सर्च-रिसर्च - प्रवास न करता पर्यटनाचा आनंद

Tourism
Tourism

कोरोना विषाणूचा विळखा संपूर्ण जगाला पडला असून, या परिस्थितीत जगभरात फिरून पर्यटनाचा आनंद घेणे, विविध संस्कृती, त्यांच्या खाद्यपद्धती जाणून घेणे अशक्‍य बनले आहे. मात्र, या परिस्थितीतही तुम्हाला ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ (व्हीआर) या तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यटनाचा आनंद घेणे शक्‍य असून, यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून एव्हरेस्टची सफर आणि समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील जीवसृष्टीचा आनंद देणारी ही उपकरणे सध्याच्या काळात लोकांच्या मदतीला येत आहेत.

एव्हरेस्टवरील चढाईचे अनुभव एडमंड हिलरीपासून अनेक गिर्यारोहकांनी लिहून ठेवले आहेत. त्याचा उपयोग करून ‘एव्हरेस्ट व्हीआर’ या नावाचा एक तासाचा ‘व्हीआर’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. बेस कॅम्पला तुम्ही सर्व किट घेऊन हजर होता आणि मग बर्फाळ चढाई आणि खोल दऱ्यांचा सामना करीत तुमचा प्रवास सुरू होतो. हे सर्व ‘व्हाइव्ह’ व ‘ऑक्‍युलस’सारख्या कंपन्यांनी तयार केलेल्या व्हीआर हेडसेटच्या मदतीने अनुभवता येते. या कंपन्यांच्या हेडसेटची किंमत सध्या खूप अधिक आहे व त्यांच्या व्हिडिओंचा दर्जा आणि संख्याही कमी आहे. मात्र, या सर्वांत सुधारणा करण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. सध्या तुम्ही ब्लू व्हेलबरोबर पोहणे किंवा मंगळ ग्रहावर बग्गीमध्ये बसून फेरफटका मारण्यासारख्या अनेक गोष्टी करू शकता.

‘न्यूझू’ कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार व्हीआर इंडस्ट्रीची मागील वर्षीची उलाढाल १५० अब्ज डॉलर होती. या कंपन्यांनी प्राणीजगत आणि सायन्स फिक्‍शनवर आधारित ‘वाईल्ड बेस्ट ऑफ रेड डेड रिडेमशन’ व ‘नो मॅन्स स्काय’सारखे व्हिडिओ तयार केले आहेत. यातून ‘गेमिंग टुरिझम’ नावाचा नवीन व्यवसाय बहरला आहे.

या व्यवसायात आता अनेक नव्या कंपन्या उतरल्या आहेत. ‘गुगल’चे जगाची सफर घडवून आणणारे ॲप तुम्हाला कार्डबोर्ड हेडसेटच्या मदतीने ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ आणि इराकमधील ‘नॅशनल म्युझियम’मध्ये घेऊन जाते. ‘बीबीसी’ने तयार केलेल्या ‘सेव्हन वर्ल्डस’ आणि ‘वन प्लॅनेट’सारख्या मालिका पर्यटकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘बीबीसी’ने आणखी पुढे जात ३६०  अंशात पाहता येणारे थ्रीडी व्हिडिओ तयार केले आहेत. यात अवकाशातून सूर्यग्रहणाचा आनंद घेता येतो. यासाठी ‘बीबीसी’ने ‘मॅजिक लीप’ या हेडसेट बनविण्यासाठी कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. ‘‘निसर्गाचा अनुभव डिजिटली घेतला, तरी तो मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतो. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ते अधिकच उपयुक्त ठरते. लोकांना अधिक जिवंत अनुभव देण्यासाठी आम्ही नवनव्या क्‍लृप्त्या वापरत आहोत. यासाठी ‘व्हर्चुअल रिॲलिटी‘ आणि ‘स्लो टीव्ही’सारखे तंत्रज्ञान उपयोगी पडत आहे.

भविष्यात या तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणार आहे. ‘ॲक्‍टिव्ह स्कीन’सारखे तंत्रज्ञान २०३० पर्यंत अस्तित्वात येईल. यामध्ये तुम्हाला पर्यटन स्थळाचा थेट अनुभव घेता येईल. यासाठी शरीरात रोपण करता येणारे छोट्या आकाराने ट्रान्झिस्टर तयार करण्यात आले आहेत. त्यावर शाईसारखा पदार्थ फवारण्यात येईल व त्याद्वारे तुमच्या मज्जातंतूंकडे संदेश पाठवले जातील. यातून तुम्हाला मालदीवच्या किनाऱ्यावरचा सूर्यास्त दिसेलच, त्याचबरोबर किनाऱ्यावरची खारट हवाही अनुभवता येईल! तुम्ही ताजमहालाच्या थंड संगमरवराचा हात लावून अनुभवही घेऊ शकाल. विशिष्ट प्रकारच्या कॉन्टॅक्‍ट लेन्स तुमच्या घरातील हॉलचे रूपांतर विमानतळापासून अमेझॉनच्या जंगलात करतील. भविष्यात तुमचा रोबो तुमच्यासाठी पर्यटन करेल आणि त्याचा आनंद तुमचा मेंदू घेईल,’’ असे ‘बीबीसी’च्या नॅचरल हिस्ट्री युनिटच्या डिजिटल विभागाचे प्रमुख ली बेकॉन सांगतात. एकंदरीतच, शरीरापेक्षा मनाने पर्यटनाचे युग भविष्यात अवतरेल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com