सर्च-रिसर्च : कोरोना प्रतिपिंडांची अभिनव चाचणी!

डॉ. रमेश महाजन
Thursday, 5 November 2020

कोरोना साथीत जसा काळ पुढे जातो आहे, तसे एकदा कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींंमध्ये परत संसर्ग उद्‌भवण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात आधी झालेल्या संसर्गामुळे योग्य ती प्रतिपिंडे तयार झाली की नाही आणि त्यांच्या अभावामुळे परत संसर्ग झाला का, हे जाणणे महत्त्वाचे असते. प्रतिपिंडांचे मोघम दोन वर्ग पडतात.

कोरोना साथीत जसा काळ पुढे जातो आहे, तसे एकदा कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींंमध्ये परत संसर्ग उद्‌भवण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात आधी झालेल्या संसर्गामुळे योग्य ती प्रतिपिंडे तयार झाली की नाही आणि त्यांच्या अभावामुळे परत संसर्ग झाला का, हे जाणणे महत्त्वाचे असते. प्रतिपिंडांचे मोघम दोन वर्ग पडतात. एक म्हणजे विषाणूला केवळ जोडून असणारी; पण संसर्ग न रोखणारी; तर दुसरी विषाणूला घट्ट पकडून ठेवणारी आणि संसर्ग रोखणारी (न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीज्) प्रतिपिंडे. विषाणू आणि प्रतिपिंडामध्ये चोर-शिपायासारखा खेळ चालू असतो. जोपर्यंत चोराला बेड्या पडत नाहीत तोपर्यंत तो पळून जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसर्गरोधी प्रतिपिंडाकडे या घट्ट पकडीच्या बेड्या असतात. प्रतिपिंडे ही विषाणू नष्ट करत नाहीत तर त्यांना मॅक्रोफेजेससारख्या पांढऱ्या पेशीत ओढून आणतात. जोपर्यंत ती विघटित होत नाहीत तोपर्यंत त्यांना ती सोडत नाहीत. मग विषाणूबरोबर प्रतिपिंडेही लयाला जातात. आपल्या रक्तात संसर्ग रोखणाऱ्या प्रतिपिंडाचे नक्की प्रमाण किती आणि त्यावरून आपली प्रतिकारशक्ती किती मजबूत आहे, हे ओळखण्यासाठी एक अभिनव चाचणी विकसित झाली आहे. विनाधोक्‍याची, तासाभरात निष्कर्ष देणारी आणि कमी खर्चाची अशी अनेक वैशिष्ट्ये तिच्यात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधीची नि आत्ताची चाचणी
या चाचणीच्या मुळाशी विषाणूवरील स्पाइक प्रथिन आणि मानवी पेशीवरील एसीई २ रिसेप्टर प्रथिन यांच्यातील संयोग क्रिया आहे. ही क्रिया जे प्रतिपिंड रोखते ते खरे संसर्गरोधी प्रतिपिंड. यासाठी विषाणू, मानवी पेशी आणि प्रतिपिंडांचे मिश्रण चाचणीसाठी वापरले जायचे. प्रत्यक्ष विषाणू वापरल्यामुळे चाचणीत सुरक्षेसाठी मोठी खबरदारी घ्यावी लागायची. त्याखेरीज निष्कर्षासाठी काही दिवस जायचे. नव्या विषाणुसदृश प्रतिपिंड चाचणीत (surrogate virus neutralization test - SVNT)मध्ये विषाणूचे केवळ स्पाइक प्रथिन, मानवी पेशींवरील ‘एसीई २ रिसेप्टर’ प्रथिन आणि प्रतिपिंडे यांचे मिश्रण करून प्रतिपिंडे विषाणूंचा संपर्क कसा तोडतात, हे पाहिले जाते. या क्रियेची सूक्ष्मात मोजणी करण्यासाठी ती ‘इलिसा’तंत्राला जोडली जाते. ही चाचणी सोप्या साधनांनी घेता येते. खास कौशल्य लागत नाही. जिवंत विषाणू नसल्याने वेगळी सुरक्षा घ्यावी लागत नाही आणि निष्कर्ष तासाभरात कळतात.

चाचणीचे आशादायक निष्कर्ष!
नवीन चाचणी वापरून दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आल्या आहेत. पहिली म्हणजे २००३मध्ये ‘सार्स’मधून बरे झालेल्या व्यक्तीच्या सीरमची (रक्तद्रव) पाहणी करण्यात आल्यानंतर सार्स विषाणुरोधी प्रतिपिंडे आढळून आली! सतरा वर्षांनंतरही ती टिकून होती. सार्स आणि कोरोना विषाणूचे भावाभावाचे नाते पहाता ही एक आशादायक बाब आहे! दुसरी गोष्ट म्हणजे, काही रुग्ण कोरोनातून बरे होताना त्यांच्यात संसर्गरोधी प्रतिपिंडे काही आढळत नव्हती.

पण, नव्या चाचणीने त्यांचे अस्तित्व दिसून आले. नेहमीच्या चाचणीत ‘इम्युनोग्लोब्युलिन एम’ या प्रतिपिंडांची मोजदाद होत नाही. पण, ती नव्या चाचणीत होते. त्यामुळे सुरुवातीपासून प्रतिकारशक्ती विकसित होत असते, हे आढळून आले.

कोरोनाची संसर्गरोधी प्रतिपिंडे ओळखण्याची चाचणी सिंगापूरचे ड्यूक-नूस मेडिकल स्कूल आणि चीनच्या जेनस्किप्ट बायोटेकमधील संशोधकांच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे. संशोधनाचे सर्व तपशील ‘नेचर बायोटेक्‍नॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. सिंगापूरच्या अडीचशे रुग्णांची तसेच चीनमधील नानजिंग येथील पावणेतीनशे रुग्णांची स्वतंत्रपणे तपासणी या चाचणीद्वारे करण्यात आली. चाचणीची अचूकता ९९ ते १०० टक्के आणि सूक्ष्मात मोजण्याची क्षमता ९५ ते १०० टक्के इतकी होती.

एकूण प्रतिपिंडापैकी किती भाग संसर्गरोधी प्रतिपिंडांचा आहे, हे त्यावरून कळाले.या चाचणीचा उपयोग केवळ मानवातल्या कोरोनाची प्रतिकारशक्ती पाहण्यापुरता नसून, प्राण्यांतील संसर्ग आणि प्रतिपिंडे पाहण्यासाठीही करता येतो. याखेरीज लसीची परिणामकारकताही या चाचणीने आजमावता येते. प्रतिपिंडांच्या सर्व वर्गांची छाननी केवळ एका गुणधर्मावरून केली जात असल्याने ती जास्त वास्तव असते. ही चाचणी संच स्वरुपात उपलब्ध करण्यात आली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ramesh mahajan on Corona antibody

Tags
टॉपिकस
Topic Tags: