सर्च-रिसर्च : त्रिमितीय मिनी अवयव आणि उपचार

Organoids
Organoids

मानवाच्या विविध अवयवांच्या निर्मितीपासून ते त्यापासून होणाऱ्या व्याधींपर्यंत शरीरांतील तपशील जाणून घेणे मोठे जिकिरीचे असते. अशा वेळेस तेच अवयव शरीराबाहेर आणि त्रिमितीय पद्धतीने निर्माण केले तर आपण शरीराच्या अंतर्गत कार्याच्या खूप जवळ जाऊ शकतो आणि शरीराला इजा न करता अवयवांत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेऊ शकतो. कर्करोगग्रस्त अवयवात हे फार महत्त्वाचे असते. तो कसा वाढतो, तो काही वेळेसच का पसरतो, तसेच दीर्घकाळ सुप्तावस्थेत कसा जातो ह्याचे निश्‍चित टप्पे कळले तर योग्य ते औषध वापरुन त्याचे निराकरण सोपे होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त परिणामांनाही रोखणे शक्‍य होईल. कर्करोगात व्याधीची विविधता ओळखणे महत्त्वाचे असते. एकाच अवयवाच्या कर्करोगाने दोन व्यक्ती ग्रस्त असल्या तरी उपचाराचे फलित एकसारखे नसते!अशा वेळेस रुग्णावर निरनिराळी औषधे आलटून पालटून पहायला वेळ नसतो. थोडक्‍यात कर्करोग व्यक्तीनुसार बदलतो. या रोगाचे व्यक्तिगत निदान करण्यासाठी आणि त्यानुसार औषधयोजना ठरवण्यासाठी मूळ पेशींच्या आधारे बनवलेले ऑर्गॅनॉइडस (मिनी अवयव)उपयुक्त ठरत आहेत.

पूर्वीच्या कर्करोग उपचारात विशिष्ट कर्करोग पेशींवर किंवा कर्करोगाच्या गाठींचे प्राण्यात रोपण करुन (झेनोग्राफ्टस)औषधांचे परिणाम अजमावले जायचे. पण त्यात बाहेरील आणि शरीरांतर्गत परिणामात तफावत जाणवायची. हा फरक रोखायचा असेल तर प्रयोगात वापरणारी उती शरीराशी साम्य राखणारी हवी. ती उणीव मूळ पेशींच्या रुपांतर तंत्राने तयार होणार्या त्रिमितीय मिनी अवयवाने (ऑर्गॅनॉइड) बऱ्याच प्रमाणात दूर होते आहे. या तंत्रात निरनिराळे संवर्धन घटक (ग्रोथ फॅक्‍टर्स)वापरुन मूळ पेशी तीन टप्प्यांत अवयवाच्या पेशीत रुपांतरीत होतात. त्याचबरोबर उती अंतर्गत संलग्न पेशीही एकत्र वाढतात. गेली दहा वर्षे निरनिराळ्या अवयवांच्या कर्करोगाच्या ऑर्गॅनॉइडसवर सातत्याने संशोधन होत आहे. त्यातून व्याधीचे टप्पे आणि औषधांचे परिणाम यांची सांगड घालणे शक्‍य होत आहे. निरोगी ऑर्गॅनॉइडमधे कर्करोगी रुग्णाच्या मूळ पेशी रोपण करुन आत्तापर्यंत शेकडो कर्करोगाचे प्रकार तयार करण्यात आले आहेत.

यकृतासारख्या अवयवात अंतर्भागानुसार कर्करोग बदलतो. मग अशा वेगळ्या पेशी रोपण करुन एकाच अवयवाचे वेगवेगळे ऑर्गॅनॉइडस करुन त्यांच्या वाढीची आणि उपचाराची शहानिशा चालू आहे. जठर,प्रोस्टेट, अंडाशय, मेंदू, मूत्राशय, मूत्रपिंड, फुफ्फुसे, अन्ननलिका, मोठे आंतडे (कोलॉन)अशा विविध अवयवांची ऑर्गॅनॉइडस संशोधनासाठी उपलब्ध आहेत. या संशोधनाचा महत्वाचा निष्कर्ष म्हणजे जेव्हा कर्करुग्णांच्या गाठीवर आणि त्यापासून केलेल्या ऑर्गॅनॉइडसवर एकच उपचार करण्यात आला तेव्हा ऑर्गॅनॉइडस वापरुन केलेले निदान नकारात्मक असले तर ते कर्करुग्णातही शंभर टक्के नकारात्मक येत होते. याउलट उपचार ऑर्गॅनॉइड वर यशस्वी झाला तर तो कर्करुग्णात नव्वद टक्के प्रभावी ठरत होता . ऑर्गॅनॉइडवर आधारित औषध चांचण्यांसाठी ही मोठी जमेची बाब आहे.  हे संशोधन लंडनच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च’मधील निकोला व्हॅलेरी आणि सहकाऱ्यांनी केले असून ते ’सायन्स ’पत्रिकेत प्रकाशित केले आहे.

कर्करोगाच्या गाठीवर उपचार चालू करण्याआधी तिच्यापासून बनवलेल्या ऑर्गॅनॉइडवर विशिष्ट औषधांचा वापर करुन त्याचे यश अजमावण्याला काही मर्यादा आहेत. शरीरातील कर्करोगाची गाठ संयोजी उतीत (कनेक्‍टिव टिश्‍यू) आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्यात बद्ध असते. तसेच ती विविध हार्मोन्सच्या नियंत्रणात असते. त्याखेरीज मज्जासंस्थेशी तिचा सतत संपर्क असतो. एवढ्या गुंतागुंतीची निर्मिती शरीराबाहेर करणे सोपी गोष्ट नाही. तरीही भविष्यातील ऑर्गॅनॉइडसच्या निर्मितीत संयोजी पेशी आणि श्वेतपेशींच्या मूळ पेशी समाविष्ट करुन ती त्रुटी भरुन काढण्यात येणार आहे. आधीच्या टप्प्याच्या तुलनेत कर्करोग न्याहाळणीचा हा नवा टप्पा माहितीपूर्ण ठरणार आहे हे नक्की!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com