सर्च-रिसर्च : शाश्‍वत विकासासाठी विलगीकरण!

महेश बर्दापूरकर
Wednesday, 28 October 2020

कोरोना महासाथीमुळे जगभरातील लोकांच्या मानसिकतेत मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. यात ‘स्वावलंबी खेडी’ हा महात्मा गांधी यांचा संदेश अप्रत्यक्षपणे जगातील अनेक ठिकाणी प्रत्यक्षात आणला जात आहे. प्रशांत महासागरातील चिली या देशाच्या ताब्यातील इस्टर आयलंडवर कोरोनानंतर झालेले बदल याचेच प्रतिनिधित्व करतात. केवळ सात हजार ७५० लोकवस्तीच्या या बेटावर मार्चपासून झालेले बदल प्रत्येक खेड्यात झाल्यास जगभरातील मानवी संस्कृतीचे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसेल...

कोरोना महासाथीमुळे जगभरातील लोकांच्या मानसिकतेत मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. यात ‘स्वावलंबी खेडी’ हा महात्मा गांधी यांचा संदेश अप्रत्यक्षपणे जगातील अनेक ठिकाणी प्रत्यक्षात आणला जात आहे. प्रशांत महासागरातील चिली या देशाच्या ताब्यातील इस्टर आयलंडवर कोरोनानंतर झालेले बदल याचेच प्रतिनिधित्व करतात. केवळ सात हजार ७५० लोकवस्तीच्या या बेटावर मार्चपासून झालेले बदल प्रत्येक खेड्यात झाल्यास जगभरातील मानवी संस्कृतीचे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसेल...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इस्टर आयलंड हे १६४ वर्ग किलोमीटरचे बेट रापा नुई या आदिवासी जमातीच्या लोकांसाठी ओळखले जाते. कोरोनाच्या संसर्गानंतर येथील लोकसंख्येसाठी   केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत, हे लक्षात आल्यावर महापौर पेद्रो एडमंड्‌स पाओआ यांनी सर्व विमानांवर बंदी घातली. त्यामुळे चिलीमध्ये कोरोनाची स्थिती बिकट असतानाही एप्रिलमध्ये बेटावरची रुग्णसंख्या होती पाच व त्यानंतर कोरोनाचे पूर्ण उच्चाटन झाले. या यशाचे श्रेय महापौर बेटाच्या ‘टापू’ या परंपरेला देता. ‘टापू’चा अर्थ स्वतःचे आरोग्य राखणे, जीव वाचवणे, ज्येष्ठांची काळजी घेणे व त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करणे आहे. त्यामध्ये लोकांवर अनेक मर्यादा येत असल्या, तरी समोरच्याच आदर हाच त्याचा उद्देश आहे. ‘कोरोना आमचा शत्रू होता व आमची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने इतर देशांतील लोक बेटावर आल्यास ते घातक ठरणार होते. त्यामुळेच आम्ही ‘टापू’ अमलात आणण्याचा निर्णय घेतला,’ असे पाओआ सांगतात.

टापू आणि उमंगा...
‘टापू’मध्ये एकटे राहणे, कोणालाही न भेटणे, कोणाशीही चर्चा न करणे व मोठ्याने न बोलणे ही बंधनेही पाळावी लागतात. ‘क्वारंटाइन’ होण्याची ही प्राचीन पद्धत यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर बेटाने ‘उमंगा’ ही एकमेकांना मदत करण्याची दुसरी परंपराही लागू केली. या दोन्हींतून प्राचीन परंपरांचे पुनरुत्थान झाले व शाश्वत भविष्याचा मार्गही लोकांना सापडला. ‘टापू‘ सामाजिक किंवा धार्मिक कारणावरून विलगीकरणासाठी वापरतात.

आंतरराष्ट्रीय पर्यटन बेटाचा मुख्य व्यवसाय बनल्यानंतर अनेक परंपरा मोडीत निघाल्या. ‘भौतिकतावादाने आमचे मोठे नुकसान केले, मात्र विलगीकरणाने चित्र पुन्हा बदलते आहे. मोठी जहाजे, विमाने किंवा मोबाईल फोन नसलेल्या काळात आम्ही पुन्हा आलो आहोत. छोट्या बोटीद्वारे मासेमारी करीत कसे जिवंत राहायचे, हे आता आम्ही पुन्हा शिकत आहोत. इस्टर आयलंडला उदरनिर्वाहासाठी चिलीमधून दरवर्षी येणाऱ्या एक लाख पर्यटकांवर विसंबून राहावे लागत होते, मात्र आता आम्ही बेटाला २०३० पर्यंत ‘उमंगा’च्या माध्यमातून स्व-शाश्वत व कचरामुक्त करण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याला मदत करण्याचे उद्दिष्ट ‘उमंगा’मध्ये पाळले जाते. तुमच्याकडील जास्तीच्या गोष्टी, वेगळी माहिती दुसऱ्याला देता. हा सर्व ‘उमंगा’चा भाग आहे. त्यातूनच आम्ही बेटावरील ७००जणांना नोकरी दिली. लोक बेट सुंदर करण्यासाठी एकत्र आले आहेत, एकमेकाला मदत करीत आहेत. मार्च २०३०पर्यंत आमच्या डोळ्यावर मास्क होते व त्यामुळे आम्ही नीट पाहत नव्हते, मास्क नाकावर येताच आम्हाला नवी दृष्टी मिळाली आहे,’ असे रोजगार विभागाचे प्रमुख नुनू फर्नांडिस सांगतात. अन्न सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि बेटाचे सौंदर्यीकरण यावर फर्नांडिस यांनी भर दिला आहे. बेटावर पुरातन वस्तूंची माहिती तेथील गाइड नव्या पिढीला देत आहेत, तर लोकांनी एकत्र येऊन किनाऱ्यावरील दोन टन कचरा उचलला आहे. पहिल्या टप्प्यात मे ते ऑगस्टदरम्यान १६ लाख डॉलर खर्च केले गेले तर, सप्टेंबर ते डिसेंबर या दुसऱ्या टप्प्यासाठी १५ लाख डॉलर खर्च केले जाणार आहेत. ‘मी कोरोनाचे आभार मानतो; कारण त्याने आम्हाला शाश्वत विकास व निसर्गाचा आदर करायला शिकवले,’ असे पाओआ सांगतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahesh badrapurkar