सर्च-रिसर्च : बुडणारे बेट वाचविण्यासाठी...

महेश बर्दापूरकर
Wednesday, 5 February 2020

जागतिक तापमानवाढ व त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, याबद्दल आपण गेली अनेक वर्षे वाचत आहोत. या गोष्टी आता थेट दिसायला सुरुवात झाली असून, भारत व श्रीलंकेदरम्यानच्या पट्ट्यातील मन्नारच्या खाडीतील २७ बेटांपैकीे व्हान हे बेट पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. या बेटाचा आकार १९८६ मध्ये १६ हेक्‍टर होता व २०१६ मध्ये तो ४.१ हेक्‍टर इतका झाला.

जागतिक तापमानवाढ व त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, याबद्दल आपण गेली अनेक वर्षे वाचत आहोत. या गोष्टी आता थेट दिसायला सुरुवात झाली असून, भारत व श्रीलंकेदरम्यानच्या पट्ट्यातील मन्नारच्या खाडीतील २७ बेटांपैकीे व्हान हे बेट पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. या बेटाचा आकार १९८६ मध्ये १६ हेक्‍टर होता व २०१६ मध्ये तो ४.१ हेक्‍टर इतका झाला. याच वेगाने धूप होत राहिल्यास हे बेट २०२२ मध्ये पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे संशोधक हे बेट वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मन्नारची खाडी हा भारतातील सर्वाधिक जैवविविधतेचा भाग म्हणून ओळखला जातो व देशातील माशांच्या प्रजातींपैकी २३ टक्के याच भागात सापडतात. त्यावर दीड लाख मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. मन्नार खाडीतील व्हान या बेटाला १९८६ मध्ये ‘समुद्रीय जैवविविधता पार्क’ म्हणून घोषित करण्यात आले. प्रवाळांचे अमर्याद उत्खनन व अशास्त्रीय मासेमारीमुळे या खाडीतील बेटांना धोका निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याआधी तमिळनाडू स्टेट क्‍लायमेट चेंज सेलने या बेटाच्या बाजूने सिमेंटच्या पट्ट्या टाकून व स्थानिक प्रवाळांच्या जातींचे रोपण करून बेट काही प्रमाणात वाचविण्यात यश मिळविले. मात्र, या बेटासह बाजूच्या सर्वच बेटांना दीर्घायुष्य देण्यासाठी पूर्ण परिसंस्थाच बदलण्याची गरज होती. गिल्बर्ट मॅथ्यूज या मरीन बायोलॉजिस्टने समुद्री गवताचा उपयोग केल्यास हे बेट वाचविता येईल, असा निष्कर्ष काढला. ‘‘हे गवत पाण्याखाली वाढते व त्याला मुळे, फांद्या व पानेही असतात. त्यांना फुले आणि बिया लागतात व समुद्राची परिसंस्था जिवंत ठेवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. या गवताला येणाऱ्या फळांकडे अनेक प्रकारचे मासे आकर्षित होतात. हे गवत पाण्यातील क्षार व गाळ शोषून घेत फिल्टरसारखे काम करते व जमिनीची धूपही रोखते. मात्र, उथळ पाण्यात मोठ्या जाळ्यांद्वारे मासेमारी केल्याने हे गवत जाळ्यात ओढले जाते व मच्छीमार ते किनाऱ्यावर आणून फेकतात. त्यामुळेच व्हान या बेटाची धूप वाढली,’’ असे मॅथ्यूज सांगतात.

मॅथ्यूज यांनी २०११ ते २०१६ दरम्यान केलेल्या पाहणीत मन्नारच्या खाडीतील २४ चौरस किलोमीटरचे गवताचे आवरण नष्ट झाल्याचे आढळले. यावर उपाय म्हणून मॅथ्यूज व त्यांच्या टीमने समुद्राच्या खालून गवत खरवडून ते कमी असलेल्या भागात रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. ‘‘या गवताची मोठ्या ब्लॉकच्या स्वरूपात पेरणी केल्यास यश मिळेल, असे पहिल्या अपयशातून आम्हाला दिसले.

त्यासाठी विपुल प्रमाणात असलेल्या भागातील गवत व्हान बेटावर बोटीने वाहून नेण्यात आले. तेथे दुसऱ्या टीमने प्लॅस्टिकचे पाइप एकमेकांना सुतळीच्या मदतीने जोडून एक चौरस मीटर आकाराचे वाफे तयार केले. त्यात हे गवत पेरण्यात आले. ही प्रक्रिया एका तासात पूर्ण होणे गरजेचे होते; अन्यथा गवताची मुळे जळून गेली असती.

या प्रयत्नातून पाच महिन्यांत वाळूने भरलेल्या भागात गवताची पूर्ण वाढ झाल्याचे दिसून आले. अनेक मासे, समुद्री कासवे, गोगलगायी परिसरात दिसू लागल्या असून, बेट वाचवणे शक्‍य असल्याचा विश्‍वास मिळाला आहे,’’ असे मॅथ्यूज सांगतात. एक बेट वाचविण्याचा संशोधकांचा प्रयत्न यशस्वी होतो आहे. मात्र, जागतिक तापमानवाढीपासून अशी अनेक बेटे वाचविण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागणार, हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahesh badrapurkar