगल’चे ‘सायन्स जर्नल’ हे ॲप आपल्याला प्रयोगातून निर्माण होणारी माहिती गुगल ड्राइव्हवर साठवण्यासही मदत करते. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आनंददायी आणि कृतिशील माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रित वापरातून विज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी या ॲपचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दैनंदिन जीवनातील भौतिक राशी व त्यांच्यामागील कारणांमधील उपयोग म्हणजेच कोणत्याही कृतीमागील विज्ञान समजून घेण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना नवनवीन प्रयोग आणि त्यामागील विज्ञानाची मांडणी करण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. माहिती तंत्रज्ञानातील सॉफ्टवेअर डेव्हलपर, विज्ञानलेखक, विज्ञान संवादक आदींनी एकत्र येऊन नवोपक्रम विकसित करण्याची सुविधा या ‘सायन्स जर्नल’ ॲपमध्ये असल्याने अनेक इनोव्हेशनमधील नवीन प्रयोग यामध्ये समाविष्ट होत आहेत.

विज्ञानातील या नवनिर्मितीच्या प्रयोगांसाठी जेजे संकल्पक कार्य करू इच्छितात, त्यांच्यासाठी, तसेच विविध वयोगटांसाठी वेगवेगळे पर्याय या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. प्रयोगकृती निर्माण करताना त्यासाठी कोणती कोणती टूल्स अथवा उपकरणे मोबाईलबरोबरच लागणार आहेत यांचे पर्याय देण्याची सुविधा असल्याने या ॲपची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ॲपमध्ये वर्गांमधील विज्ञानकृती, प्रयोगशाळेमधील प्रयोग आणि वर्गांबाहेरील विज्ञान प्रयोग असे वर्गीकरण असल्यामुळे विज्ञान आकलनाचे क्षितिज मोठे विस्तारले आहे. वैज्ञानिक संकल्पनासाठी मुक्त विज्ञान प्रयोगशाळा असे ॲपचे स्वरूप असल्याने विज्ञान नवोपक्रम करणे शक्‍य झाले आहे. भौतिकशास्त्रावर आधारित इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जीवशास्त्र, सहजैवतंत्रज्ञान अशा अनेक विकसित विज्ञान शाखांचे नवसंकल्पकांनी विकसित केलेले अनेक प्रयोग व प्रतिशोध उपक्रम या ॲपवर उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com