सर्च-रिसर्च : ...दस नूर कपडा!

Garbage
Garbage

तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कधी डोकावून पाहिले आहे काय? अनेक कपडे जुने झाल्याने, फॅशन संपल्याने किंवा कंटाळा आल्याने ते वापरणे तुम्ही सोडून दिले असणार. एका सर्वेक्षणानुसार महिलांच्या कपाटातील बारा टक्के कपडे वापराविना पडून असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे कपडे कपाटात ठेवायचाही कंटाळा आल्यास तुम्ही ते पिशव्यांत भरून कचऱ्यात टाकून देता. नंतर या कपड्यांचे काय होते? अमेरिकेत टाकून दिलेले एक कोटी तीस लाख टन कपडे दरवर्षी कचरा डेपोमध्ये जाऊन पडतात किंवा जाळले जातात. जगभरात सुमारे ९.२ कोटी टन कपड्यांचा कचरा तयार होतो, तर हेच प्रमाण २०३०मध्ये १३.४ कोटी टन असेल! मग यावर उपाय काय?

ब्रिटनमधील लॉगबोरो विद्यापीठातील संशोधक चेतना प्रजापती सांगतात, ‘‘सध्याची फॅशन इंडस्ट्री कपड्यांच्या निर्मितीसाठी रिसायकलिंग न होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांचा वापर करते व हे कपडे खूप कमी कालावधीसाठी वापरले जातात. ही व्यवस्था पाणी दूषित करते, वातावरणातील प्रदूषण करणारे घटक वाढवते व परिसंस्थेचेही नुकसान करते. फॅशन इंडस्ट्री जगभरातील दहा टक्के हरितगृह वायूंच्या निर्मितीस हातभार लावत, तब्बल १.२ अब्ज टन हरितगृह वायू वातावरणात सोडते.

कपड्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते व हा उद्योग जगभरातील वीस टक्के सांडपाण्याची निर्मिती करतो. त्याचबरोबर ग्राहकही मागील पंधरा वर्षांच्या तुलनेत सध्या साठ टक्के अधिक कपडे खरेदी करत आहेत. जगभरात दरवर्षी ५.६० कोटी टन कपडे खरेदी केले जातात व २०५०पर्यंत हे प्रमाण सोळा कोटी टनांपर्यंत पोचेल. मात्र, जगभरात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांपैकी केवळ बारा टक्‍क्‍यांचा पुनर्वापर होतो. फॅशन सतत बदलत असल्याने कपड्यांचा वापर कमी होतो. आधुनिक कपडे दोन ते दहा वर्षे, अंतर्वस्त्रे व टी-शर्ट एक ते दोन वर्षे व सूट आणि कोट चार ते सहा वर्षे टिकतात.’’

कपडे कोणत्या मटेरिअलपासून बनलेले असतात, यावर या प्रश्नाची तीव्रता ठरते. कपड्यांमध्ये नैसर्गिक यार्न, मानवनिर्मित फिलामेंट, प्लॅस्टिक व धातू वापरले जातात. उदा. शंभर टक्के कॉटनचे टी-शर्ट घेतले, तरी त्याचे लेबल व शिवणासाठीचे धागे पॉलिस्टरसारख्या मटेरिअलपासून बनवलेले असतात. कॉटन जीन्समध्येही इलास्टेन, बटन व धाग्यांमध्ये पॉलिस्टर असते व विविध प्रकारचे डायही वापरले जातात. त्यामुळे या सर्व गोष्टी वेगळ्या करून त्यांचा पुनर्वापर करणे अवघड होते. हे काम हाताने करण्याची प्रक्रिया संथ असते व त्यासाठी निष्णात कारागीरही लागतात. रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये दाखल झालेल्या कपड्यांपैकी सहा टक्के कपडे पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे नसल्याने त्यांचा उपयोग उद्योगांमध्ये यंत्रे पुसण्यासाठी, पायपुसणे किंवा मोटारीच्या सीटच्या आतमध्ये केला जातो. ‘‘फायबर रिसायकलिंग पद्धत कमी प्रमाणात अस्तित्वात आहे.

अभियांत्रिकी प्रक्रियेतून छोट्या आकाराचे धागे परत मिळवता येतात, मात्र त्यांचा दर्जा खूपच कमी असल्याने थर्मल इन्सुलेशन किंवा कार्पेट निर्मितीत त्यांचा उपयोग होतो. रासायनिक प्रक्रियेत पॉलिस्टर व नायलॉनवर प्रक्रिया करता येते, मात्र अनेक प्रक्रिया व रसायने वापरल्याने तयार झालेले धागे महाग असतात. बुरशीचा वापर करून कॉटन आणि पॉलिस्टरच्या मिश्र धाग्यांचे रिसायकलिंग तंत्र हाँगकाँगमधील संशोधकांनी शोधले आहे.

बुरशी कॉटनचे विघटन ग्लुकोजमध्ये करते आणि शुद्ध पॉलिस्टरचा पुनर्वापर करता येतो. हल्ली टी-शर्ट, शर्ट व जीन्सही पॉली-कॉटनपासून बनलेले असतात व त्यामुळे भविष्यात हे तंत्र उपयोगी ठरेल. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एन्झाइम्सचा उपयोग करून रिसायकलिंगचे तंत्र विकसित केले आहे. मात्र, कपड्यांची निर्मिती करतानाच रिसायकलिंगचा विचार केल्यास ही समस्या सुटेल,’’ असे प्रजापती स्पष्ट करतात. एकंदरीत, ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ ही म्हण खोटी ठरवत कपड्यांचा वापर कमी व पुनर्वापर हाच या समस्येवरचा उपाय आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com