सर्च-रिसर्च : गाढ निद्रेतून जागे केलेले सूक्ष्मजीव

Microorganisms
Microorganisms

काही महिन्यांपूर्वी दक्षिण पॅसिफिक समुद्राच्या तळाशी ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे, गाडलेल्या अवस्थेतील काही सूक्ष्मजीव सापडले. ते सुमारे दहा कोटीभर वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी जिवंत होते. त्यावर मातीचा जाड थर बसला. जगायला अनुकूल असे कुठलेच वातावरण, क्षार वगैरे पोषक द्रव्ये त्यांच्या आजूबाजूला नव्हते. तरी ते इतकी वर्षे झोपलेले किंवा जवळजवळ मृतच अवस्थेत तगून राहिले.

बेडकांसारखे काही प्रगत जीव सुमारे सहा महिन्यांपर्यंत पुरेशा अन्नपाण्याविना जिवंत राहातात. त्याला हिमनिद्रा असे म्हणतात. असे अनेक जीव पोषक परिस्थिती नसेल तेव्हाही तगून राहतात. उदाहरणार्थ कमी ऑक्‍सिजनमध्ये कोणते जीव किती तग धरून राहतात, याचे प्रयोग रॉबर्ट बॉईलने तीनशे वर्षांपूर्वीच केले होते. सरपटणारे प्राणी हे सस्तन प्राण्यांपेक्षा जास्त तगून राहातात, तर कीटक हे तर त्याहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतात, हे तेव्हाच लक्षात आलेले होते. गेल्या शतकभरात सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये अधिक प्रगती झाल्यावर जगण्याला अनुकूल परिस्थिती म्हणजे नेमके काय, हे जास्त ठळक झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सूक्ष्मजीव हे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या जास्त तापमानाला जगतात, वाढतात. त्यांना थर्मोफिलिक जीव असे म्हणतात. काही जीव कमी ऑक्‍सिजन व जास्त गंधकाचे ऑक्‍साइड व इतर क्षार असताना जगतात. समुद्रतळाशी काही जीव पंधरा वर्षेसुद्धा जिवंत राहातात इथपर्यंत आपल्याला माहिती होती. मागल्या वर्षीच म्युनिकचे शास्त्रज्ञ विल्यम ओर्सी यांनी दीड कोटी वर्षांपूर्वीच्या सूक्ष्मजीवांना परत अन्नपाणी देऊन जिवंत असल्याचे सिद्ध केले होते. मात्र या जिवांची, अशा प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची क्षमता काय असते, असे कुतूहल युकी मोरोनो या जपानच्या भूगर्भ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाला वाटले. 

मग त्याने दक्षिण पॅसिफिक समुद्रतळाशी उत्खनन करायचे ठरविले. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या समुद्रतळाशी असणारे थर हे सर्वांत अधिक मृतप्राय आहेत, असा आजवरचा समज होता. म्हणून तेथील समुद्राच्या तळाखाली ५७०० मीटर त्यांनी ड्रिलिंग केले. त्यातील खनिजांमध्ये अगदी कमी का होईना ऑक्‍सिजनचे प्रमाण त्यांना आढळले. त्यामुळे काही सजीव तगून असण्याची अंधुक का होईना, आशा त्यांना वाटली. म्हणून, त्यांनी नायट्रोजन व कार्बनची समस्थानिके असणारे क्षार त्यात दिले. हे समस्थानिक निसर्गात अगदी कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नंतर जर त्यातील सूक्ष्मजीवांमध्ये अशा प्रकारचे कार्बन व ऑक्‍सिजन सापडले, तर ते प्रयोगशाळेतील रसायनाचेच अंश आहेत, हे सिद्ध झाले असते. थोडेथोडके नाहीत, तर ५५७ दिवसांनी यात जिवाचा जगणारा अंश सापडला.

सर्वसाधारणपणे समुद्राच्या तळाशी असणाऱ्या चिखलात एका मिलिलिटर किंवा एक घनसेंमी आकारमानात सुमारे एक लाख सूक्ष्मजीव आढळतात. मोरोनो यांना त्या खोलवरच्या चिखलात कसेबसे हजारभर बॅक्‍टेरिया आढळले. मग त्यांनी ६५ दिवस देखभाल करून त्यांना उपयोगी क्षार (समस्थानिके असणारे) दिले, तेव्हा त्यांची संख्या दहा हजारपट वाढून दहा लाखांच्या घरात गेली. या सूक्ष्मजीवांची ओळखपरेड केली, तेव्हा आठ वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्‍टेरिया त्यात आढळले. म्हणजे जगण्याची, तगण्याची धडपड करणारा एकच एक सुपरसूक्ष्मजीव नसून अनेकांमध्ये असा तकवा आढळतो. काही बुरशीवर्गातील जीव प्रतिकूल परिस्थितीत स्पोर या प्रकारात स्वतःला बदलतात. अनुकूल परिस्थिती आल्यावर परत वाढू शकतात.

मात्र, बॅक्‍टेरिया रूढ माहितीनुसार फक्त पेशी विभाजन करून पुनरुत्पादन करतात. आकाराने व संख्येने वाढतात. पण, मोरोनो यांना सापडलेल्या सूक्ष्मजीवांना असे पेशीविभाजन करण्यासाठी पुरेसे खाद्य व क्षार नव्हते. मग विभाजन न करता ते केवळ मृतप्राय अवस्थेत १५ कोटी वर्षे कसे जगू शकले, याचे संशोधकांना आश्‍चर्य वाटले. या संशोधनामुळे जसे माहिती असलेल्या जिवांच्या मर्यादांना आव्हान मिळाले आहे, तसे परग्रहावरील जीवसृष्टी शोधणाऱ्यांनाही आशेचा किरण दिसतो आहे. कारण, ज्या ग्रहांच्या पृष्ठभागावर जीवसृष्टी-सूक्ष्मजीव सापडलेले नाहीत त्यांनी कदाचित त्या थरांच्या खाली शोध घेण्याची शक्‍यता एका संशोधकाने बोलून दाखवली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com