esakal | सर्च-रिसर्च : पृथ्वीवरील ‘मंगळा’ची प्रयोगशाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

rio-tinto-river

महाराष्ट्रातील लोणार येथील उल्कापातामुळे निर्माण झालेल्या तळ्याचा रंग लाल-गुलाबी झाल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपूर्वी पाहिल्याच असतील. पृथ्वीवर घडणाऱ्या अशा गोष्टींचा अवकाशातील इतर ग्रह आणि ताऱ्यांशी कायमच संबंध जोडला जातो. स्पेनमधील ‘रिओ टिन्टो’ या नदीसंदर्भातही असेच अनेक दावे केले जात आहेत. या नदीचे पात्र तिच्या प्रवासातील एका टप्प्यात लाल-नारंगी रंगाचे असून, त्याचा संदर्भ थेट मंगळ या लाल रंगाच्या ग्रहाशी जोडला जात आहे.

सर्च-रिसर्च : पृथ्वीवरील ‘मंगळा’ची प्रयोगशाळा!

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

महाराष्ट्रातील लोणार येथील उल्कापातामुळे निर्माण झालेल्या तळ्याचा रंग लाल-गुलाबी झाल्याच्या बातम्या आपण काही दिवसांपूर्वी पाहिल्याच असतील. पृथ्वीवर घडणाऱ्या अशा गोष्टींचा अवकाशातील इतर ग्रह आणि ताऱ्यांशी कायमच संबंध जोडला जातो. स्पेनमधील ‘रिओ टिन्टो’ या नदीसंदर्भातही असेच अनेक दावे केले जात आहेत. या नदीचे पात्र तिच्या प्रवासातील एका टप्प्यात लाल-नारंगी रंगाचे असून, त्याचा संदर्भ थेट मंगळ या लाल रंगाच्या ग्रहाशी जोडला जात आहे. एखाद्या ‘सायन्स फिक्‍शन’मध्ये शोभेल असे दिसणारे नदीचे हे पात्र आता संशोधकांच्या उत्सुकतेचा विषय बनला असून, या परिसरातील जमीन व पाण्याखाली नक्की काय दडले आहे, याचा शोध ते घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘रिओ टिन्टो’ ही नदी स्पेनमधील सिएरा मोरेना या पर्वतरांगांमध्ये उगम पावते व काडिझच्या वाळवंटातून वाहते. सुरवातीच्या टप्प्यात या नदीचे पाणी निळेशार दिसते, मात्र नाईबेला या गावाजवळ पोचल्यानंतर तेथील पन्नास किलोमीटरच्या अंतरामध्ये तिचे रुप अचानक पालटते. या परिसरात पाण्याचा रंग नारंगी आणि लोखंडावरील गंजासारखा लाल रंगाचा दिसू लागतो. त्यामुळेच या नदीचे नाव ‘रिओ टिंन्टो’ म्हणजे ‘लाल नदी’ असे पडले आहे.

नदीच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगाबरोबर हा परिसर कॉपर आणि ब्रॉन्झ युगाचे उगमस्थानही मानले जाते. आयबेरिअन, फोनेशिअन, ग्रीक व रोमन यांनी ख्रिस्तपूर्व ३००० मध्ये तांबे, सोने व चांदी हे धातू मिळविण्यासाठी या नदीच्या पात्रात व परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. हे उत्खनन २००१मध्ये थांबविण्यात आले. गेली अनेक वर्षे नदीतील या पाण्याचा विचित्र रंग शेकडो वर्षांच्या उत्खननामुळे झालेल्या प्रदूषणाचा परिणाम असल्याचे मानले जात होते.  

मात्र, अगदी नजीकच्या काळात संशोधकांना या नदीच्या मंगळासारख्या रूपाबद्दल नवा शोध लागला आहे. पाण्याचा हा रंग नदीतील एका विशिष्ट रसायनामुळे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जेरोसाइट’ हे आयर्न आणि पोटॅशिअम सल्फेटचे मिश्रण असलेले रसायन नदीच्या या भागातील पात्रामधील मातीमध्ये अगदी खोलवर मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.

पात्रातील या भागातील पाणी अत्यंत आम्लधर्मीय असून, त्याचा ‘पीएच’ दोन आहे. हेच रसायन नुकतेच मंगळ या ग्रहावरही सापडले आहे. आणखी एक साम्य म्हणजे लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर आणि या लाल नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन हा वायूही आढळतो. यातूनच संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, मंगळावर जर पाणी असेल, तर ते ‘रिओ टिन्टो’ या नदीतील पाण्यातील रंगाप्रमाणेच दिसेल. विशेष म्हणजे, उक्रांतीवादाचे जनक चार्ल्स डार्विन दक्षिण अमेरिकेचा प्रवास करीत असताना या भागात आले होते व येथील क्षारयुक्त पाण्याखाली जीवसृष्टी आढळेल, असे भाकीत त्यांनी केले होते. त्यांचे येथील जीवसृष्टीसंदर्भातील भाकीत खरे ठरण्यासाठी तब्बल २०० वर्षांचा कालावधी लागला. पात्रात अत्यंत खोलवर आढळणारे हे जीव ऑक्‍सिजनशिवाय जिवंत राहू शकतात, असे संशोधकांना आढळले व मंगळावरील जीवसृष्टी शोधताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल, असे त्यांना वाटते.

त्यामुळेच ॲस्ट्रोबायोलॉजिस्टनी ‘रिओ टिन्टो’ या नदीचा पृथ्वीवरील मंगळाची प्रयोगशाळा म्हणून उपयोग करायला सुरवात केली असून, मंगळावर जीवसृष्टी शोधायची असल्यास अंतराळवीरांनी कोणते तंत्र वापरावे याच्या चाचण्या येथे घेण्यास सुरवात केली आहे. नदीतील विपुल रसायने असलेल्या पात्रात संशोधकांना अनेक प्रकारचे जिवाणू व सूक्ष्मजीव आढळू आले आहेत.

त्यामुळेच मंगळावर कोणत्याही प्रकारचे जीव आढळल्यास ते तेथील जमिनीच्या पोटात खोलवर आढळतील, असा तज्ज्ञांचा कयास आहे. संशोधक आता ‘नासा‘कडून अद्ययावत ड्रिलींग मशिन्सच्या मदतीने या परिसरात व्यापक उत्खनन व्हावे, अशी अपेक्षा करीत आहेत. मंगळावरील जीवसृष्टीचा अदमास पृथ्वीवरूनच घेण्यात या नदीचा वाटा महत्त्वाचा ठरणार, हे निश्‍चित.

Edited By - Prashant Patil